सामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करून, त्यांना न्याय कसा मिळेल याच ध्यासाने समाजकारण- राजकारणात अनेक जण काम करतात. त्यात फायदा-तोटय़ाचा विचार नसतो. अशांपैकीच एक सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातून विधानसभेवर तीनदा निवडून गेलेल्या आडम मास्तरांना नुकतेच ‘कामगारमहर्षी गं. द. आंबेकर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एके काळी गिरणगाव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये गिरणी कामगारांची मोठी ताकद होती. नरसय्या आडम यांचे वडील नारायण हे गिरणी कामगार तर आई विडी कामगार. त्यामुळे बेताची घरची परिस्थिती असल्याने त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. पुढे मग कुटुंबाला हातभार लागाला यासाठी ते एखाद्या दुकानाचे हिशेब लिहू लागले, मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. त्यातून ते ‘आडम मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडा आवाज, उत्तम संघटनकौशल्य व प्रश्न समजून घेण्याची हातोटी यामुळे सूतगिरणी असो वा यंत्रमाग किंवा विडी कामगार त्यांना आडम यांनी लालबावटय़ाखाली संघटित केले. त्यातून नेतृत्व पुढे आले. पुढे १९७४ मध्ये कामगार वस्तीतून सोलापूर महापालिकेवर ते विजयी झाले. पुढे १९७८ मध्ये ते विधानसभेवर गेले. त्यानंतर १९९५ व २००४ असे तीन वेळा ते आमदार झाले. असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. या कामाची पावती म्हणून आदर्श लोकप्रतिनिधीचा बहुमान त्यांना मिळाला. एकीकडे संघर्षांतून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून सोलापूरमध्ये दहा हजार महिला विडी कामगारांसाठी कॉ. गोदाताई परुळेकर घरकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला. त्याच्या लोकार्पणासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. आता त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतून असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरकुले उभारण्याची योजना हाती घेतली आहे. त्याला केंद्र व राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh narsayya adam
First published on: 27-03-2018 at 02:56 IST