शारजा : सलग दोन सामन्यांमधील पराभवामुळे गतविजेते वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघांना आव्हान टिकवण्यासाठी शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल-१२’ फेरीत झुंजावे लागणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत विंडीजचा डाव फक्त ५५ धावांत कोसळला. दुसऱ्या लढतीत लेंडल सिमन्सने ३५ चेंडूंत फक्त १६ धावा केल्या.  त्यामुळे सिमन्सऐवजी रोस्टन चेसला संधी मिळू शकते. एव्हिन लुइसने ३५ चेंडूंत ५६ धावांची दिमाखदार खेळी साकारली होती. बांगलादेशकडे मोहम्मद नैम, लिटन दास, शाकिब अल हसन, महमुदुल्ला आणि मुशफिकूर रहिम यांच्यासारखे गुणी फलंदाज त्यांच्याकडे आहेत. श्रीलंकेविरुद्ध नैम आणि रहिमने अर्धशतके झळकावत संघाला उत्तम धावसंख्या उभारून दिली, परंतु गोलंदाजांनी सामना गमावला. इंग्लंडविरुद्ध फक्त रहिमने २९ धावा केल्या. परंतु फलंदाजी आणि गोलंदाजी या विभागांत संघाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.