करोना महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक लशींचे महत्त्व जगाला नव्याने समजले. भारतातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमातील प्रमुख लस असलेल्या कोव्हिशिल्ड या लशीच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव. डॉ. जाधव यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले; त्यानंतर ‘भारतातील लसीकरण उद्योगाचे मार्गदर्शक हरपले’ हे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांचे उद्गार किंवा ‘जैवतंत्रज्ञान क्षेत्राची अपरिमित हानी’ झाल्याची डॉ. किरण मुजुमदार शॉ यांनी व्यक्त केलेली भावना, त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारीच आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि डॉ. सुरेश जाधव ही दोन नावे गेल्या ४५ वर्षांपासून एकमेकांशी जोडली गेली. त्यातूनच भारतासह जगातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील देशांना लशींद्वारे निरोगी आयुष्य बहाल करणारे लसनिर्मितीच्या क्षेत्रातील अध्वर्यू असा लौकिक डॉ. सुरेश जाधव यांना प्राप्त झाला.

नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठातून फार्मसी या विषयातून पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर १९७० पासून त्यांनी नागपूर विद्यापीठ आणि एसएनडीटीमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यानंतर हाफकिनमध्ये लसनिर्मितीच्या क्षेत्रातील संशोधनाचे काम सुरू केले. १९७९ मध्ये ते सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रुजू झाले. १९९२ पासून सीरमच्या कार्यकारी संचालक पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लसनिर्मितीच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर भारताचा दबदबा निर्माण करण्यात तसेच करोना महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक लशीची निर्मिती करण्यात डॉ. जाधव यांचे अनन्यसाधारण योगदान होते. मेनिंगोकॉकल ए कॉँज्युगेट लस, इन्फ्लुएंझा लशींच्या संशोधनात तसेच करोना प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लशीच्या निर्मितीत त्यांनी योगदान दिले. सर्व विकसनशील देशांमधील लस उत्पादकांचे नेटवर्क असलेल्या डीसीव्हीएमएन – ‘डेव्हलपिंग कंट्रीज व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क’ची सुरुवात डॉ. जाधव यांनी केली. पहिली पाच वर्षे या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिबंधात्मक लसनिर्मितीसंबंधित सर्व उपक्रमांमध्ये डॉ. जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. औषधांचा दर्जा ठरवणाऱ्या इंडियन फार्माकोपिया कमिशन या संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. संशोधन, अध्यापन क्षेत्रातील योगदानासाठी लसीकरणाच्या जागतिक नकाशावर डॉ. जाधव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. लसनिर्मितीच्या क्षेत्रातील जगातील ५० अग्रणी शास्त्रज्ञांमध्ये डॉ. जाधव यांचे नाव सातव्या क्रमांकावर घेतले जाते. जगातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना विविध प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा करण्यासाठी सुरू झालेल्या ‘गावी’ – ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अ‍ॅण्ड इम्युनायझेशन – या संघटनेचे ते सदस्य होते. लसनिर्मितीच्या क्षेत्रात अनेक आकर्षक संधी खुणावत असण्याच्या काळातही तब्बल तीन तपांहून अधिक काळ डॉ. जाधव सीरम इन्स्टिट्यूटशी जोडलेले राहिले. त्यामुळे सीरमच्या वाटचालीत डॉ. जाधव यांचे योगदान कायमच मोठे राहिले.