News Flash

अश्रूंची झाली फुले

वयाबरोबर रडण्याचे प्रकार बदलत जातात याचाही अभ्यासकांनी वेध घेतला आहे. बाळ रडते तेव्हा त्यात दुखणे, खुपणे किंवा भूक लागणे ही करणे प्रामुख्याने असतात.

| December 24, 2013 06:37 am

वयाबरोबर रडण्याचे प्रकार बदलत जातात याचाही अभ्यासकांनी वेध घेतला आहे. बाळ रडते तेव्हा त्यात दुखणे, खुपणे किंवा भूक लागणे ही करणे प्रामुख्याने असतात. उद्देश हा की त्यावर आपला पालक लक्ष देईल आणि ती अडचण सोडवेल. मात्र जसजसे मूल मोठे होते तसतशी त्याची रडण्याची कारणे बदलू लागतात. अभ्यासकांच्या मते मूल एका वर्षांच्या आसपास पोचते तेव्हा आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते रडण्याचा उपयोग करते.
‘‘डोळ्यामधले आसू पुसतील ओठांवरले गाणे’’ हे भावगीत प्रसिद्ध आहे. ते एक जीवन तत्त्वज्ञानही सांगते, पण तत्त्वज्ञालाही दाढदुखी होते त्याप्रमाणेच अनेकदा डोळ्यातील अश्रू थांबविणे शक्य नसते आणि थांबवायचे तरी कशासाठी? निसर्गाने जर अश्रूंची योजना केली असेल तर त्यामागे काहीतरी प्रयोजन असणारच. डोळे हा शरीराचा अतिशय नाजूक अवयव आहे.  त्यामुळे त्यांची जपणूक करण्याची निसर्गाने केलेली योजनाही तितकीच क्लिष्ट परंतु नजाकतदार आहे. अश्रू हा त्यातील महत्त्वाचा भाग.
डोळ्यांत अश्रूंचे एक कायमस्वरूपी आवरण असते. हे आवरण तीन थरांचे बनलेले असते. या तीन थरात एक असतो तो मेदाचा बनलेला असतो जो पाण्याच्या दुसऱ्या थराला अवगुंठीत करतो आणि त्या पाण्याला गालांवर ओघळण्यापासून रोखतो. या पाण्याच्या थरात लसोझीमसारखे र्निजतुक करणारे घटकसुद्धा असतात. तिसरा थर हा चिकट पदार्थाचा बनलेला असतो आणि तो अश्रूंचा पडदा समप्रमाणात सर्व भागावर राहील याची काळजी घेतो. अश्रू पडद्याची जाडी महत्त्वाची असते आणि त्यावर लेन्स लावता येणार का कारण प्राणवायू अधिक लागणार का वगैरे गोष्टी अवलंबून असतात.
अर्थात घामाचे जसे प्रकार असतात त्याप्रमाणेच अश्रू-अश्रूंमध्ये देखील फरक असतात. काही अश्रू हे दु:ख प्रकट करणारे असतात तर काही हे नक्राश्रू असतात. काही कांदे कापताना येतात. तेव्हा सर्वच अश्रूंनी समोरच्याने विरघळून जाण्याचे कारण नसते. किंबहुना निसर्गाने अश्रू येण्याची जी योजना केलेली आहे त्याच्या निर्मितीच्या पद्धतीत देखील फरक केला आहे आणि पर्यायाने अश्रूंच्या घटकात देखील. अश्रूंचे सामान्यपणे तीन प्रकार असतात. पहिला प्रकार असतो त्याला बेसल टिअर्स म्हटले जाते. दुसरा असतो तो रिफ्लेक्स टिअर्स आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे इमोशनल टिअर्सचा. कोणत्या वेळी कोणत्या अश्रूंनी डोळ्यात गर्दी करायची याचे ‘संकेत’ शरीररचनेत पक्के बसविलेले असतात. त्यामुळे डोळ्यात काही गेले तर येणारे अश्रू आणि समजा वेदना झाली तर येणारे अश्रू यात स्वाभाविकच अंतर असते.
