विराट कोहली म्हटल्यावर साऱ्यांनाच त्याची आक्रमकता डोळ्यापुढे येते, पण अनुभवांमधून तो बरेच काही शिकला असून त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होताना दिसतो. तुम्हाला नेहमीच परिस्थितीनुरूप खेळावे लागते. त्यासाठी मी
शांत राहणेच पसंत करतो, असे मत कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर व्यक्त केले.
या खेळीबाबत कोहली म्हणाला की, ‘‘या सामन्यात जेव्हा आम्ही झटपट तीन फलंदाज गमावले, ती परिस्थिती चिंताजनक होती; पण त्या वेळी डोके शांत ठेवून मी खेळत राहिलो आणि त्याचाच मला फायदा झाला. जेव्हा मी ४० धावांपर्यंत पोहोचलो तेव्हा हा सामना आपण जिंकवून देऊ शकतो, असा विश्वास मला वाटला.’’ ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर मी निराश झालो होतो, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे निराश होऊन चालत नाही, कारण प्रत्येक सामना तुम्हाला काही तरी शिकवून जातो. पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता आली नाही, पण या सामन्यात चांगली फलंदाजी करून संघाला जिंकवून दिल्याचा आनंद आहे,’’ असे मत विराट कोहलीने व्यक्त केले.