|| माधव चितळे

चाळीसगावचे रेल्वे स्थानक म्हणजे धुळे शहराला रेल्वेने जोडणारे जंक्शन. प्रवाशांपेक्षाही मालवाहतूक अधिक महत्त्वाची; मुख्य रेल्वे मार्गानी येणाऱ्या सामानाची धुळ्याकडे जाणाऱ्या छोटय़ा गाडीत चढ-उतार करणे यासाठी ते नेहमी गजबजलेले. खुद्द चाळीसगाव ही सुद्धा मोठी बाजारपेठ. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच्या मालाची ने-आण हा श्रमिकांसाठी मोठा रोजगार, उपजीविकेचा मोठा आधार. त्यात रमलेले नागूदादा. ते एक छोटीशी व्यायामशाळाही गावाच्या वेशीजवळ चालवीत. एरव्ही निरक्षर तरी समाज संपर्क व्यापक, उत्तम व हृद्य. गावात महानुभाव संप्रदायातले वजनदार, प्रतिष्ठित, निव्र्यसनी व धार्मिक प्रवृत्तीचे.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

चाळीसगावांत माझे वडील व्यवसायाने वकील, सामाजिक कामांमध्येही आघाडीवर. त्यातून मागास वस्तींशी चांगला संपर्क. नागूदादांची व त्यांची ओळख अशा कामांमधून झाली. परिश्रमांतून मिळवलेल्या व साठवलेल्या थोडय़ा पैशातून नागूदादांनी नाल्याकाठची थोडीशी पडीक जमीन विकत घेतली होती. तिचे उत्तम शेतीत रूपांतर करण्याची त्यांची स्वकष्टांतून धडपड चाले. उन्हाळ्यात त्यांच्या शेताजवळच्या ओढय़ात टरबुजे-खरबुजे लावीत. एखादे दिवशी त्यांतील निवडक फळे आम्हाला प्रेमाने घरी आणून देत.

नोकरीनिमित्ताने माझी मुंबईत नेमणूक होती. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या ‘यशोधन’मध्ये मी वास्तव्याला होतो. माझी मधली कन्यका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनी होती. एका अल्पशा दुखण्याने ती अचानक दगावली. बातमी कर्णोपकर्णी चाळीसगावी पोचली. नागूदादांना कळली. एरव्ही कधी रेल्वेप्रवासाचा वापर न करणारे नागूदादा तडक रेल्वे गाडीत बसले व अपरिचित अशा बोरिबंदर स्थानकावर येऊन उतरले. त्यांच्याबरोबर एका चिठ्ठीवर त्यांनी माझा मुंबईचा पत्ता लिहून आणला होता. रस्त्यावर अनेकांना तो दाखवत दाखवत रस्त्याने चुकतमाकत पायी चालत चालत ते शेवटी ‘यशोधन’मध्ये येऊन पोचले. एक दिवस सकाळी दारावरची घंटी वाजली म्हणून मी दार उघडले – तर समोर अश्रुपूर्ण डोळ्यांनी नागोदादा उभे. त्या दिवशी घरातील सर्वाशी त्यांचा डोळ्यांनीच संवाद झाला. चाळीसगावहून माझे वडीलही स्वतंत्रपणे आधी माझ्याकडे येऊन पोचलेलेच होते.

वडिलांना भेटायला म्हणून मी चाळीसगावला गेलो की, नागूदादांच्या शेताकडे माझे आपोआप पाय वळत. घामाच्या धारांनी सिंचित केलेले त्यांचे बहरणारे शेत पाहून आनंद होई. वडिलांच्या सहवासांतून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नैष्ठिक स्वयंसेवक झाले होते. त्यांच्या मागास वस्तीत ते संघाची शाखा चालवीत. त्यामुळे संघबंदीच्या काळात वेळोवेळी जी धरपकड झाली, त्यात त्यांना नेहमीच प्रथम अटक होई. बंदीच्या विरोधात सत्याग्रहासाठी अनेकांना प्रोत्साहित केले या आरोपाखाली त्यांना प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण त्याचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. तो एक नशिबाचाच भाग आहे असे म्हणून त्या कौटुंबिक अडचणीच्या काळाकडे ते दुर्लक्ष करीत, अविचलित असत. हातावर पोट असलेल्या त्यांच्यासारख्या श्रमिक व्यक्तीचे असे धीरोदात्त वागणे इतरांनाही प्रेरणादायी ठरे.

