|| वसुंधरा देवधर

चहाच्या उत्पादन पद्धतीनुसार त्याचे मूळ तीन प्रकार कसे होतात, ते आपण २५ जुलैच्या लेखात पाहिले. या पद्धतीला पारंपरिक किंवा ऑर्थोडॉक्स म्हणूनही संबोधिले जाते. ग्रीन, ऊलाँग आणि काळ्या चहाची निर्मिती प्रक्रिया वेळखाऊ आणि नजाकतीने करावी लागते. मात्र सीटीसी चहा पाने खुडून आणल्यापासून मशीनच्या साहाय्याने दोन-तीन तासांत तयार होतो. अर्थात माती-पाणी-उजेड-वारा यांतील भौगोलिक फरकानुसार चहात येणारे गुणधर्म आणि वैशिष्टय़े सीटीसी प्रक्रियेमुळे कमी होतात. सामान्य माणसाला काळा चहा, म्हणजे दूध न घालता केलेला सीटीसी, बीओपी, डस्ट इत्यादी चहा असे वाटते. पण ज्यामध्ये चहाची पाने गरम पाण्यात घातल्यावर उमलून येतात (लीफ टी), तो आरोग्यस्नेही काळा /चॉकलेटी, कडू नसणारा चहा.

आपल्या टी बोर्डाच्या संकेतस्थळावर आसाम, तराई, मुन्नार, सिक्कीम, कांग्रा, दार्जिलिंग अशा विविध ठिकाणच्या काळ्या चहाची वैशिष्टय़े व आरोग्यदायी गुणधर्म नेमकेपणाने सांगितलेले आहेत. हा काळा/ ऊलोंग / ग्रीन चहा करताना पत्ती उकळू नये. त्यामुळे त्यात टिकून राहणारी पॉलिफिनॉलिक संयुगे अ‍ॅण्टीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात आणि शरीरातील उती व पेशींचे संरक्षण करतात. संशोधनाने सिद्ध झाले आहे की, उकळते पाणी कोणत्याच चहावर ओतू नये. पोषकघटक शरीराला मिळण्यासाठी ग्रीन चहा कमी तापमानाला जास्त वेळ, अगदी २० मिनिटे सुद्धा मुरवावा, तर काळ्या चहावर कडकडीत (उकळते नाही) पाणी ओतून ३ मिनिटेच ठेवावा. त्यात दूध घातले की पोषकघटकांची उपलब्धता घटते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टी बॅग दीड/दोन ग्रॅम वजनाची असते, हे लक्षात घेऊन सुट्टी पत्ती असली तरी त्याच प्रमाणात घ्यावी. अशा चहात सगळे आवश्यक ते गुणधर्म व स्वाद टिकून राहतात. फ्लेवोनॉइड्स या रसायन संयुगाचे जे विविध आरोग्यदायी गुणधर्म आहेत, ते ग्रीन, ऊलोंग आणि काळ्या चहात निरनिराळ्या प्रमाणात असतात, ते मिळवणे आपल्या चहा करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.

दूध-साखर घालून पत्ती उकळलेल्या कडक चहात कॅफिन आणि टॅनिनसुद्धा मोठय़ा प्रमाणात उतरतात आणि तरतरी (?) देतात. शिवाय हे कॅफिन व टॅनिन सकाळी रिकाम्या असणाऱ्या पोटाच्या अस्तरावर जणू हल्ला करते. हे समजून घेऊन, काय ते करावे.

vasudeo55p@gmail.com

chaturang@expressindia.com