‘तुळू शब्दरत्नाकर’चे सहा खंड त्यांनी तयार केल्यामुळे तुळू ही ‘बोली’ नसून ‘भाषा’च आहे, यावर  शिक्कामोर्तब झाले. पण बोली आणि भाषा यांवर असलेले त्यांचे अभ्यासू प्रेम त्यापेक्षा मोठे होते. कूर्ग भागातील ‘कुरुबा’चा संशोधनपर अभ्यास त्यांनी पहिल्यांदा केला. बिदर भागात द्वैभाषिक राज्यामुळे कन्नडवर कसा परिणाम झाला  हे अभ्यासले. भाषा आणि बोलीसह संगीत येते, नाटय़गुण असलेले ज्ञानरंजनाचे प्रकार येतात आणि मिथकेसुद्धा येतात, त्या सर्वाचा त्यांनी अभ्यास केला.. याचे महत्त्व ज्यांना कळणार नाही त्यांच्यासाठी त्यांची सोप्पी ओळख म्हणजे – ‘तुळू, कन्नड, मल्याळम या दक्षिणी भाषांसह इंग्रजी, हिंदी, फ्रेंच आणि सेनेगल देशातली वोलोफ भाषा या सर्व भाषा त्यांना येत असत!’

उलियार पद्मनाभ उपाध्याय हे बहुभाषाकोविद आणि भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांचे निधन १७ जुलै रोजी झाले, त्यामुळे वारसा आणि आधुनिक ज्ञान यांची सांगड घालणारा एक विद्वान देशाने गमावला. ते ८८ वर्षांचे होते. पिढीजात उपाध्यायपदामुळे संस्कृतचा वारसा आणि सुखवस्तूपणा घरातच असूनही, त्यांनी ‘पाश्चात्त्य पद्धतीचे’ शिक्षण घेण्याचे ठरवले आणि उशिराच- २१ व्या वर्षी- ते मॅट्रिक झाले. मात्र कधी ग्रंथपाल, कधी शाळाशिक्षक अशा नोकऱ्या करीत ते पुढेही शिकत राहिले. संस्कृत, कन्नड आणि भाषाशास्त्र या तीन विषयांत केरळ विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाच्या ‘एमए’ पदव्या त्यांनी मिळवल्या. त्यांच्या घडणीत पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेज’चा वाटा मोठाच. इथेच ते पीएच.डी. झाले आणि ज्ञानमार्गाची दारे खुली झाली.

कन्नड भाषा आणि संबंधित बोलींचा अभ्यास, हे त्यांनी आपले विशेष क्षेत्र मानले. त्यात गाडून घेतले. परंतु या सखोलतेला व्याप्तीदेखील होती. नेग्रिटो भाषाकुळाचा अभ्यास त्यांनी वाढवला आणि त्या कुळाशी द्राविडी भाषांचा तौलनिक संबंध अभ्यासला. १९७३ ते १९८१ दरम्यान डकार (सेनेगल) विद्यापीठाच्या ‘इंडो-आफ्रिकन सिव्हिलायझेशन्स’ विभागात ते आधी अभ्यागत व्याख्याते, तर पुढे विभागप्रमुख होते. १९७८ पासून लंडन विद्यापीठातही ते अभ्यागत व्याख्याता म्हणून जात. त्यांच्या पत्नी सुशीला याही ज्ञानमार्गी, त्यामुळे अनेक पुस्तके या दाम्पत्याने मिळून लिहिली. गावी पिढीजात मंदिरालगत घर बांधून हे दोघे राहात. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांत ‘राज्योत्सव प्रशस्ती’ वगळता सर्व पुरस्कार प्रादेशिक आहेत आणि अशा विद्वानांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याएवढी सांस्कृतिक प्रगती भारताने केलीच नाही हेही उघड आहे.