cricket-blog-ravi-patki-670x200एखाद्या छोट्या गोष्टीला, प्रसंगाला भव्य स्वरुप तेव्हा प्राप्त होते, जेव्हा त्यातून एक उत्कट, प्रकाशमान करणारी, मनावर दीर्घकाळ राज्य करणारी उदात्त अनुभूती येते तेव्हा. उदाहरणार्थ एखाद्या चार कडव्याचे गीत त्यातील ओतप्रोत राष्ट्रभावनेने राष्ट्रगीत होउन जाते, दहा मिनिटांच्या ध्यानधारणेत अशी उदात्त अनुभूती येते की त्या ध्यानाचे अनुष्ठान होऊन जाते, एखाद्या छोट्या तीर्थयात्रेत अशी अनुभूती येते की त्या छोट्या तीर्थयात्रेची नर्मदा परिक्रमा होऊन जाते. तसेच काल विराट कोहलीने फक्त ३७ चेंडूंचीच खेळी केली. पण ती करताना त्याने जी अनूभूती दिली त्याने बॅटिंगची बॅट्समनशिप करून दाखवली.
एखादा फलंदाज एखाद्या खेळीत बॅटिंगची बॅट्समनशिप करतो, तेव्हा त्या खेळीत त्याचा बॅट्समन ते क्राफ्ट्समन आणि क्राफ्ट्समन ते स्टेट्समन हा प्रवास पाहायला मिळतो. कोहलीने काल सामान्य फलंदाजाप्रमाणे सुरुवात केली. नंतर त्याने त्याच्या भात्यातील सर्व शॉट्स नजाकतीने आणि गॅप काढत मारले. तिथे दिसला त्याच्यातला क्राफ़्ट्समन. हे सर्व करत असताना भारत पाकिस्तान वर्ल्डकपचा सामना याचे सर्वोच्च व्यासपीठ असताना, अवघड खेळपट्टी असताना, कोटयवधी लोकांचे डोळे लागलेले असताना प्रसंगाच्या ओझ्याखाली अजिबात न डगमगता एकट्याने भारताची नय्या पार केली त्यामुळे तो फलंदाजीतील स्टेट्समनच्या पदावर जाऊन पोचला.
हे करत असताना कालच्या कोहलीच्या फलंदाजीतील कोणत्या गुणाने सर्वाधिक आनंद दिला असेल तर त्याची फलंदाजीतील ‘शराफत’. अवघड विकेटवर खेळताना काय पाळायचे असते तर क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकाले नियम. त्याला फलंदाजीतील ‘शराफत’ म्हणतात. ते मूलभूत नियम पाळले तर तुम्ही तग धरून राहण्याची शक्यता सर्वाधिक असते. कालची कोहलीची खेळी आपण पुन्हा बारकाईने पाहिली तर लक्षात येईल की त्याने शोएब मलिकचा ऑफस्पिन फक्त लेगसाइडला स्पिनच्या दिशेने खेळला आणि अफ्रिदीचा लेगस्पिन फक्त ऑफसाईडला स्पिनच्या दिशेने खेळला. टर्निंग ट्रॅकवर स्पिनच्या विरुद्ध दिशेने खेळायचे नाही हा पहिला पाठ्यपुस्तकातला नियम त्याने तंतोतंत् पाळला. ऑफसाइडला त्याची अशी हुकमत झाली आहे की आता द्रविडला ‘ऑन ऑफसाइड फर्स्ट देअर इज गॉड एण्ड देन गांगुली’ हे वाक्य वाढवून ‘आफ्टर गांगुली देअर इज कोहली’ असं करावं लागेल.
गेल्या दोन वर्षांत कोहलीच्या विविध इंनिंग्जने तो भारतीय फलंदाजीच्या सम्राटपदाचा अंगरखा परिधान करून, रत्नमाला घालून उभा होता. कालच्या इनिंगने त्याच्या मस्तकावर ठेवला मान्यतेचा जिरेटोप. सम्राट कोहलीला मानाचा मुजरा!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com