यश मिळवण्यासाठी अफाट मेहनत घ्यायची आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवायची, पण कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही, हे बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचे जीवनसूत्र होते. बास्केटबॉल हा त्याचा जीव की प्राण. २६ जानेवारीला एका हेलिकॉप्टर अपघातात वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी कोबे अकाली मरण पावला, त्या वेळीही तो त्याच्या कन्येला घेऊन तिच्या बास्केटबॉल सामन्यासाठीच निघाला होता. त्याची लोकप्रियता कालातीत आणि राष्ट्रातीतही होती. भारतात नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीए बास्केटबॉल साखळीचे मुख्य सामने टीव्हीवर दाखवले जाऊ लागले, त्या वेळी मायकेल ‘एअर’ जॉर्डन, शकील ओनिल, चार्ल्स बार्कले, ‘मॅजिक’ जॉन्सन, कोबे ब्रायंट ही नावे घराघरात पोहोचली. लॉस एंजलिस लेकर्सकडून तो खेळतानाची ८ किंवा २४ क्रमांकाची पिवळी किंवा जांभळी जर्सी घालून जगभरातील मुले-मुली आवडीने आणि अभिमानाने मिरवतात. लॉस एंजलिस लेकर्स या संघाकडून कोबे २० वर्षे बास्केटबॉल खेळला. त्याचे वडील जो ब्रायंट इटलीत व्यावसायिक बास्केटबॉल खेळत. कोबे तेथेच वाढला. त्यामुळे एनबीएतील अनेक कृष्णवर्णीय बास्केटबॉलपटूंप्रमाणे त्याची पाश्र्वभूमी गरिबीची नव्हती. अवघ्या १७व्या वर्षी त्याची लेकर्सकडून खेळण्यासाठी निवड झाली. आपल्यालाही मायकेल जॉर्डनसारखेच महान व्हायचे आहे, याची खूणगाठ कोबेने सुरुवातीलाच बांधून घेतली होती. त्यासाठी ब्रायंटने बास्केटबॉलला आणि लेकर्सना वाहून घेतले होते. ‘सरावासाठी पहिला आणि सरावातून बाहेर पडताना अखेरचा’ हे वर्णन बहुधा कोबेसाठीच सर्वाधिक लागू पडते. २० वर्षांच्या कारकीर्दीत १८ वेळा ऑल स्टार संघात निवड, २००८मध्ये सर्वोत्तम बास्केटबॉलपटू, दोन वेळा अंतिम लढतींमध्ये सर्वोत्तम बास्केटबॉलपटू या गौरवमालेतील सर्वात मूल्यवान रत्ने म्हणजे अर्थातच पाच एनबीए अजिंक्यपदे. कोबे बऱ्यापैकी नवखा असताना त्याला लेकर्सच्या प्रशिक्षण सत्रात पाठवले गेले. तेथील प्रशिक्षकाने अध्र्यावरच सत्र संपवून कोबेला परत पाठवले. ‘याला कसले प्रशिक्षण द्यायचे? हा तर आपल्या सगळ्या बास्केटबॉलपटूंना पुरून उरेल,’ अशी पावती त्या प्रशिक्षकाने देऊन टाकली. २००३मध्ये लैंगिक छळाचे एक प्रकरण त्याला भोवणार होते. पीडित महिलेशी न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली, पण यामुळे त्याची कारकीर्द डागाळली. बास्केटबॉलनंतर काय, हा कोबेसाठी मुद्दा नव्हताच. तो बहुपैलू होता. स्वतला साजरे करण्याची कला त्याला अवगत होती आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची त्याची तयारी होती. २०१८मध्ये त्याच्या जीवनावर आधारित अॅनिमेशनपटाला ऑस्कर मिळाले, त्यातील कविता कोबेनेच लिहिली होती. निवृत्तीनंतर बास्केटबॉल प्रशिक्षणाची नवीन कारकीर्द त्याने सुरू केली होती. कोबेने घातलेल्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सी लेकर्सनी मागेच त्याच्या सन्मानार्थ निवृत्त केल्या होत्या. त्यांचे अजरामरत्व इतक्या लवकर सिद्ध व्हायला नको होते!
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2020 रोजी प्रकाशित
कोबे ब्रायंट
लॉस एंजलिस लेकर्स या संघाकडून कोबे २० वर्षे बास्केटबॉल खेळला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-01-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile kobe bryant akp