आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ही केवळ अणुऊर्जेच्या शांततामय वापरावरच लक्ष ठेवते असा समज असला तरी प्रत्यक्षात या संस्थेच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे, अण्वस्त्रांवर देखरेख व तपासणीखेरीज पर्यावरण प्रश्न, जलव्यवस्थापन, अन्न सुरक्षा, कर्करोगाशी मुकाबला, झिका- इबोला- मलेरियासारखे रोग रोखणे अशा कामांसाठी अणुसाधनांचा वापर करण्याचे अनेक व्यापक उद्देश या संस्थेपुढे आहेत. या संस्थेच्या प्रमुखपदाची सूत्रे मंगळवारी अर्जेटिनाचे राजनीतिज्ञ राफेल मरियानो ग्रॉसी यांनी हाती घेतली. सदस्य देशांच्या एकमुखी पाठिंब्याने या संस्थेच्या महासंचालकपदी निवड झालेल्या ग्रॉसी यांच्यापुढे, अणुशक्तीचा शांततामय वापर वाढवण्यासह इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षा रोखणे हे मोठे आव्हान आहे. फुकुशिमासारख्या आण्विक दुर्घटनांमुळे असलेल्या धोक्यांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत. अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारातून घेतलेली माघार. त्यानंतर इराणने पुन्हा सुरू केलेले युरेनियम शुद्धीकरण. यावर त्यांनी संयमाची भूमिका दाखवली आहे. इराणला याप्रश्नी कालमर्यादा घालून देण्याने हा प्रश्न चिघळेल, असे त्यांनी म्हटले आहे. इराणला अण्वस्त्र प्रसारबंदी करारातून बाहेर पडण्याची संधी पुरवणे, हे जगाला परवडणारे नाही.
अर्जेटिनात जन्मलेल्या ग्रॉसी यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतलेली असून ते १९८५ मध्ये त्या देशाच्या परराष्ट्र सेवेत दाखल झाले. अर्जेटिनाचे ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, बेल्जियम या देशांतील राजदूत म्हणून त्यांनी काम केले आहे. जीनिव्हा विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात एमए, पीएचडी या पदव्या १९९७ मध्ये घेतल्या. आंतरराष्ट्रीय राजनयातील त्यांचा अनुभव मोठा आहे. १९९७ ते २००० या काळात ते संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नोंदणी गटाचे अध्यक्ष होते. नंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांनी नि:शस्त्रीकरण या विषयावर सहायक महासचिवांचे सल्लागार म्हणून काम केले. २००२ ते २००७ या काळात ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत काम करीत होते. संयुक्त राष्ट्रांत काम करताना त्यांनी उत्तर कोरियाच्या अणुआस्थापनांना भेटी दिल्या होत्या. इराणच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या अनेक बैठकांत त्यांचा सहभाग होता. त्यामुळे हा अनुभव त्यांना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख म्हणून काम करताना उपयोगी पडणार आहे. इराणने अलीकडेच शस्त्रास्त्र नियंत्रण संस्थेच्या केल्सी डॅव्हनपोर्ट यांना स्थानबद्ध केले होते, कारण त्यांनी युरेनियमचे अवशेष सापडल्याचा आरोप केला होता. इराणशिवाय उत्तर कोरियाची अण्वस्त्र निर्मिती ही एक डोके दुखी आहे. त्याचाही मुकाबला कौशल्याने करण्याचे आव्हान ग्रॉसी यांच्यापुढे आहे.