Direct-to-Mobile Technology : गेल्या काही दिवसांपासून भारतात डिरेक्ट टू मोबाइल/डीटूएम (Direct-to-Mobile/D2M) तंत्रज्ञानाची बरीच चर्चा ऐकायला मिळत आहे. भारतात हे तंत्रज्ञान लवकरच सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. मीडिया अहवालांनुसार, या तंत्रज्ञानाचं परीक्षण पूर्ण झालं आहे, सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता हे तंत्रज्ञाना बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. आता केवळ सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
या तंत्रज्ञानाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कोट्यवधी स्मार्टफोन युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध होईल. या तंत्रज्ञानामुळे मोबाइलवर इंटरनेटशिवाय टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळेल.
D2M तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
या तंत्रज्ञानामुळे लोक इंटरनेटशिवाय, कोणत्याही सिमकार्डशिवाय त्यांच्या मोबाइल फोनवर टीव्ही चॅनेल्स व त्यावरील कॉन्टेंट पाहू शकतात. याचाच अर्थ तुम्ही इंटरनेटशिवाय टीव्ही पाहू शकता, व्हिडीओ कॉन्टेंट पाहू शकता आणि तुमचा डेटा देखील संपणार नाही. डीटूएमद्वारे थेट मोबाइलवर ब्रॉडकास्टिंग (प्रक्षेपण) केलं जाईल. याद्वारे लोक माहिती आणि मनोरंजनाचा उपभोग घेऊ शकतात. यामुळे लोकांना माहिती व मनोरंजनाचा कॉन्टेंट मोफत मिळेल.
या तंत्रज्ञानाचा फायदा कोणाला?
या तंत्रज्ञानामुळे मोबाइल नेटवर्कवरील ट्रॅफिक कमी होईल. इंटरनेट डेटाची बचत होईल. ग्रामीण भागात, जंगले व अशी ठिकाणे जिथे अजूनही ब्रॉडबँड नेटवर्क पोहोचू शकलेलं नाही तिथे देखील सेवा पोहोचेल. आपत्कालीन परिस्थितीत, प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीच्या काळात इंटरनेटसह वेगवेगळ्या सेवा ठप्प असतात त्या काळात ही डीटूएम सेवा उपयोगी सिद्ध होईल.
बंगळुरूस्थित सांख्य लॅब्सने ( Saankhya Labs) SL3000 ही एक खास चिप विकसित केली आहे. यामुळे मोबाइल फोन थेट सॅटेलाइट किंवा ब्रॉडकास्ट टॉवरद्वारे कॉन्टेंट मिळवू शकतो. आयआयटी कानपूरशी संबंधित Free Stream Technologies या स्टार्टपच्या सहकार्याने ही चिप विकसित करण्यात आली आहे. स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करणे, नेटवर्क लोड कमी करणे, देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती पोहोचवणे हे या संशोधनामागचं प्रमुख कारण आहे.