जवळजवळ अध्र्या शतकाच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांनतर मंगळ मोहिमांच्या अपयशांच्या संख्येत घट होऊ लागली होती. सन २००१ आणि २००३ मध्ये पाठवण्यात आलेले ‘मार्स ओडिसी’ आणि ‘मार्स एक्सप्रेस’ हे दोन्ही ऑरबायटर (मंगळाभोवती परिक्रमा करणारी कृत्रिम उपग्रह) अजूनही कार्य करत आहेत. त्यांच्या जोडीला लँडर (मंगळावर उतरवण्यात आलेली याने) उतरवण्यात यश मिळत होते.
कुठल्याही ग्रहाचा वेध घेण्याची, ऑरबायटर आणि लँडरनंतरची, पुढची पायरी म्हणजे त्या ग्रहावर फिरणं. अशा या ग्रहांवर फिरत्या यानांना (मग ते अंतराळवीरांनी चालवले असले तरी) रोव्हर म्हणण्याची पद्धत रूढ झाली. रोव्हर – ज्याचा शब्दश: अर्थ म्हणजे भटके. असे फिरते यान एखाद्या ग्रहावर पाठवल्याने त्या मोहिमेचा उपयोग कित्येक पटीने वाढतो.
आतापर्यंत अशा रोव्हरनी चंद्रावर आणि मंगळावर आपल्या चाकांच्या खुणा उमटवल्या आहेत. पाथफाइंडर बरोबर गेलेल्या सोजर्नर रोव्हरची चर्चा आपण मागे केली होती. मार्स एक्सप्रेसच्या पाठोपाठ १० जून २००३ रोजी स्पिरिट रोव्हरला पाठवण्यात आले होते. स्पिरिट लँडरने ४ जानेवारी २००४ रोजी आपल्या रोव्हरला यशस्वी रीत्या मंगळावर उतरवलं. स्पिरिट लँडरचं वैज्ञानिक नाव मार्स एक्सप्लोरेशन रोव्हर- ए (किंवा एम ए आर-ए ) होतं. ज्या ठिकाणी या स्पिरिट लँडरला उतरवण्यात आलं होतं, तिथे वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ही जागा होती गुसेव विवर; जे आपल्या लोणार विवरासारखेच उल्का पाषाण पडल्याने तयार झाले होते.
स्पिरिट रोव्हर हे सहा चाकांचे फिरते यान होते. त्याची यंत्रणा अशी केली होती, की ते कुठल्याही प्रकारच्या पृष्ठभागावर ते फिरू शकणार होतं. त्याची उंची दीड मीटर होती तर लांबी-रुंदी २.३ बाय १.६ होती. या संपूर्ण रोव्हरचे वजन १८० किलो होतं. हे यान अशा प्रकारे तयार करण्यात आलं होतं की ते अगदी ३० अंशांच्या उतारावर (किंवा चढावावर) चालू शकेल. याची जास्तीत जास्त गती ताशी १८० मीटर किंवा ५ सें.मी दर सेकंद होती पण सरासरी गती सेकंदाला १ सें.मी इतकीच होती. यात बसवलेले सोलार पॅनल्स १४० वॉटचा दाब सुमारे ४ तास देऊ शकत होते. त्यातील रिचार्जेबल सेलमुळे मंगळावरच्या रात्री पण रोव्हर काम करू शकत होते. तर रोव्हरची उणे ४० ते ४० अंश सेशियस इतक्या तापमानात काम करण्याची क्षमता होती.
मंगळावर उतरल्यावर सर्व प्रथम स्पिरिट रोव्हरने मंगळाची नयनरम्य छायाचित्रे पृथ्वीला पाठवली. या चित्रांचा अभ्यास करून मग शास्त्रज्ञांनी या रोव्हरला नेमकं कुठे पाठवायचं याची आखणी केली. या चित्रातून ज्या ठिकाणी रोव्हर उतरलं होतं ती जागा किंचित उतारावरची जागा होती. तिथे अनेक दगड विखुरलेले दिसत होते. तर दूर क्षितिजावर २७ किलोमीटरच्या अंतरावर डोंगर दिसत होते.