याखेरीज वयाबरोबर अश्रूंचे प्रमाण कमी-अधिक होते का यावरही संशोधकांनी संशोधन केलेले आहे. इतकेच काय पण पुरुषांमध्ये रडण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत कमी असते का आणि असेलच तर त्यामागील कार्यकारणभाव काय याचादेखील शोध घेण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला आहे. अर्थातच सगळ्याचे अंतिम सत्य उलगडले आहे असा कोणाचाच दावा नसतो. पण जे संशोधनातून पुढे येते त्याने अनेक समजुतींना छेद जाऊ शकतो त्याप्रमाणेच कितीतरी अनुभवाधिष्टीत समजांना संशोधनामधून आधार मिळाल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. अश्रू म्हणजे सामान्यपणे डोळ्यांना संरक्षण पुरविणारे वंगण आहे. डोळे साफ ठेवण्याचे काम अश्रू करतात. वस्तुत डोळ्यांमधील कॉíनआला कायम ओले ठेवण्याचे महत्त्वाचे काम अश्रू करत असतात. या अश्रूंना बेसल टिअर्स असे म्हटले जाते. स्वच्छ ठेवतात. ते कोरडे पडण्यापासून बचाव करतात. हे जे अश्रू तयार होतात त्यात पाणी असते त्याप्रमाणेच क्षार असतात. किंबहुना या बेसल अश्रूंची निर्मिती रोज आणि सतत होत असते. या अश्रूंना डोळ्यातून मात्र बाहेर वाट मिळत नाही तर ते नाकाच्या पोकळीत जातात (नेझल कव्हिटि). हे अश्रू यासाठी महत्त्वाचे असतात की ते डोळे दुसऱ्या  प्रकारचे जे अश्रू असतात ते प्रतिक्रियात्मक असतात. त्यांना रिफ्लेक्स टिअर्स म्हटले जाते. म्हणजे जर धूळ किंवा धूळ डोळ्यात गेली किंवा कांदा चिरताना त्यातून बाहेर पडणारी रसायने डोळ्यात गेली तर डोळ्यांना इज पोचण्यापासून बचाव व्हावा म्हणून प्रतिक्रिया म्हणून अश्रूंची निर्मिती होते. अर्थात हे सारे प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे होते पण तरीही ते सर्व संदेशवहनावर अवलंबून असते. धूर किंवा धूळ किंवा असे काहीही ज्याने डोळे चुरचुरू लागतात अशांशी डोळ्यांचा संपर्क आला की कॉíनआ मेंदूला तसा संदेश पाठविते; मग मेंदू पापण्यामधील अश्रूग्रंथींना संप्रेरके पाठवितो ज्यामुळे अश्रूंची निर्मिती होऊ लागते. हे अश्रू धूर, धूळ असल्या पदार्थाना साहजिकच डोळ्यांमध्ये पोचण्यापासून अटकाव करते आणि डोळ्यांचे संरक्षण होते.
तिसऱ्या प्रकारचे अश्रू असतात भावनिक अश्रू (इमोशनल टिअर्स) म्हणजेच भाऊकतेमुळे तयार झालेले अश्रू! साधारणपणे कोणत्याही सजीवाची आत्यंतिक दु:ख किंवा तीव्र आनंद यांना प्रतिक्रिया सारखीच असते असे म्हणतात. मांजरीचे पिल्लू हरविले आणि तिला अचानक उंदीर सापडला तर ती सारख्याच पद्धतीने म्याव म्याव करते असे म्हणतात. माणूससुद्धा अतिशय आनंदी झाला किंवा त्याला अतीव दु:ख झाले तर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. चित्रपटात ‘अरे हे तर आनंदाचे अश्रू आहेत’ वगैरे संवाद नेहेमी ऐकायला मिळतात. वेदना, मानसिक त्रास, दडपण किंवा अतीव आनंद अशा सर्व भावनांच्या वेळी अश्रू टपकू लागतात, पण तरीही हे अश्रू रिफ्लेक्स अश्रूंपेक्षा निराळे असतात. संशोधकांनी यावर देखील अभ्यास केला आहे. कांदा चिरल्यावर डोळ्यांतून येणारे पाणी आणि एखादा मेलोड्रामा पाहताना त्यात गुंतून गेल्याने येणारे अश्रू संशोधकांनी गोल केले आणि त्यांचे विश्लेषण केले. त्यात त्यांना असे आढळले की रिफ्लेक्स अश्रू हे मुख्यत्वे -अगदी सगळेच म्हटले तरी चालेल- पाणीच असते त्यातील  भावनेशी संबंधित अश्रूंमधील घटक मात्र निराळे असतात. या अश्रूंचे प्रयोजन केवळ वंगण म्हणून भूमिका बजावायचे नसते; तर भावनांचा जो प्रचंड कल्लोळ निर्माण झालेला असतो त्यांचा निचरा करणे हे असते. याचेच प्रतििबब या अश्रूंच्या घटकात पडलेले दिसते. एक तर या अश्रूंमध्ये प्रोलक्टिन नावाचे प्रथिन आढळते. स्तनातील दुधाच्या निर्मितीचे नियंत्रण करण्यात देखील हा घटक भूमिका बजावतो. मानसिक दडपणाचे निदर्शक असणारी काही संप्रेरकेदेखील या अश्रूंमध्ये सापडतात; एवढेच नव्हे तर दडपण कमी करण्यासाठी जी एण्डॉíफन्स कारणीभूत असतात त्यांचाही समावेश या अश्रूंमध्ये झालेला दिसतो. अर्थातच या सगळ्याचे नियंत्रण मेंदू करत असतो हे ओघानेच आले.
