सकृद्दर्शनी एकमेकांचे विरोधक म्हणून वावरणारे, विधिमंडळात एकमेकांविरुद्ध दंड थोपटणारे राजकीय पक्ष कुरघोडीच्या राजकारणातील लाभासाठी गळ्यात गळे कसे घालतात, हे महाराष्ट्राने मार्च २०१५ मध्ये अनुभवले. विधान परिषदेच्या सभापतीविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपच्या मदतीने तो संमतही करून घेतला. सलग दोन वेळा बिनविरोध निवड होऊन सभापतिपदी बसणाऱ्या शिवाजीराव देशमुख यांना अवमानजनक स्थितीत त्या पदावरून पायउतार व्हावे लागले, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला. १९६७ पासून सुरू झालेल्या सुमारे ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या अपमानास्पद अखेरीचे शल्य सोबत घेऊन कदाचित शिवाजीराव देशमुख यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला असेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च २०१५ मधील त्या घटनेनंतर शिवाजीराव देशमुख विधान परिषदेचे सदस्य होते, पण नंतर त्यांच्या राजकारणास ओहोटीच लागली. संसदीय परंपरांशी बांधिलकी मानणारा राजकारणी म्हणून शिवाजीरावांच्या कारकीर्दीची नोंद महाराष्ट्राने केव्हाचीच घेतली आहे. ‘हा संख्याबळाचा प्रश्न नसून संसदीय विचारसरणीचा प्रश्न आहे. मी राजीनामा देणार नाही, तर या ठरावास सामोरा जाणार’ असे स्पष्ट करताना, ‘असंसदीय पद्धतीने कामकाज चालविण्याचा प्रयत्न खेदजनक आहे,’ असे उद्विग्न उद्गार हा प्रस्ताव दाखल होताच शिवाजीरावांनी काढले होते. क्षुल्लक राजकीय हेतूंपोटी संसदीय परंपरांना कसे वेठीस धरले जाते, हे दाखवून ते पदावरून पायउतार झाले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून सांगली जिल्ह्य़ात जवळपास नऊ वर्षे नोकरी करताना शिवाजीरावांनी अफाट लोकसंग्रह बांधला, त्या शिदोरीवर त्यांनी १९६७ मध्ये बिळाशी मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. शिराळा तालुक्याचे नेतृत्व शिवाजीरावांच्या रूपाने उदयास आले, ते वसंतदादा पाटील यांनी नेमके हेरले.  हा तरुण पक्षविस्तारासाठी कामाचा आहे, हे ओळखून वसंतदादांनी त्यांना १९८३ मध्ये राज्याचे गृहराज्यमंत्रिपद बहाल केले. पुढे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीरावांनी वेगवेगळ्या काळात अनेक मंत्रिपदे भूषविली, आणि प्रत्येक पदावर आपली मोहोरही उमटविली. शिराळा तालुका हा दुर्गम व डोंगरी प्रदेश असल्याने त्याच्या विकासासाठी त्यांनी सरकारातील आपले वजन सातत्याने खर्ची घातले, आणि डोंगरी विभाग विकासाच्या योजना राज्यात आकारास आल्या. गृहराज्यमंत्री असताना जिल्ह्य़ातील अनेक तरुणांना पोलीस दलातील नोकरीच्या संधी मिळवून दिल्या. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उत्कृष्ट संसदपटू, काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता, अशा अनेक भूमिका शिवाजीरावांनी प्रामाणिकपणे बजावल्या.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivajirao deshmukh profile
First published on: 16-01-2019 at 00:33 IST