भारतीय फुटबॉलचे १९९०चे दशक बायच्युंग भूतिया, आय. एम. विजयन आणि कार्लटन चॅपमन या त्रिकुटाने गाजवले. यांच्यापैकी एक प्रभावी आणि गुणवान फुटबॉलपटू असणाऱ्या चॅपमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारताने १९९७मध्ये सॅफ चषक स्पर्धा चॅपमन यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. चॅपमन यांनी देशातील क्लब स्तरावरील फुटबॉलमध्येही छाप पाडली. भारताच्या मध्यरक्षकाची भूमिका बजावताना त्यांनी ईस्ट बंगाल, जेसीटी मिल्स यासारख्या मातब्बर क्लबचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. जेसीटीकडून चॅपमन, भूतिया आणि विजयन हे त्रिकूट अनेक प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आणायचे.
ऐंशीच्या दशकात चॅपमन यांनी बेंगळूरुच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रातून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीला प्रारंभ केला. मग सदर्न ब्लूजकडून त्यांनी टाटा फुटबॉल अकादमीपर्यंत मजल मारली. मात्र १९९३मध्ये त्यांनी ईस्ट बंगालशी करार केला. ईस्ट बंगालकडून त्यांनी इराकच्या अल-झोरा संघाविरुद्ध केलेली गोलची हॅटट्रिक आजही फुटबॉलप्रेमींच्या विशेष आठवणीत आहे. ती लढत ईस्ट बंगालने ६-२ अशा मोठय़ा फरकाने जिंकली होती. मग ईस्ट बंगालचे नेतृत्व करताना चॅपमन यांनी नेशन्स फुटबॉल लीगचे विजेतेपद संघाला मिळवून दिले. जेसीटीच्या १४ विजेतेपदांमध्ये चॅपमन यांचा सिंहाचा वाटा होता. चॅपमन हे जेसीटी या संघाकडून एफसी कोचीन या संघाकडे वर्षभरासाठी करारबद्ध झाले होते. मग ते पुन्हा ईस्ट बंगालकडे परतले. निवृत्तीनंतरही ते स्वस्थ बसले नाहीत. प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी विविध संघांकडून प्रभाव पाडला. २०१७मध्ये केरळच्या क्वार्ट्झ संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर चॅपमन म्हणाले होते की, ‘‘केरळ हे माझे तिसरे घर आहे. माझे पहिले घर जन्मठिकाण बेंगळूरु, दुसरे घर बंगाल आणि आता केरळ. केरळमध्ये खेळलो आणि आता प्रशिक्षक म्हणून परतलो.’’ फुटबॉलपटूंचा तापट स्वभाव मैदानावर दिसतो. मात्र चॅपमन हे त्याला सर्वार्थाने अपवादे. मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांनी नाव कमावले. फुटबॉलमुळे त्यांनी अनेक मित्रही कमावले. मनमिळावू स्वभावामुळे हे त्यांना सहजगत्या जमायचे. भारताचे माजी फुटबॉलपटू ब्रुनो कौटिनो यांना एकदा खेळताना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी चॅपमन हे दररोज भेट देत होते. चॅपमन यांचे त्यांच्या संघातील खेळाडूंशी आपुलकीचे संबंध हे त्यामधूनच अधोरेखित होतात.