भारतानं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये खणखणीत विजय मिळवत आपल्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. सातव्या षटकातच स्कॉटलंडनं दिलेलं ८६ धावांचं आव्हान भारतानं पार केलं. यामध्ये के. एल. राहुलच्या झंझावाती अर्धशतकाचा सिंहाचा वाटा होता. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सुरुवातीला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या टीम इंडियावर चाहते आणि विश्लेषकांनी टीका करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट सेनेने मोठे विजय संपादित केले आहेत. यानंतर प्रतिक्रिया देताना भारताचा ऑलराउंडर रवींद्र जडेजानं टीकाकारांना सुनावलं आहे.
जडेजा ठरला सामनावीराचा मानकरी!
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रवींद्र जडेजानं फक्त १५ धावांच्या मोबदल्यात स्कॉटलंडचे तीन गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. यानंतर बोलताना रवींद्र जडेजानं भारतीय संघाची कामगिरी आणि संघावर होणारी टीका यावर मत व्यक्त केलं.
“गेल्या तीन वर्षांपासून एक संघ म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत. मग ती देशांतर्गत असो वा विदेशात. आम्हाला कदाचित काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नसेल. पण त्यावरूनच आम्हाला जोखणं चुकीचं आहे”, अशा शब्दांत रवींद्र जडेजानं टीकाकारांना ठणकावलं आहे.
T20 WC : केएल राहुलकडून अखेर प्रेमाची कबुली..! मॅचनंतर गर्लफ्रेंड अथिया शेट्टीला…
पहिली फलंदाजी आव्हानात्मक होती..
दरम्यान, यावेळी बोलताना रवींद्र जडेजानं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात पहिली फलंदाजी करणं आव्हानात्मक होतं असं म्हटलं आहे. “चेंडू हातातून निसटत असताना आणि पिचवर थोडा थांबून येत असताना पहिली फलंदाजी करणं हे कायमच आव्हान राहिलं आहे. पण दव खेळपट्टीवर बसल्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल झाली. त्यामुळेच पहिली फलंदाजी करणाऱ्या संघांना चांगली सुरुवात करण्यासाठी अडचणी आल्या आहेत. तशी सुरुवात मिळणं टी-२० क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं”, असं जडेजा म्हणाला.