दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषी चळवळ संपली तरी नंतरच्या काळात कृष्णवर्णीयांना वेगवेगळ्या क्षेत्रांत दिशा दाखवणारे मोजके लोक होते. त्यात दक्षिण आफ्रिकेचे उद्योगपती रिचर्ड मपोन्या यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. जिद्द हरवलेल्या कृष्णवर्णीयांना त्यांनी उद्योगाची नवी वाट दाखवून त्यांच्यात आशेची ज्योत लावली. कृष्णवर्णीयांमधील उद्योजकांना ठोस दिशा दिली. मपोन्या यांचे नुकतेच निधन झाले. जोहान्सबर्ग शेजारील सोवेटो परगण्यात त्यांनी एक मोठा मॉल सुरू करून किरकोळ विक्री क्षेत्रात दमदार पाऊल टाकले. वयाच्या ९९ व्या वर्षीही ते तरुणाच्या उमेदीने काम करीत होते.

शिक्षकी पेशात आवडीने सुरू केलेली नोकरी संसारासाठी पुरेशी नाही, म्हणून ते कापडउद्योगात काम करू लागले. सहृदय व्यवस्थापकाने त्यांना बिघडलेले कपडे घेऊन जाण्याची परवानगी दिली, त्यातून १९५० मध्ये त्यांनी खाण कामगार व ग्रामीण व्यक्तींना तयार कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. कृष्णवर्णीय म्हणून त्यांना किरकोळ विक्री दुकाने उघडण्याचा परवाना नाकारण्यात आला होता, त्यासाठी त्यांना कायदेशीर संघर्ष करावा लागला. त्यांचे वकील होते, नेल्सन मंडेला! मात्र सोवेटो येथे त्यांनी डय़ुबे डेअरी सुरू केली, १०० सायकलस्वार मुले बाळगून दुकानांना दूधपुरवठय़ाचा व्यवसाय चोख केला. १९५६ मध्ये त्यांना सोवेटो येथे अन्न विकण्याचा परवाना मिळाला. एक कत्तलखाना व रेस्टॉरंट व दोन वाण सामानाची दुकाने सुरू केली. एका पेट्रोल पंपाचे ते मालक होते. ‘जनरल मोटर्स’चे ते वितरक होते, पण १९८७ मध्ये या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतून माघार घेतली. बस वाहतूक, बीएमडब्ल्यूचे वितरक अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या.

उद्योग क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा लाभ त्यांनी इतर कृष्णवर्णीयांनाही मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी किलिमांजारो होल्डिंग ही कंपनी स्थापन केली. कोका कोलाने दक्षिण आफ्रिकेत निर्गुतवणूक केल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये बॉटलिंग प्रकल्प सुरू केला. उद्योजकता क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना ऑर्डर ऑफ बाओबाब हा पुरस्कार मिळाला होता. नेल्सन मंडेला चिल्ड्रेन फंडचे ते विश्वस्त होते व नॅशनल आफ्रिकन फेडरेटेड चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते.

कृष्णवर्णीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी काम केले. १९२० मध्ये लिम्पोपो येथे जन्मलेल्या मपोन्या यांचा ९९ वा वाढदिवस अलीकडेच साजरा झाला होता. ते शंभरी गाठू शकले नाहीत, पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सुरू केलेले उद्योगविश्व हे कृष्णवर्णीयांसह साऱ्याच वंचितांना प्रेरणा देत राहील.