त्यांच्यावरच्या एका कौटुंबिक आपत्तीच्या प्रसंगात मी त्यांना मुंबईहून सांत्वनाचे पत्र पाठवले होते. वैयक्तिक संबंधातला जिव्हाळा असा की ते पत्र त्यांनी त्यांच्या बंडीच्या खिशांत सतत बाळगले – प्रेमाचा व धीराचा शब्द या भावनेने. चाळीसगावी त्यांना भेटायला गेलो की, मला ते पत्र आठवणीने दाखवत. अशा प्रकारची निव्र्याज भावनेने जोडली गेलेली जी माणसे होती, तो विपरीत परिस्थितींतही कुटुंबाचा मोठा आधार होता.

त्यापैकीच आणखी एक उमदे तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्ता कुलकर्णी यांचे. वयाने माझ्यापेक्षा आठ वर्षांहून पुढे. पण वडीलभावाची छत्रछाया असावी असे त्यांचे कठीण काळांतले आश्वासक वागणे. माझे वडील चाळीसगावचे संघचालक. स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर हिंदू महासभेच्या अनेक कार्यक्रमांत व भागलपूरच्या सत्याग्रहांतही भाग घेतलेले. त्यामुळे हिंदुत्वाचा तो विचार दडपून टाकण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांनी कधी घरात घुसून मारहाणीचा प्रसंग निर्माण केला. घराच्या ओसरीत मैला आणून टाकला. गुंडांनी घरावरच्या दगडफेकीची तयारी केली. पण अशा अडचणींची नुसती कुणकुण जरी लागली तरी दत्ता कुलकर्णी हनुमानाप्रमाणे धावत येऊन आम्हा भावंडाभोवती सुरक्षेची ढाल निर्भयपणे उभी धरत. अशा परिस्थितीत वडील दीर्घकाळ तुरुंगात असताना आम्हा मुलांना भीती वाटू नये म्हणून अनेक दिवस-रात्री आम्हांला सोबत म्हणून झोपायला येत. त्यामुळे माझा अभ्यास निर्विघ्नपणे चाले व वर्गातला पहिला क्रमांक टिकून असे. म्हणून त्या शैक्षणिक यशाचे श्रेय हे खरे दत्ता कुलकर्णीचे!

पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी व माझा धाकटा भाऊ विवेक खोली घेऊन पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहाजवळ राहात असू. संघबंदीच्या काळात ज्यांची चांगली केंद्रीय सरकारी नोकरी गेली, अशा मेहेंदळेंनी विद्यार्थ्यांसाठी डबे देण्याचा तात्पुरता व्यवसाय सुरू केला होता. त्यांचा डबा आम्ही घेत असू. आमच्या समोरच एक कुलकर्णी कुटुंब एका खोलीत राही. संघसत्याग्रहामुळे त्यांचीही केंद्र सरकारची चांगली प्रतिष्ठेची नोकरी गेली होती. त्यामुळे त्यांच्या घरात सतत आर्थिक ओढाताण व चणचण असे. तरी ते सर्व कुटुंबीय त्यांच्या वयस्कर आईसकट, आम्ही त्यांना आजी म्हणत असू, धीराने राहात. चाळीसगावाहून पुण्यात नव्यानेच राहायला आलेल्या आम्हा दोघा भावंडांना त्यांचा फार आधार वाटे. अभियांत्रिकीचे माझे शिक्षण चालू होते. मला अभ्यासाला सकाळी पुरेसा वाव मिळावा म्हणून त्या आजी आम्हा भावंडांसाठी सकाळी लवकर दूध घेऊन ठेवून-तापवून तयार ठेवायच्या. त्याचे पारिश्रमिक व आनुषंगिक खर्च म्हणून मी त्यांना काही देण्याचा प्रश्नच नव्हता – त्यांना ते आवडले नसते. अशी अनाहूत प्रेम करणारी आधारभूत माणसे अबोलपणे आपल्या श्रेयसाचा पाया कसा घालीत असतात याचा त्या काळांत अनुभव आला.