हे यान उतरल्यानंतर एक महिन्याच्या आत १ फेब्रुवारी रोजी ती कोलंबिया स्पेस शटलची पृथ्वीच्या वातावरणात स्फोट होण्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यात इतर अंतराळवीरांबरोबर कल्पना चावला पण होती. त्यांच्या स्मरणार्थ ज्या स्थानी स्पिरिट यान उतरलं होतं, त्याला ‘कोलंबिया मेमोरियल स्टेशन’ असे नाव देण्यात आलं
मंगळावर दिवस मोजण्याकरिता ‘सोल’ हा शब्द रूढ झाला आहे एक सोल म्हणजे मंगळावरचा एक दिवस. याचा कालावधी २४ तास, ३९ मिनिटे आणि ३५.२४४ सेकंद आहे. तर मंगळावरचं एक वर्ष सुमारे ६६८.६ सोल किंवा ६८६.९५ दिवस (पृथ्वीवरचे) आहे. जेव्हा लँडर मंगळाच्या पृष्ठभागवर उतरते तो क्षण शून्य सोल असतो आणि सोलचे आकडे वाढतच जातात. यांना पृथ्वीसारखे महिने आणि वर्ष नसतात. आणि म्हणून प्रत्येक मोहिमेचा सोल वेगवेगळा असतो.
स्पिरिट रोव्हरचा सुरुवातीचा कालावधी ९० सोल आखण्यात आला होता. पण नंतर तो वाढवत नेऊन या रोव्हरने २२ मार्च २०१० पर्यंत काम केलं म्हणजे सुमारे सहा वर्ष किंवा मंगळाच्या वेळेनुसार २६२३ सोल (२६९५ दिवस). या कालावधीत स्पिरिट रोव्हर ने ७ किलोमीटर आणि ७३० मीटरचा प्रवास केला.
या काळात स्पिरिटने अनेक निरीक्षणे घेतली. त्याने एका विशिष्ट यंत्राचा वापर करून मंगळावरच्या एका दगडाला भरडून त्यात ४.५ सें.मी. व्यासाचा आणि २.६ मि.मी. खोल खड्डा केला. पृथ्वीव्यतिरिक्त असा भरडून खड्डा करण्याची ही पहिलीच वेळ होती. यामुळे आपल्याला दगडाच्या आतला भाग बघता आला.
९ मार्च २००५ रोजी रोव्हरच्या सोलर पॅनलची क्षमता जी तेव्हा ६० टक्केच राहिली होती, ती अचानक ९३ टक्के वाढली होती. त्यानंतर १० मार्च रोजी रोव्हरने मंगळावरील वावटळीची चित्र पाठवली. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून मग शास्त्रज्ञांनी अंदाज केला, की कदाचित ९ मार्चच्या रात्री एखादी वावटळ रोव्हरवरून गेली असावी आणि त्याने रोव्हरच्या सोलर पॅनलवर बसलेली धूळ उडवली असावी. अशा प्रकारच्या मंगळावरच्या वावटळीचे चित्र पाथफाइंडरने पण पाठवलं होतं पण स्पिरिटच्या १० मार्चच्या चित्रामागे आणखी दोन वावटळी दिसत होत्या. १३ मार्च २००६ रोजी स्पिरिटच पुढचं उजवं चाक अडकून बसलं तेव्हा स्पिरिटला उलटय़ा दिशेने चालवण्यात आलं. याचा एक वेगळाच फायदा असा झाला, की या अडकलेल्या चाकामुळे मंगळाची माती खणली गेली आणि त्यामुळे या मातीच्या खालच्या भागाची पण निरीक्षणे मिळाली.
१ मे २००९ रोजी तर स्पिरिट मंगळाच्या मातीत रुतून बसलं – त्याचा पुढचा प्रवास मग शक्य झाला नाही तरी सुद्धा त्याची यंत्रणा चोख काम करत होती. यान असे रुतून बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती पण ८ महिन्यांच्या प्रयत्नाअंतीही नासाला यश आले नाही. या कालावधीत सुद्धा स्पिरिट रोव्हरची इतर यंत्रणा चालू होती आणि ते निरीक्षणे आपल्याला पाठवत होते. पण २२ मार्च २०१० रोजी त्याचा पृथ्वीशी संपर्क कायमचा तुटला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2013 रोजी प्रकाशित
स्पिरिट रोव्हर
जवळजवळ अध्र्या शतकाच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांनतर मंगळ मोहिमांच्या अपयशांच्या संख्येत घट होऊ लागली होती. सन २००१ आणि २००३ मध्ये पाठवण्यात आलेले ‘मार्स ओडिसी’ आणि ‘मार्स एक्सप्रेस’ हे दोन्ही ऑरबायटर (मंगळाभोवती परिक्रमा करणारी कृत्रिम उपग्रह) अजूनही कार्य करत आहेत.

First published on: 16-07-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spirit rover