ज्या काळी ‘नवसाक्षर’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता, त्या काळी प्रौढ साक्षरतेचा विषय ऐरणीवर आणणे ही अजब बाब इरगोंडा शिवगोंडा पाटील यांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. आपले सारे आयुष्य या एकाच विषयाला वाहिलेला हा माणूस म्हणजे एक अजब रसायन होते. महात्मा फुले यांचे ‘विद्या’कार्य पुढे नेणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या निधनाने एका कार्यलोभी माणसाचा अंत झाला आहे. वरवर पाहता, साधेसुधे वाटणारे इरगोंडा हे बोलायला लागले, की त्यांच्यातील तळमळ आणि कामातील तन्मयता चटकन लक्षात येई. आपल्या कामाचे समोरच्याला मोल वाटते की नाही, यापेक्षा त्यालाही या कामात कसे ओढता येईल, याचीच त्यांना अधिक काळजी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाळीस वर्षांपूर्वी प्रौढ साक्षरतेच्या कामात पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला, त्यास निमित्त झाले ते डॉ. भालचंद्र फडके. मराठी विभागात काम करत असतानाच त्यांनी निरंतर शिक्षणाची योजना तयार केली आणि तिला मूर्त रूप देण्यासाठी त्या काळच्या तडफदार तरुणांची फौज निर्माण केली. तेज निवळीकर, दादा शिंदे, इरगोंडा पाटील यांच्यासारखे अनेक जण या योजनेच्या कामात झोकून देऊन काम करू लागले आणि नवसाक्षर आणि प्रौढ साक्षर या गटासाठी एक चळवळच उभी राहू लागली. इचलकरंजीजवळच्या चांदूर या गावी शेतीवाडी असताना, हे गृहस्थ ते सारे सोडून पुण्यात दाखल झाले आणि या कामात आपले सर्वस्व देण्यासाठी सज्ज झाले. गावोगावी जाऊन ही चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचा सतत आटापिटा असे.

नवसाक्षरांना कळेल, अशा मोठय़ा टायपातील ‘सांगावा’ हे नियतकालिक इरगोंडा पाटील यांनी सुरू केले. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता. नियतकालिक पाच वर्षांत बंद करावे लागले, पण त्याने साक्षरतेची चळवळ अधिक वेगवान बनली. नंतरच्या काळात महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘निरंतर शिक्षण’ या त्रमासिकाचे संपादकपद त्यांनी दहा वर्षे भूषवले. ‘भूषवले’ अशासाठी म्हणायचे, की काही वर्षांपूर्वी नागपूर अधिवेशनात एका मंत्र्याने आपल्या भाषणात सांगितले की, आज जे काही बोलता आणि वाचता येते आहे, त्याची प्रेरणा इरगोंडा पाटील यांची आहे. समाजात वावरताना समजणारे प्रश्न, त्यांना भिडण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता आणि त्यातून पुढे जात राहण्याची वृत्ती हे इरगोंडा यांचे खास वैशिष्टय़. आयुष्यात ध्येयवादालाही काही महत्त्व असते, यावर ठाम निष्ठा ठेवून काम करणाऱ्या त्या पिढीचे इरगोंडा हे एक प्रतिनिधी होते.

साक्षरतेच्या विषयावर पुस्तकांची शंभरी गाठणाऱ्या पाटील यांनी बालभारतीमध्ये पाठय़पुस्तकाचे संपादक म्हणूनही काम केले. राज्य शासनाचा लेखन पुरस्कार, कुदळे प्रतिष्ठानचा ध्येयवादी पुरस्कार यामुळे हुरळून जाण्यापेक्षा सतत कामात गुंतून राहणे त्यांनी अधिक पसंत केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि निकोपता या लेखनातून प्रकट होई.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irgonda patil
First published on: 02-08-2016 at 04:22 IST