प्रशासन आणि कार्यकर्ता यांच्यातील संबंध ताणले गेल्यावर प्रशासनाच्या हाती एक जालीम उपाय असतो : कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवायचे किंवा तत्सम ठपके त्यांच्यावर ठेवायचे. कार्यकर्त्यांनी श्रमिकांची दु:खे जाणून घेतली, त्यांच्या बाजूने उभे राहिले, त्यांची स्थिती कशी बदलता येईल याचा शोध घेतला आणि मग ते तिखट भाषेत बोलले, तरीही केवळ भाषा असभ्य आहे म्हणून कार्यकर्त्यांला दूषण देण्याचा हा मार्ग दमनशाहीचा थोडाबहुत अंश असलेली सरकारेही सध्या सर्रास वापरू लागली आहेत. चीन हा तर मानवी हक्क वगैरे सोयिस्करपणे गुंडाळूनच ठेवणारा देश. त्यामुळे तेथील मानवी हक्क कार्यकर्ते पु झिकियांग यांच्यावर तिसऱ्यांदा खटला भरण्यात आला, यात नवल नव्हतेच. त्यांच्यावरील या वेळचा ठपका ‘राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा आणण्यासाठी जनतेस चिथावणी देणे’ असा होता. तो न्यायालयात सिद्ध झालाच.. कार्यकर्त्यांवर हेत्वारोपच करायचे आणि त्यांना बदनाम करून टाकायचे, हा डाव चिनी सरकारने याही वेळी यशस्वी केलाच; पण वेगळे होते ते, न्यायालयाने मागे घेतलेले पाऊल!
मानहानीकारक आरोप खरे ठरविणाऱ्या न्यायालयाने पु झिकियांग यांना तीन वर्षांची कैद सुनावली खरी, पण ‘तिची अंमलबजावणी आताच होणार नाही’ असा जणू उ:शापसुद्धा दिला. न्यायालय एवढे उदार कसे झाले?
याचे कारण, पु झिकियांग यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली ओळख. ते पेशाने वकील, पण मजूरवस्तीतच अधिक काळ घालवणारे, मजुरांच्या व्यथांना कायदेशीर मागण्यांचे किंवा फिर्यादींचे स्वरूप कसे आणता येईल, याचे मार्ग शोधणारे. जगप्रसिद्ध चिनी चित्रकार (दृश्यकलावंत) आय वेवे याला चीनच्या सरकारने तुरुंगात डांबले, तेव्हा त्याचे वकीलपत्रही घेऊन झिकियांग यांनी आय वेवेची सुटका करविली होती. तिआनान्मेन चौकातील १९८९च्या निदर्शनांची चौकशी करा, ही मागणी करणाऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले, म्हणून झिकियांगना पुन्हा अटक झाली. तेव्हा आणि अगदी तीन दिवसांपूर्वी त्यांना शिक्षा सुनावली जात असतानाही, त्यांचे पाठिंबादार चिनी पोलिसांचा मार खात रस्त्यावर निषेधासाठी उतरले होते आणि जगभरच्या मानवी हक्क संघटना अर्थातच झिकियांग यांना दोषी ठरवणाऱ्या चिनी दमनशाहीला धुत्कारत होत्या.
या साऱ्या संघटनांना हास्यास्पद वा भंपक ठरवणे, त्यांची नीतिमत्ता दुहेरी आहे म्हणणे सोपे असते खरे; परंतु पराकोटीच्या दमनयंत्रणांनाही प्रसंगी त्यांचा दबाव मान्य करावा लागतो. हे झिकियांग यांच्या ताज्या खटल्याने दाखवून दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
पु झिकियांग
प्रशासन आणि कार्यकर्ता यांच्यातील संबंध ताणले गेल्यावर प्रशासनाच्या हाती एक जालीम उपाय असतो
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-12-2015 at 00:55 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pu zhiqiang profile