अनुनभवी अफगाणिस्तानचा ३७ धावांनी पराभव; ख्रिस मॉरीसचे चार बळी
धावांचा डोंगर उभा करूनही पुन्हा एकदा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना केवळ अनुभवाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेर अफगाणिस्तानवर अडखळत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या या सामन्यात २०९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने केलेल्या संघर्षांने उपस्थितांची वाहवा मिळवली. ख्रिस मॉरिसच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेने ३७ धावांनी विजय निश्चित केला.
आफ्रिकेने पहिल्या षटकापासून अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. क्विंटन डी’कॉकने तीन चौकारांची सलामी दिली. तिसऱ्या षटकात हाशिम अमला बाद झाल्यानंतरही डी’ कॉकने चौकारांचा ओघ कायम राखला. त्याला फॅफ डय़ू प्लेसिसने सुयोग्य साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. यामध्ये डय़ू प्लेसिसच्या ४१ धावांचा समावेश होता. डय़ू प्लेसिस माघारी परतल्यानंतर धावफलकावर ७ धावांची भर घालून डी’कॉकही (४५) माघारी परतला. त्यानंतर एबी डी’व्हिलियर्सने जे. पी. डय़ुमिनीच्या साथीने १३.२ च्या सरासरीने ७६ धावा जलदगतीने जमवल्या. २९ चेंडूंत ५ षटकार आणि ४ चौकार मारून ६४ धावांची खेळी करणाऱ्या डी’व्हिलियर्सला मोहम्मद नबीने माघारी पाठवले. एका वेळी आफ्रिका २३५ धावांचे आव्हान सहज उभे करेल असे वाटत असताना अफगाणिस्तानने त्यांना २०९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.
तीन प्रयत्नांनंतर पहिल्यांदाच मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरात धमाकेदार खेळ केला. मोहम्मद शहजाद आणि नूर अली झरदान यांनी अर्धशतकी सलामी देत मजबूत पाया रचला. चार षटके टिकलेल्या या भागीदारीमध्ये शहजादने अफलातून फलंदाजी करत ४४ धावा चोपल्या. फलंदाजी करताना त्याच्यात जाणवणारा आत्मविश्वास अनुभवी खेळाडूलाही लाजवणारा होता. कायले अॅबोटच्या पहिल्याच षटकात शहजादने तीन खणखणीत षटकार आणि एक चौकार मारून २२ धावा केल्या. १९ चेंडूंत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ४४ धावा चोपणाऱ्या शहजादला आवरण्यासाठी डय़ू प्लेसिसने अनुभवी गोलंदाज ख्रिस मॉरिसला पाचारण केले. डय़ू प्लेसिसची ही चाल कामी आली आणि मॉरिसने शहजादला त्रिफळाचित केले. त्यापाठोपाठ कर्णधार असघर स्टॅनिकझाईलाही (७) मॉरिसने स्वस्तात गुंडाळले. त्यानंतरही अफगाणिस्तानचा धावांचा ओघ आटला नाही. गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, सॅमिउल्लाह शेनवारी व नजिबुल्लाह जादरान यांनी छोटेखानी पण उपयुक्त खेळी करून संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु अनुभवाची कमतरता असल्याने अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १७२ धावांवर माघारी परतला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५ बाद २०९ (क्विंटन डी’कॉक ४५, फॅफ डय़ू प्लेसिस ४१, ए. बी. डी’व्हिलियर्स ६४; आमीर हमझा १-२५, मोहम्मद नबी १-३५) विजयी वि. अफगाणिस्तान : सर्व बाद १७२ (मोहम्मद शहजाद ४४, नूर अली जदरान २५, गुलबदीन नायब २६, समिउल्लाह शेनवारी २५; ख्रिस मॉरिस ४-२७, इम्रान ताहीर २-२४).
सामनावीर : ख्रिस मॉरिस.
– स्वदेश घाणेकर