नासाच्या हबल अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंतचा सर्वात दूर अंतरावर असलेला सुपरनोव्हा (अति नवतारा) शोधून काढला आहे. या सुपरनोव्हाचे नामकरण युडीएस १० विल असे करण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष व्रुडो विल्सन यांचे नाव त्याला देण्यात आले असून तो ‘ला सुपरनोव्हा’ या विशिष्ट गटातील आहे.
कृष्ण ऊर्जेचे स्वरूप, अवकाशाचा विस्तार यांचे मापन करण्यासाठी या चमकदार अति नवताऱ्याची निरीक्षणे उपयुक्त ठरू शकतात. कृष्ण ऊर्जेमुळे अवकाशाचा विस्तार होत आहे.
विश्वाच्या अभ्यासासाठी अतिशय दूरवरची खिडकी या सुपरनोव्हाच्या शोधामुळे उघडली असून त्यामुळे ताऱ्यांचे स्फोट कसे होतात यावर नवा प्रकाश पडणार आहे असे बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे डेव्हीड ओ जोन्स यांनी म्हटले आहे. ते या संशोधन प्रबंधाचे प्रमुख लेखक आहेत. विश्वाच्या उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी या सुपरनोव्हाचे निरीक्षण उपयुक्त आहे.
तीन वर्षांचा हबल कार्यक्रम २०१० मध्ये सुरू झाला असून त्यात ला सुपरनोव्हा सापडला आहे. विश्वाची निर्मिती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर त्यात काही बदल झाले किंवा कसे यावर संशोधन सुरू आहे. हबलच्या वाइट फील्ड कॅमेरा ३ ची छायाचित्र स्पष्टता व इतर बाबींचा उपयोग यात झाला आहे. बाल्टिमोर येथील स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूटचे अॅडम रीस यांनी सर्व प्रकारच्या व विविध अंतरावरच्या शंभराहून अधिक सुपरनोव्हांचा शोध लावला आहे. ते २.४ अब्ज वर्षे ते १० अब्ज वर्षे या काळातील आहेत. ला सुपरनोव्हा प्रकारचे आठ सुपरनोव्हा सापडले आहेत. त्यात एसएन विल्सनचा समावेश आहे. या विल्सन ताऱ्याचा स्फोट ९ अब्ज वर्षांपूर्वी झाला होता.