दुसऱ्या महायुद्धासह चार युद्धांत सहभागी होऊन, शत्रूवर तोफखान्याचा अचूक भडिमार करणारे सर्वात ज्येष्ठ ‘गनर’ मेजर गुरुदयाल सिंह जलानवालिया (निवृत्त) यांचे नुकतेच निधन झाले. १०२ वर्षांच्या या योद्धय़ाला लष्करप्रमुखांसह तोफखाना दलाने आदरांजली अर्पण केली. लष्करी सेवेत प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याची संधी मिळणे म्हणजे अधिकारी आणि जवानांसाठी अभिमानास्पद बाब. धाडस, कौशल्य आणि नेतृत्व सिद्ध करण्यास पुरेपूर वाव असणारी हीच संधी असते. मेजर गुरुदयाल सिंह यांना ती संधी पुरेपूर लाभली. लष्करी सेवा अन् युद्धात पारंगत होण्याचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले. त्यांचे वडील ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’त कार्यरत होते. पहिल्या महायुद्धात ते मेसोपोटोमिया येथे कार्यरत होते. गुरुदयाल सिंह यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी लुधियानातील हरनामपुरा या गावात झाला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लष्करी सेवेची वाट निवडली. जालंदरच्या ‘रॉयल इंडियन मिल्रिटी स्कूल’मधून ते उत्तीर्ण झाले. १९३५ मध्ये उत्तुंग पर्वतीय क्षेत्रातील तोफखान्याचे खास प्रशिक्षण घेऊन, अबोटाबाद (आता पाकिस्तानात) येथील ‘१४ राजपुताना माऊंटन बॅटरी’त ते दाखल झाले. अल्पावधीत त्यांची कॅम्बेलपूर (आता पाकिस्तानात) येथे बदली झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सिंह यांच्या तुकडीला जपानी सैन्याशी लढण्यासाठी बर्मात (आताचे म्यानमार) पाठविण्यात आले. बंगळूरुहून रस्तेमार्गाने मजल-दरमजल करीत त्यांची तुकडी बर्मात पोहोचली. तिथे जपानी जवानाच्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर देत जपानी सैनिकांना गारद केले. बरे झाल्यानंतर सिंह हे देशाच्या स्वातंत्र्यावेळी जम्मू-काश्मीरच्या आघाडीवर तैनात झाले. १९४७ आणि १९४८ या काळात जम्मू-काश्मीरमधील चकमकींत त्यांनी मोलाचे योगदान दिले. नौशेरा भागात घुसखोरांना रोखण्याची जबाबदारी सांभाळली. १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धात मेजर सिंह हे अमृतसर क्षेत्रात गनर अधिकारी म्हणून तैनात होते. १९६७ च्या सुमारास लष्करातून ते निवृत्त झाले. तोफखाना हे लष्कराचे महत्त्वाचे उपदल. समोरासमोरील लढाईआधीच शत्रूला नामोहरम करण्याची त्याची क्षमता आहे. सिंह यांनी प्रदीर्घ काळ ते काम केले. लष्करी सेवेचा वारसा त्यांच्या कुटुंबानेही जपला. त्यांचे दोन्ही मुलगे सैन्यदलातून निवृत्त झाले, त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. कुटुंबातील चौथी पिढी म्हणजे सिंह यांचा नातूदेखील लष्करी अधिकारी आहे! वेगवेगळ्या युद्धक्षेत्रांत मेजर गुरुदयाल सिंह यांची विलक्षण कामगिरी सैन्यदलातील प्रत्येकास नेहमीच लढण्याची प्रेरणा देईल.