वसंतराव येवलेकर चाळीसगावला संघबंदीपूर्वीच्या काळात संघप्रचारक म्हणून आले होते. त्या वेळी दृढ झालेले येवलेकर कुटुंबीयांशी निकटचे कौटुंबिक संबंध. विद्यार्थी जीवनात अखेरच्या वर्षांत व नोकरीच्या प्रारंभीच्या काळात त्या कुटुंबाची छत्रछाया मला पुण्याच्या वास्तव्यात लाभली, उपयोगी पडली. मी त्यांच्याकडेच राहात असे. लोकसेवा आयोगाच्या माझ्या स्पर्धा परीक्षा निर्णयांनंतर शासकीय नियमांप्रमाणे पोलिसी चौकशीसाठी त्यांच्याकडे साध्या वेषातले पोलीस आले. येवलेकरांचा पत्ता हाच माझा पुण्यातला पत्ता होता. ‘बाळदादा’ – येवलेकर कुटुंबातले ज्येष्ठ बंधू व कुटुंबप्रमुख. त्यांनी अत्यंत कुशलतेने ती चौकशी हाताळली, म्हणून शासकीय नोकरीतले माझे प्रवेश – राज्यीय आणि केंद्रीय असे दोन्ही – निर्विघ्नपणे शक्य झाले.

शैक्षणिक जीवनात वर्गात पहिला क्रमांक असे, तसाच तो महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेतही होता. माझी पहिली नेमणूक पुण्यातच झाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी मी शासकीय नोकरीच्या चाकोरीत आलो व पुढे ३६ वर्षे त्यात रमलो. त्या वेळी केंद्रीय स्पर्धा परीक्षेतून केंद्र शासनाच्या खात्यांमध्ये नेमणूक झाल्यावरही विचारपूर्वक स्वेच्छेने केंद्रीय शासकीय सेवेची धारा सोडून मी राज्यीय सेवेची धारा स्वखुषीने निवडली. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्या वेळी मला मिळालेला ज्येष्ठांचा सल्ला. रेल्वेसारख्या केंद्रीय सेवांपेक्षा, राज्यीय सेवांमध्ये जलविकासाचे बीज आहे. ते पुढे नीट जपावे, वाढवावे लागणार आहे ही दीर्घदृष्टी त्यांना होती.

लवकरच पुण्याहून माझी धुळे जिल्ह्य़ातील बांधकामावर बदली झाली. तेव्हा पुण्यातील माझे सलग सहा वर्षांचे वास्तव्य संपवून मी पुण्यातून बाहेर पडत होतो. वसंतराव येवलेकरांच्या पत्नी – शालूताई, मला निरोप द्यायला माझ्या सर्व सामानासकट पुणे रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. वसंतराव पुढे रुपारेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. तेव्हा माझ्या मुलीचे महाविद्यालयीन पालकत्व वसंतराव-शालूताई यांच्याकडेच होते. आयुष्यातील प्रेयसाच्या गाठी घट्ट असतात त्या अशा.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात माझे पहिले पदार्पण झाले ते फिलिपाइन्समध्ये मॅनिला येथे एशियन बँकेने आयोजित केलेल्या ‘सिंचन’ या विषयावरच्या दोन आठवडय़ांच्या कार्यशाळेमुळे. भारतातून निमंत्रित केला गेलेला मी एकच प्रतिनिधी होतो. त्यामुळे मी केवळ महाराष्ट्रातील सिंचन स्थितीची माहिती घेऊन पुरणारे नव्हते. राष्ट्रीय पातळीवर देशातील सिंचन व्यवस्थेची समग्र माहिती समजावून घेणे आवश्यक झाले होते. भारतातील हवामानाची, भूरचनेची, पीक पद्धतीची विविधता त्या वेळी मनावर अधिक ठसली. ती मला मॅनिला येथे आंतरराष्ट्रीय मंचावर मांडायची होती.

