श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय : बद्री, फ्लेचर चमकले
पहिल्या सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या ख्रिस गेलच्या कामगिरीशिवायही आम्ही जिंकू शकतो, हे वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. सॅम्युअल बद्रीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेला १२२ धावांमध्ये रोखले. त्यानंतर सलामीवीर आंद्रे फ्लेचरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण करत श्रीलंकेवर सात विकेट्सने सहज विजय मिळवला.
वेस्ट इंडिजने नाणफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण करत फॉर्मात असलेल्या तिलकरत्ने दिलशानचा (१२) पहिला काटा काढला. दिलशान बाद झाल्यावर श्रीलंकेची वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ५ बाद ४७ अशी अवस्था केली. यावेळी संघासाठी थिसारा परेरा धावून आला. परेराने २९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच श्रीलंकेला शतकाची वेसण ओलांडता आली. बद्रीने यावेळी श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना बाद केले.
श्रीलंकेच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना जास्त वेळ फलंदाजी करता आली नसली तरी फ्लेचरने संघाला एकहाती विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या गोलंदाजीची पिसे काढत फ्लेचरने सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ८४ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १२२ (थिसारा परेरा ४०; सॅम्युअल बद्री ३/१२) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १८.२ षटकांत ३ बाद १२७ (आंद्रे फ्लेचर नाबाद ८४; मिलिंडा सिरीवर्धने २/३३).
सामनावीर : आंद्रे फ्लेचर.