स्वातंत्र्योत्तर काळात जागतिक पातळीवर आपल्या बुद्धिमत्तेचा व अर्थविचारांचा ठसा उमटवलेल्या प्रमुख भारतीय अर्थतज्ज्ञांची यादी बनवताना डॉ. अमर्त्य सेन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतीलच, पण त्याबरोबरच देशाचे माजी प्रमुख अर्थसल्लागार कौशिक बसू यांनाही या यादीत मानाचे स्थान द्यावेच लागेल. जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहिलेले बसू आता आंतरराष्ट्रीय आर्थिक महासंघाचे (आयईए)अध्यक्ष बनल्याने एका जागतिक संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी भारतीयाला मिळाली आहे.
९ जानेवारी १९५२ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या बसू यांचे शालेय शिक्षण १९६९ मध्ये संपले. पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यांच्या वडिलांना मुलाने पदार्थविज्ञानशास्त्रात चमकदार कामगिरी करावी, असे वाटत होते तर कौशिक यांना काहीच करण्याची इच्छा नव्हती. मात्र काही दिवसांनंतर पदार्थविज्ञानशास्त्र की काहीच न करणे, यातील मध्यम मार्ग म्हणून ते दिल्लीला आले आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांना आपले ध्येय गवसले. अर्थशास्त्र हा मुख्य विषय घेऊन ते पदवीधर झाले. प्रथम श्रेणीतील पदवी घेऊन ते पुढील शिक्षणासाठी विख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले. १९७४ मध्ये तेथील शिक्षण संपल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करून मायदेशी परतावे व वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू करावी, असे कौटुंबिक पातळीवर ठरले होते. पण लंडन येथे शिक्षण घेत असताना प्रा. अमर्त्य सेन यांच्या विचारांनी त्यांना भुरळ घातली. अर्थशास्त्रातच मग पुढे संशोधन करण्याच्या उद्देशाने ते लंडनमध्येच राहिले. प्रा. सेन हेच त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. १९७६ मध्ये डॉक्टरेट मिळवल्यानंतर काही महिने रीडिंग विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. १९७७ मध्ये ते भारतात परतले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आधी प्रपाठक आणि नंतर प्रोफेसर बनले. दिल्लीत असतानाही हार्वर्डसह अनेक विदेशी विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांना आवर्जून बोलावले जात असे. १९९२ मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स’ या संस्थेची स्थापना केली. याच काळात अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि मग या संस्थेच्या कामाला वेग आला. पुढे मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बसू यांना सरकारचे मुख्य अर्थसल्लागार नेमले. या पदावर असतानाही सरकारी धोरणांवर परखड मत व्यक्त करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मोदी यांनी हट्टाने राबवलेला नोटाबंदीचा निर्णयही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता पूर्णत: चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली होतीच.
सरकारी पदावरून २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते जागतिक बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले. तेथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तेथील मुदत संपल्यानंतर ते कार्नेल विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीज विभागात पुन्हा प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भारतातील पाच विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला असून अर्थशास्त्रातील विविध घटकांवर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीचा गौरव म्हणून मग आता त्यांच्यावर ‘आयईए’चे नेतृत्व करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. जागतिक स्तरावर आर्थिक धोरणाला वळण देण्याचे तसेच संशोधनाचे काम हा महासंघ करीत असतो. या आधी अमर्त्य सेन, जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्यासारख्या नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञांनी या महासंघाचे प्रमुखपद भूषवले आहे. यातूनच बसू यांच्या या पदावरील निवडीचे महत्त्वही अधोरेखित होते.