त्या कार्यशाळेहून मी परतलो ते खूप बदलून. आधुनिक जलव्यवस्था व पारंपरिक जलव्यवस्थापनाची आपली पद्धत यांची घालण्यात आलेली भारतीय सांगड ही खूप प्रगल्भ आहे याची त्या कार्यक्रमामुळे जाणीव झाली. महाराष्ट्रात तर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैयांचे मोठेच योगदान आहे. दरवर्षीच्या बदलत्या पर्जन्यमानाला व्यावहारिक सिंचन व्यवस्थेत सामावून घेण्याचे कौशल्य विश्वेश्वरैयांनी रूढ केलेल्या पीकसमूह पद्धतीत आहे. तेव्हा जगाच्या पाठीवर भारतीय म्हणून आपण फक्त जगाकडून नवे विचार, नव्या कार्यपद्धती ‘घेणारे’ नसून जगालाही काही उपयुक्त ‘देणारे’ही असू शकतो याची जाणीव झाली. त्यानंतर लवकरच प्रिन्स्टन विद्यापीठातील व्रुडो विल्सन स्कूलमध्ये ‘सार्वजनिक व आंतरराष्ट्रीय व्यवहार’ या विषयात एक वर्षभर अभ्यास करण्याचा १९७३-७४ मध्ये योग माझ्यासाठी जमून आला. तेव्हा जगभरांतील वेगवेगळ्या देशांची प्रशासनिक जडणघडण समजावून घेता आली. पर्यावरणीय व्यवस्थापन या नव्याने उदयाला येत असलेल्या विषयाची नीट ओळख झाली. पुढे दहा-बारा वर्षांनंतर नर्मदा प्रकल्पांतील गुंतागुंत हाताळण्यासाठी त्या तयारीचा नंतर मला खूप उपयोग होणार होता. आणखी एक महत्त्वाचा लाभ झाला तो म्हणजे त्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विश्वबँकेची कार्यपद्धती मला जवळून पहाता आली.

काळाच्या ओघात पुढे ‘औट घटकेचा राजा’ असावा, तसे विश्वबँकेच्या संचालक मंडळाचा एक तात्पुरता सदस्य म्हणून त्यांच्या बैठकीत सहभागी होऊन नर्मदा विकासाची वास्तविकता त्यांना समजावून सांगता आली. स्थानिक संदर्भातले व्यवहार, उदाहरणार्थ पुनर्वसन, राष्ट्रीय प्रश्नांमधले बारकावे – उदाहरणार्थ विकासांचे पर्याय आणि जागतिक समस्यांमधली गुंतागुंत – उदाहरणार्थ जागतिक व्यापार व्यवस्था व हवामान बदल या सगळ्यांची सांगड घालण्याचे कसब आधुनिक विकास प्रक्रियांमध्ये किती महत्त्वाचे आहे याचा त्या वेळच्या अभ्यासातून मला चांगला अंदाज आला. त्यातूनच नंतरच्या आंतरराष्ट्रीय बैठकांमधील माझा प्रभाव वाढत गेला. त्याची परिणती म्हणून ‘आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे पहिले पूर्णकालिक सरसचिव म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या’ – असा आग्रह त्या आयोगाकडून मला झाला. या नव्या जबाबदारीसाठी मी तयार झालो, त्यांच्या विनंतीप्रमाणे लगेच आयोगाचे कामही करू लागलो. पण आयोगाच्या त्या नंतरच्या वार्षिक अधिवेशनात सर्व सदस्य देशांची (जवळपास ६४) औपचारिक अनुमती अशा नेमणुकीला आवश्यक होती. अशा अनुमतीचा ठराव जेव्हा अधिवेशनापुढे येणार – त्या वेळी मी आंतरराष्ट्रीय संकेतांप्रमाणे बैठकीतून उठून बाहेर गेलो. पाचच मिनिटांत सभागृहांतील टाळ्यांचा कडकडाट मला ऐकू आला आणि आत मंचावर येऊन औपचारिकपणे सरसचिवाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया मला पूर्ण करावी लागली.

