दैनंदिन जीवनात आपल्याला काहीही अडलं तरी आपण आता सहजरित्या ‘गुगल करतो’. इतकी गुगलची सवय आपल्याला अंगवळणी पडली आहे. ही सवय लागण्यासाठी अर्थातच गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी मेहनत घेतली होती. २०१९ साली या दोन्ही संस्थापकांनी गुगलमधून आपली जबाबदारी सोडल्यानंतर ते गुगलपासून दूर गेले होते. मात्र आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या विनंतीमुळे गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी ब्रिन पुन्हा सक्रिय होणार आहेत. इंडियन एक्सप्रेसने याबाबतची बातमी दिली आहे. गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्टसाठी दोन्ही संस्थापक आपले योगदान देतील, अशी माहिती मिळत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, नव्या चॅटबॉट स्पर्धकामुळे गुगलच्या १४९ बिलियन डॉलर्सच्या सर्च इंजिन व्यवसायाला पहिल्यांदाच आव्हान मिळाले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सीईओ सुंदर पिचाई यांनी दोन्ही संस्थापकांना पुन्हा पाचारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुगलच्या एआयमध्ये आणखी नवे फिचर्स आणण्यासाठी काही बैठका देखील झाल्या आहेत. यावेळी दोन्ही संस्थापकांनी गुगलला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

हे वाचा >> विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?

दोन महिन्यांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील ओपन एआय या कंपनीने चॅटजीपीटीची सुविधा सुरु केली. चॅटजीपीटीबद्दल लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली. अनेकांनी या सुविधेला गुगल पेक्षाही चांगली सर्च सुविधा असल्याचे म्हटले. त्यामुळे सुंदर पिचाई यांना ही धोक्याची घंटा वाटली आणि त्यांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. गुगल येत्या वर्षभरात सर्च इंजिन आणि चॅटबॉटमध्ये २० नवे प्रॉडक्ट घेऊन येणार आहे, अशी माहिती न्यू यॉर्क टाइम्सने दिली आहे.

हे वाचा >> लवकरच लाँच होणार ChatGpt ची ‘ही’ सिरीज; जाणून घ्या

हा गुगलसाठी महत्त्वपूर्ण क्षण आहे, असे गुगलच्या शोध विभागाचे माजी संचालक डी. शिवकुमार यांनी सांगितले. चॅटजीपीटीने लोकांना एक नाविन्यपूर्ण आणि आकर्षक असा शोध अनुभव कसा असू शकतो याचे उदाहरण दाखविले आहे. मात्र गुगलने अशी आव्हाने याआधी अनेकदा पेलली आहेत. स्पर्धेत राहण्यासाठी गुगल आपल्या एआयमध्ये नक्कीच सुधारणा करेल, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली.

लॅरी पेज आणि ब्रिन यांनी गुगलमधून बाजूला झाल्यानंतर पिचई यांच्या हातात निर्णय प्रक्रिया दिली होती. दोघांनीही आपली मुळ कंपनी अल्फाबेटमध्ये पुन्हा लक्ष घालायला सुरुवात केली. यादरम्यान दोघेही फ्लाइंग कार स्टार्टअप आणि आपत्कालीन परिस्थितीमधील बचाव यंत्रणा यावर काम करत आहेत. गेल्या काही वर्षात सिलिकॉन व्हॉलीमधील कार्यालयाला त्यांनी खूप कमी वेळेला भेटी दिल्या आहेत. त्यातही अल्फाबेटच्या प्रकल्पासंदर्भातच त्यांनी भेट दिल्या आहेत. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये त्यांनी काही काळापासून लक्ष घातलेले नाही.

हे देखील वाचा >> कथा कृत्रिम अकलेची..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी गुगल चॅटबॉट सुविधेचे अनावरण करेल, अशी शक्यता आहे. यासाठी या नव्या सुविधेचे प्रात्यक्षिक सुरु असून त्याची सुरक्षितता निश्चित करणए आणि चुकीची माहिती गाळून योग्य माहिती देण्यासाठीचा प्राधान्यक्रम गुगलने ठरविलेला आहे. द्वेष, धोकादायक आणि चुकीच्या माहितीशी संबंधित समस्यांना आळा घालण्याचा प्रयत्न या नव्या सुविधेत केला जाणार आहे. उदाहरणार्थ एखादे द्वेषपूर्ण किंवा चिथावणीखोर भाषण वेळीच रोखले जावे यासाठी काही विशिष्ट शब्दांना रोखण्याचा गुगलकडून प्रयत्न केला जाणार आहे.