दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, हे आशिया खंडातील दोन बेभरवशाचे संघ आमनेसामने येणार आहेत. रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकी जोडीविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांचा कस लागणार आहे.
भारत, न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि हसन अली या वेगवान त्रिकूटासह कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा तब्बल १३० धावांनी फडशा पाडला. या लढतीत रशीद-मुजीबच्या जोडीने नऊ बळी मिळवले.