पण व्यक्तिश: माझा हा आनंद निर्भेळ नव्हता. कारण माझी निवड या पदासाठी का करू नये – याबाबतचे एक निवेदन सर्व देशांच्या प्रतिनिधींना वाटले जात आहे – असे माझ्या लक्षात आले. खेदाची गोष्ट अशी की असे निवेदन वाटणारी व्यक्ती भारतीय होती, ‘पाणी आणि ऊर्जा’ या क्षेत्रांतील एका राष्ट्रीय पदाची जबाबदारी सांभाळणारी होती. अधिवेशनाच्या परिसरांत मला त्या व्यक्तीची लगबग दिसत होती. पण प्रयोजन लक्षात येत नव्हते. ते नंतर कळले. सर्व देशांकडून एकमताने निवड झाल्यामुळे मी मनातून सुखावलो होतो. पण या आनंदाला गालबोट लावायचा प्रयत्न झाला होता हे नंतर कळल्यावर फारच वाईट वाटले.

असाच दुर्दैवी अनुभव ‘स्टॉकहोम जलपुरस्कार’ मिळाल्यावर आला होता. तो मला देण्यात येऊ नये, कारण मी पर्यावरणाचा विध्वंसक असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाचा जाहीर पुरस्कार करतो आहे – असे निवेदन स्टॉकहोमच्या रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमीच्या निवड समितीला भारतातील काही पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आले होते. स्वीडनमध्ये राजाच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याचा समारंभ थाटात पार पडल्यानंतर मला हे कळले. स्टॉकहोममध्ये याबाबत काहीच कळले नव्हते. कोणी बोललेही नाही. उलट सी. व्ही. रमण यांच्या नोबेल पुरस्कारानंतर साठ वर्षांनी स्वीडनच्या राजाकडून सत्कार होण्याचा असा योग भारतीय व्यक्तीच्या बाबतीत स्टॉकहोममध्ये येतो आहे – असा आनंद सर्वत्र व्यक्त केला जात होता.

मोठे सिंचन प्रकल्प व त्यांचे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम यावर अभ्यासपूर्वक कळकळीने लिहिणाऱ्या पर्यावरणप्रेमी अमेरिकन लेखिका म्हणजे सांद्रा पास्तेल. मला ‘स्टॉकहोम जलपुरस्कार’ जाहीर होण्यापूर्वीच्या आदल्या वर्षीच त्यांनी Pillars of Sand या नावाचे मोठय़ा सिंचन प्रकल्पांचे दोष दाखवणारे पुस्तक प्रसिद्ध केले होते; ते चांगले गाजलेही होते. स्टॉकहोम पुरस्कारानंतर दोन वर्षांनी त्यांची मॉन्ट्रियलमध्ये एका जल परिषदेत भेट होण्याचा योग आला. ‘सेवाभावी अशासकीय संस्थांची जलविकासांतील भूमिका’ या विषयावर तेथे माझे व्याख्यान होते. योगायोगाने व्याख्यानाच्या वेळी तेथील श्रोतृवर्गात माझ्या पत्नीशेजारीच बसल्या होत्या. व्याख्यानानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे माझ्या पत्नीचे अभिनंदन केले. म्हणाल्या, ‘तुम्हाला असा पती लाभल्याचा किती अभिमान वाटत असेल ना?’ सांद्रा पास्तेलांची उदारमनस्कता ती अशी.

