वेणु माधव गेल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण झाली. मराठीतील हरहुन्नरी विनोदवीर वेळेआधीच काळाच्या पडद्याआड गेला. वेणुही वेळेआधीच गेला. वेणुवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जरुरीची होती, ती होण्यापूर्वीच वेणुने शेवटचा श्वास घेतला. सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती छोटी छोटी कामे करत, कष्ट करत आयुष्यात काही तरी बनण्याचा प्रयत्न करतात. एकदा यश मिळायला लागले की वेगाने धावत सुटतात. जगण्यात बेफिकिरी येते. स्वत:वर विजय मिळवल्याचा भास व्हायला लागतो. मग भरकटणे आणि फरफट सुरू होते. मागे फिरण्याची बुद्धी सुचतेदेखील; पण उशीर झालेला असतो. कायमचे निघून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. वेणु माधवलाही उरला नाही. वेणु तेलुगू सिनेमातील सुपरस्टार विनोदवीर. ३९व्या वर्षी त्याने जाणे अपेक्षितच नव्हते. लक्ष्याची तरी एक्झिट कोणी अपेक्षित केली होती. वेणुने इतक्या छोटय़ा काळात तब्बल सातशे सिनेमे केले. या कलाकाराच्या आयुष्यात रात्र आणि दिवस एकच झालेला असावा! दिवसाला दोन-तीन शिफ्टमध्ये सिनेमाचे चित्रीकरण. त्यासाठी निरनिराळ्या लोकेशन्सवर सातत्याने प्रवास करणे. या अपार कष्टातून वेणुला पैसाही मिळू लागला. प्रसिद्धी तर मिळालीच. ग्लॅमरची काळी बाजू लक्ष्याने अनुभवली तीच वेणुनेही. मग, शरीराने साथ सोडून दिली. वेणुला मिमिक्री करायला आवडायचे. वेगवेगळ्या समारंभांमधून मिमिक्री करत वेणुने स्वत:चे अस्तित्व सिनेमावाल्यांना लक्षात आणून दिले. मिमिक्री कलाकार स्टँडअप कॉमेडियन होतातच असे नाही. स्टँडअपकडे नकलेच्या पलीकडे जावे लागते. अनेकदा नकलाकारांना सिनेमात काम करणे हाच यश मिळवण्याचा सोपा मार्ग असतो. वेणुनेही हाच मार्ग अवलंबला. खरे तर वेणुला स्टँडअप कॉमेडियन होता आले असते. कारण तो प्रत्यक्षपणे राजकीय होता. तेलुगू देसम पक्षाचा सदस्य होता. ज्यांनी राजकारण आणि राजकीय व्यक्तींना जवळून पाहिले आहे अशा विनोदवीरांना कदाचित राजकीय प्रहसन करता येऊ शकते. पक्षाशी निगडित काम करता करता वेणु माधवचा तेलुगु सिनेमासृष्टीतील व्यक्तींशी संबंध आला. त्यातून ओळखी वाढल्या. वेणुला सिनेमात कामे मिळायला लागली. लोकांशी ओळखी काढणे आणि त्या आपणहून जपणे या दोन्ही गोष्टी वेणुला जमल्या. दाक्षिणात्य सिनेमात विनोदवीर लागतोच. ब्रह्मानंदनम हे तेलुगू, तमिळ सिनेमातील नामवंत विनोदवीर. वेणुनेही त्यांच्या तोडीस तोड कामे केली. तेलुगूतील नागार्जुन, महेशबाबूपासून बहुतांश प्रमुख नायकांबरोबर वेणु दिसला. मराठी माणसाला वेणुच्या सिनेमांची नावे आठवणार नाहीत. पण, त्याचा चेहरा लक्षात राहिलेला आहे. चित्रवाणी वाहिन्यांवरील डब केलेले दाक्षिणात्य विशेषत: तेलुगू सिनेमे आवडीने पाहिले जातात. या सिनेमांतील विनोदवीरांनी केलेला आचरटपणाही खपवूनही घेतला जातो. मराठी सिनेमात तो कदाचित चालणार नाही पण, तो दाक्षिणात्य सिनेमात असेल तर चालतो. वेणु संवेदनशील होता. गाडीतून धान्य भरून आणून लोकांना वाटायचा. वेणु ‘पॅराशूट कलाकार’ कधीच नव्हता. तो वरून जमिनीवर अवतरला नाही. काळ हाताशी असताना असे कलाकार जातात तेव्हा लोकांना हळहळ वाटते. लक्ष्या गेला तेव्हा वाटली, तशीच!
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2019 रोजी प्रकाशित
वेणु माधव
वेगवेगळ्या समारंभांमधून मिमिक्री करत वेणुने स्वत:चे अस्तित्व सिनेमावाल्यांना लक्षात आणून दिले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-09-2019 at 01:36 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian film actor venu madhav profile zws