भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या सुरुवातीच्या काळात पायाभूत कामगिरी करणाऱ्या संशोधकांत रामभद्रन अर्वमुदन यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने त्या मंतरलेल्या काळातील एक दुवा निखळला आहे. सुरुवातीच्या काळातच ते इस्रोमध्ये दाखल झाले. नंतर श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रात त्यांची संचालकपदी नियुक्ती झाली होती. बेंगळूरु येथील इस्रोच्या उपग्रह केंद्रातही त्यांनी काम केले. अर्वमुदन हे मद्रास तंत्रज्ञान संस्थेत प्रावीण्य संपादन केलेले मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थी होते. त्यांनी काही काळ भारताच्या अणुशक्ती केंद्रातही काम केले. इस्रोच्या सुरुवातीच्या काळात प्रख्यात वैज्ञानिक व दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
मुंबईत काम करीत असताना त्यांनी सहकाऱ्यांकडून सर्वप्रथम डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव ऐकले. साराभाई हे भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. तिरुअनंतपुरम येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र साकारण्याचे त्या वेळी बोलले जात होते. अणुऊर्जा संस्थेत कंटाळलेल्या अर्वमुदन यांनी त्या वेळी बदल म्हणून साराभाई यांच्याकडे अर्ज केला. तेथून त्यांचा इस्रोतील प्रवास सुरू झाला! त्यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील नासा या संस्थेत पाठवण्यात आले. तेथे त्यांनी अग्निबाण प्रक्षेपणातील मूलभूत कौशल्ये आत्मसात केली. भूकेंद्रावरून अग्निबाणाशी संपर्क साधण्याच्या तंत्राचे शिक्षण त्यांनी घेतले. त्याच वेळी ए. पी. जे. अब्दुल कलामही इस्रोच्या वतीने अमेरिकेत होते. तेथेच या दोघांची मैत्री झाली. नासातील प्रशिक्षणानंतर हे सर्व जण तिरुअनंतपुरम येथील थुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण योजनेच्या कामाला लागले. साठच्या दशकात अग्निबाणाचे नवे प्रारूप त्यांनी तयार केले. तेव्हापासून ते मंगळ यान २०१४ मध्ये सोडण्यात आले तोपर्यंत अर्वमुदन यांचा इस्रोशी संपर्क होता. इस्रोतून ते १९९७ मध्ये निवृत्त झाले होते. पण इस्रो हेच त्यांचे आयुष्य होते. कौटुंबिक जीवन त्यांच्यासाठी दुय्यम ठरत होते. ‘इस्रो- अ पर्सनल हिस्टरी’ या आत्मचरित्रात त्यांनी इस्रोतील त्यांचा प्रवास कथन केला आहे. यू.आर. राव उपग्रह केंद्रात असताना अर्वमुदन यांनी मोठे काम केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते त्यांचे व्यक्तिमत्त्व विनम्र होते. अनेकदा ते कलामांबरोबरच्या दिवसांबद्दल बोलत असत. त्या आठवणीत रमणे त्यांना आवडत असे. इस्रोचे ते सुरुवातीचे दिवस मंतरलेले होते. त्यांच्या कारकीर्दीतच पहिला अग्निबाण अवकाशात झेपावला त्यातील यशापयश त्यांनी अनुभवले. हे तपशील खरोखरच प्रेरक, कारण खचून न जाता सावरण्याचे तंत्र अवगत करून त्यांनी अखेर अग्निबाण तंत्रज्ञानात इस्रोला पुढे नेले.