अशाच दिलदारपणाचा सुखद अनुभव विश्वबँकेने पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या एका बैठकीनंतरच्या वार्ताहर परिषदेत आला. नर्मदा प्रकल्पाला विश्वबँकेकडून मिळावयाच्या वित्तीय सहाय्याबद्दलची ती बैठक होती. बैठकीच्या सभागृहाबाहेर युरोपांतील ‘हरितप्रेमी-ग्रीन्स’ चळवळीचे युरोपीय कार्यकर्ते जमा झाले होते. विश्वबँकेने या प्रकल्पाला अनुकूलता व्यक्त करू नये अशी त्यांची मागणी होती. त्याप्रमाणे घोषणा होत होत्या. हातात निषेधाचे फलक होते. विश्वबँकेच्या उपाध्यक्षांबरोबर मी बैठकीच्या जागी पोचलो, तर तेथे दाराशीच निदर्शकांचा जमाव व घोषणा. उपाध्यक्षांनी मला विचारले की, अशा परिस्थितीत आपण आता काय करावे? मी त्यांना सुचवले, की आपणच पुढे होऊन निदर्शकांची भेट घेऊ या व त्यातील एका प्रतिनिधीला निरीक्षक म्हणून आपल्या बैठकीत उपस्थित राहण्याची विनंती करू. कशा प्रकारच्या पर्यावरणविषयक साधकबाधक चर्चेनंतर या प्रकल्पासाठी निर्णय होत आहे हे त्यांनाही ऐकू द्या. त्याप्रमाणे निदर्शकांचा एक प्रतिनिधी विश्वबँकेच्या बैठकीच्या दालनात उपस्थित राहिला. त्याने सर्व चर्चा ऐकली व नंतर शांतपणे निघून गेला. पुष्कळदा विरोध हा अपुऱ्या माहितीवर व गैरसमजावर कसा आधारलेला असतो, याचा आणखी एक अनुभव आला. पारदर्शी व्यापक संवाद सामाजिक उपक्रमांसाठी किती आवश्यक आहे हे पुन्हा जाणवले.

भारतीय जलसंपदा मंडळ या स्वैच्छिक संघटनेतर्फे ‘पाणी आणि पर्यावरण’ हा विषय १९९२ मध्ये भारतांत अनेक ठिकाणी त्या वर्षीच्या जलदिवसाचा विषय म्हणून चर्चेसाठी घेण्यात आला होता. त्या चर्चेच्या समारोपाचा कार्यक्रम त्रिवेंद्रमला होता. त्यात मला बोलायचे होते. नेमके त्या दिवशी स्टॉकहोमहून तेथील जल परिषदेचे महासचिव बो-क्रान्झ मला भेटायला – काही चर्चा करायला भारतात यावयाचे होते. मी त्यांना त्रिवेंद्रमचा कार्यक्रम सांगितला व आपणही माझ्याबरोबर त्या कार्यक्रमाला या म्हणून विनंती केली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. तेथील चर्चेतील प्रगल्भता पाहून ते प्रभावित झाले. भारताची अंतर्गत क्षमता आपली आपल्यालाच अनेकदा भारतात जाणवत नाही – जागतिक मंचावर मात्र त्याची नोंद घेतली जाते आहे याचेच पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

याबाबतीत आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का बसला तो कोलंबो येथील एका आंतरराष्ट्रीय बैठकीत. बैठकीची नियंत्रक संस्था होती – स्टॉकहोम वॉटर इन्स्टिटय़ूट – स्टॉकहोम जल पुरस्काराची औपचारिकता हाताळणारी संस्था. तिच्यातर्फे प्रादेशिक जलसहभागिता मंच जगाच्या वेगवेगळ्या भागांत उभे करायचे – असा उपक्रम हाती घेतला जात होता. त्यात दक्षिण आशियातही अशा प्रकारचा मंच कसा उभा करायचा असा पेच होता. दक्षिण आशियांतले सगळे देश एका मंचावर सहकार्यासाठी येतील का? त्या दिशेने चर्चा चालू असताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळाने अचानक पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला की, या मंचाचे प्रमुख म्हणून जबाबदारी चितळे सांभाळणार असतील – तर आम्ही त्यात सामील व्हायला तयार आहोत. मी आश्चर्यचकित झालो. आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे सरसचिव म्हणून जी आंतरराष्ट्रीय जबाबदारी मी नि:पक्षपातीपणे व प्रभावीपणे पार पाडली होती, त्याची पावती पाकिस्तानच्या त्या प्रस्तावातून मला मिळत होती.

