एकोणिसाव्या शतकाअखेरीस, १८९५ साली बेल्जियममधील घेन्ट शहराच्या परिसरात डुकराच्या मांसातून तब्बल ३४ जणांना विषबाधा झाली. घेन्ट विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ एमिल व्हॉन एर्मेन्जेम यांनी तात्काळ यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. हे चटकन फैलावणारे जीवघेणे विष ‘क्लोस्ट्रिडियम बोटुलिनियम’ या जिवाणूमध्ये अंगभूत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. पुढे, याच जिवाणूच्या विषामुळे चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो, प्रसंगी दृष्टी जाते, असेही वैद्यकांना आढळले. मग दुसऱ्या महायुद्धात एडवर्ड शँट्झ आदी युद्धशास्त्रज्ञ, ‘जैव अस्त्र’ म्हणून याचा वापर करावा की कसे याचीही चाचपणी करीत होते… 

… आज चेहरा किंवा एकूण त्वचा तुकतुकीत, तरुण करण्याचे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘बोटॉक्स’ तंत्रातील प्रमुख रसायन ते हेच- ‘बोटुलिनियम टॉक्सिन’ म्हणजे बोटुलिनियम जिवाणूचे विषच- पण सौम्य प्रमाणात वापरले गेलेले! हा विषाशी खेळ करून माणसांचा तरुण बनवण्याचा उद्योग प्रथम करणारे डॉ. अ‍ॅलन स्कॉट नुकतेच (१६ डिसेंबर) निवर्तले. केवळ वैद्यकीय संशोधनच न करता त्यांनी औषधकंपनी स्थापून १९८९ मध्ये ‘बोटॉक्स’च्या औषधी वापरासाठीच्या द्रावणाला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाची मान्यताही मिळवली होती. मात्र ते द्रावण केवळ डोळ्यांच्या स्नायूजन्य विकारांसाठी होते. डोळे वरखाली असणे तसेच पापण्यांचा मिचमिचेपणा या दोनच विकारांवर त्या ‘ओक्युलिनम’ या द्रावणाचा वापर करता येई. ‘हे औषध फारच छान आहे डॉक्टर, माझे डोळे तर तंदुरुस्त झालेच पण डोळ्यांभोवतीची वर्तुळेही कमी झाली, सुरकुत्या गेल्या!’ असे सांगणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली तेव्हा काहीएक प्राथमिक संशोधन डॉ. स्कॉट यांनीही केले, पण यापुढले काम नेत्रविकार संशोधकाचे नाही हे जाणून त्यांनी, या औषधाचे हक्क १९९१ मध्ये अलेर्जन या औषधकंपनीला विकले आणि स्वत:  ५९ व्या वर्षी, निवृत्तीच्या मार्गास लागले. ‘बोटॉक्स’ हे नाव याच कंपनीने दिले. मात्र, २००२ पर्यंत अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने या बोटोक्स उपचारांना अधिकृत मान्यता दिलेली नव्हती. आपण संशोधन जरूर केले, पण बोटोक्सचा धंदा केला नाही, असा दावा अनेक मुलाखतींतून डॉ. स्कॉट यांनी केला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकविसाव्या शतकात ‘बोटॉक्स करून घेणे’ हे सामान्य झाले आहे. अनेक सौंदर्यवर्धनगृहे (ब्यूटी पार्लर) हा उपचार सहजपणे देतात. अतिरेक झाला तर अनर्थ घडवू शकणाऱ्या या औषधोपचाराचा (की विष-उपचाराचा?) इतिहास व डॉ. अ‍ॅलन स्कॉट मात्र बहुतेकांना माहीत नसतात!