Elon Musk’s X.AI Corporation: एलॉन मस्क हे जगातील सर्वात दमदार व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. त्यांनी स्पेसएक्स आणि टेस्ला या मल्टीनॅशनल कंपन्यांची स्थापना केली आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे सर्व शेअर्स खरेदी करत त्यांनी या कंपनीची मालकी मिळवली. एलॉन मस्क कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. मस्क यांनी एका नव्या कंपनीची सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी आर्टिफिशल इंटेलिजंसशी संबंधित असून कंपनीचे नाव X.AI Corporation आहे असे म्हटले जात आहे. एलॉन मस्क यांनी चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी या नव्या कंपनीची स्थापना केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

X.AI Corporation ची स्थापना कधी झाली?

एलॉन मस्क यांच्या X.AI Corporation या नव्या कंपनीची स्थापना ९ मार्च २०२३ रोजी झाली असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर कंपनीने एका नव्या ‘X’ शेल कंपनीशी भागीदारी केली आहे अशी माहिती समोर आली होती. या कंपनीमुळे चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या OpenAI समोर मोठे आव्हान असणार आहे. एका अहवालानुसार, एलॉन मस्क यांनी संगणकाचे हजारो महागडे आणि शक्तिशाली प्रोसेसर खरेदी केले आहेत. X.AI या ट्विटरच्या एआय प्रोजेक्टच्या अंतर्गत मस्क यांनी या तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कामावर नियुक्त केले आहे

फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क स्वत:चा AI Startup तयार करण्यातचा विचार करत होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक इंजिनिअर्स, कोडर्स कामाला लावले होते. स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपनीच्या गुंतवणूकदारांकडून या स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न ते करत होते. मस्क यांच्या या नव्या कंपनीबद्दलची माहिती समोर आली असल्याने त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा – ट्विटवरील टिवटिवाट आणखी वाढला, आता १० हजार शब्दांमध्ये करू शकाल पोस्ट! फक्त ‘या’ युजर्सना लाभ घेता येणार

गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट अशा मोठ्या टेक कंपन्या बऱ्याच वर्षांपासून AI System वर काम करत आहेत. या सिस्टीमचा वापर सुरुवातीला डेटा तसेच अनेक तांत्रिक कामांमध्ये केला गेला. मागच्या वर्षी OpenAI द्वारे ChatGPT लॉन्च करण्यात आले. यामुळे AI बद्दल सर्वांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाले. एलॉन मस्क हे OpenAI कंपनीचे सहसंस्थापक आहेत. २०१८ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.