मी बरीच वर्षे सलगपणे दिल्लीतल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत होतो. त्या आवरून आता मनात योजलेल्या इतर सामाजिक कामांसाठी औरंगाबादला परतावे असा विचार मनात पक्का होता. कोलंबोच्या बैठकीत सर्वाचा फार आग्रह पडल्याने मी एक पर्याय त्या सर्वापुढे ठेवला. दक्षिण आशिया जलसहभागिता मंचाचे आंतरराष्ट्रीय कार्यालय औरंगाबादला ठेवले तर मी ती जबाबदारी घेईन. पण हे आंतरराष्ट्रीय कार्यालय औरंगाबादेत कोण सांभाळणार? मी महाराष्ट्र शासनाची वाल्मी (जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था) ही संस्था ती जबाबदारी सांभाळू शकेल असे सांगितले. – वस्तुत: त्या संस्थेशी माझा याबाबत अगोदर काही विचारविनिमय झालेला नव्हता. पण तो पर्याय जागतिक मंचावर मान्य झाला. स्टॉकहोममधून एक प्रतिनिधी ‘वाल्मी’च्या पाहणी – तपासणीला आला. त्याने अनुकूल अभिप्राय दिल्याने – मंचाचे कार्यालय ‘वाल्मी’त स्थापन झाले. ‘वाल्मी’ने ते उत्तम सांभाळले. पुढे काही वर्षांनी टूम निघाली की, हे कार्यालय फिरत्या पद्धतीने दक्षिण आशियाच्या प्रत्येक देशात दोन दोन वर्षे ठेवण्यात यावे. असा प्रस्ताव व्यावहारिक सुज्ञतेचा नव्हता. तसे मी परोपरीने सर्वाना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. कालक्रमणेनुसार ‘वाल्मी’तून पुढे दक्षिण आशियाचे कार्यालय बांगलादेशाला हलले. पण त्यामुळे मंचाची व्यावहारिक घडी जी विस्कटली गेली ती गेली. पुन्हा ती काही प्रभावी होऊ शकली नाही. आता दक्षिण आशियाई जलसहभागिता मंच नावापुरता अस्तित्वात आहे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे अस्तित्व जाणवत नाही – याचे वाईट वाटते. कष्टपूर्वक बांधत आणलेली एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था खिळखिळी झाली ती कायमची.

जागतिक मंचावर एकीकडे अशी पडझड होत असताना महाराष्ट्रात मात्र सिंचन सहयोग, भारतीय जलसंस्कृती मंडळ व सरोवर संवर्धिनी या जलक्षेत्रांतील सेवाभावी संस्थांनी हळूहळू आपला जम चांगला बसवला आहे. माझ्या गेल्या २०-२५ वर्षांच्या या बाबतीतल्या धडपडीला चांगले यश येत आहे. मुळात औरंगाबादला निवास असणाऱ्या या संघटनांच्या सूत्रधार व्यक्ती काळाच्या ओघात आता पुणे, नांदेड, पवई अशा ठिकाणी विखुरल्या गेल्या आहेत. पण त्यांच्यातूनच या तीनही धारांतील चळवळींचे बळ वाढते आहे. या विषयांच्या वार्षिक परिषदा, संमेलने यांतून ती मंडळी ते ते विषय पुढे नेत आहेत. या विषयांमधील हौशी कार्यकर्त्यांची संख्या आणखी वाढेल तसतसा या संस्थांचा प्रभाव वाढत जाईल. त्यातच माझ्या श्रेयसाचीही समाधानकारक परिणती राहील.

chitalema@gmail.com

chaturang@expressindia.com