बालपण संपून वयात येईस्तोवर मुलगा आणि मुलगी यांचे रडण्याचे प्रमाण साधारणपणे समसमान असते असा संशोधकांचा दावा आहे. पण वयात आल्यावर मुलांमध्ये टेस्टोस्टिरोनचे प्रमाण वाढू लागते आणि रडण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. त्याउलट मुलींमध्ये एस्त्रोजेन वाढते. इमोशनल अश्रूंमध्ये प्रोलक्टिनचा अंश असतो हे वर उल्लेखिले आहे . त्याचा संबंध येथे जोडून पाहावयास हवा. मुलींमध्येच हे घडू शकते. त्यामुळे वयात येण्याच्या वर्षांमध्ये मुलांपेक्षा मुली अधिक रडतात असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. वाढत्या वयाबरोबर या संप्रेरकांचे प्रमाण अनुक्रमे पुरुष आणि स्त्रियांत कमी झाले की रडण्याचे प्रमाणही एका पातळीवर येऊन जाते असेही संशोधक सांगतात.
‘क्राईंग: दि मिस्ट्री ऑफ टिअर्स’ चे लेखकद्वय विलिअम फ्रे आणि मुरिअल लांग्सेथ यांचे असे म्हणणे आहे की, त्या  वर्षांत मुलांच्या तुलनेत मुली चौपट रडतात. फ्रे यांच्या मते पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये प्रोलक्टिनचे प्रमाण साठ टक्क्यांनी जास्त असते. हे प्रमाण अधिक असल्याने त्याचा परिणाम एण्डोक्राईन यंत्रणेला अधिक कार्यरत करण्याची भूमिका हे प्रथिन बजावते. त्याचा परिणाम रडण्यात होतो. एका सर्वेक्षणात पुरुष आणि स्त्रियांना गेल्या वर्षभरात ते कितीवेळा रडले याची आकडेवारी ठेवण्यास सांगितले गेले होते. त्यातून असे दिसून आले की पुरुष वर्षभरात सरासरी सतरा वेळा रडले असतील तर स्त्रिया चौसष्ट वेळा रडल्या. अर्थातच हे सरासरी आणि तरीही प्रातिनिधिक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. भावनांचा अतिरेक झाला की डोळ्यावाटे त्यांचे मनावरील दडपण कमी करण्याच्या दृष्टीने अश्रू अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात हे खरेच. अश्रू येणे हे म्हणूनच कमीपणाचे लक्षण मानण्याचे कारण नाही. उलट मानसोपचारतज्ञ असा सल्ला नेहेमी देतात की भावना दाबून ठेवू नका. त्याने मानसिक ताण वाढेल आणि ते जीवावरदेखील बेतू शकते. शरीरातील चयापचय, शारीरिक बदल, शारीरिक आणि मानसिक ताण या सगळ्याचा संबंध अश्रूंशी आहे. तेव्हा अश्रू हे कमकुवतपणाचे लक्षण न मानता निसर्गाची योजना म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. अश्रू कोणते आहेत हे परिस्थिती ठरवते- इमोशनल अश्रू हे तर वरदान मानले पाहिजे आणि आनंदाचे अश्रू हेसुद्धा! एरवी भावनांचा निचरा झाला नसता तर माणसावर काय परिस्थिती उद्भवली असती याचा अंदाजच केलेला बरा! हेही खरे की बेसल अश्रू डोळ्यातील स्वच्छतेची काळजी घेतात तर भावनेमुळे आलेले  अश्रू भाऊकतेची आणि त्यामुळेच अनेकदा पश्चात्तापाचे अश्रू मनही धुऊन काढतात! अश्रूंची फुले होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2013 6:37 am

Web Title: tears is important part which is created by god
टॅग : Sci It,Science 2
Next Stories
1 विश्वाचे प्रसरण
2 लेसरचे वरदान
3 चमकता कृष्णहिरा
Just Now!
X