ट्विटर पाठोपाठ फेसबुकची कंपनी मेटानेही कर्मचारी कपात सुरू केली आहे. सप्टेंबर महिन्यात झुकरबर्ग यांनी याबाबत इशारा देखील दिला होता. बुधवारी सकाळीपासून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मेटाची योजना आहे. निराशाजनक कमाई आणि महसुलात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर खर्च कमी करण्यासाठीच्या योजनेचा हा भाग असल्याचे या विषयाशी संबंधित असलेल्या लोकांचे म्हणणे आहे.

नोकरीवरून काढण्यात येणाऱ्या लोकांना बुधवारी याबाबत माहिती दिली जाईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना नोकर कपातीसाठी तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले.

मार्क झुकरबर्ग यांनी स्वीकारली जबाबदारी

वॉल स्ट्रिट जर्नलनुसार, कंपनीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी आपण जबाबदार असल्याचे झुकरबर्ग यांनी कबूल केले आहे. दरम्यान यावर मेटाच्या प्रवक्त्याची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

(ओप्पोचा स्वस्त 5G फोन झाला लाँच; ८ तास गेमिंग, ५० एमपी कॅमेरासह मिळत आहेत भन्नाट फीचर्स)

झुकरबर्ग यांनी दिला होता इशारा

खर्च कमी करणे आणि टीमची पुनर्रचना करण्याचा मेटाचा हेतू आहे, असा इशारा झुकरबर्ग यांनी सप्टेंबर महिन्यातच कर्मचाऱ्यांना दिला होता. कंपनीने तिच्या मालकीचे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भरती प्रक्रिया थांबवून ठेवली होती. तसेच, या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये कमर्चाऱ्यांची संख्या कमी राहील अशी मेटाची अपेक्षा असल्याचे देखील झुकरबर्ग यांनी म्हटले होते.

कपातीमुळे कंपनीच्या १० टक्के भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कंपनीमध्ये ८७ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करत होते. इन्साइडरनुसार, ही नोकर कपात २००४ मध्ये फेसबुकच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या मोठ्या खर्च कपातीचा भाग आहे. कपातीला डिजिटल जाहिरातींच्या महसुलात घट, मंदीच्या उंबरठ्यावर असणारी अर्थव्यवस्था आणि झुकबर्ग यांनी मेटाव्हर्समध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीची पार्श्वभूमी आहे.

(काय आहे कम्युनिटी फीचर? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे करा तयार)

आपल्याला जुळवून घ्यावे लागेल

कंपनीच्या अठरा वर्षांमध्ये झटपट वृद्धी दिसून आली, मात्र नुकतेच आपले महसूल पहिल्यांदाच कमी झाले आहे. त्यामुळे आपल्याला जुळवून घ्यावे लागेल, असा इशारा झुकरबर्ग यांनी सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना दिला होता.

या कंपन्यांनी केली कर्मचारी कपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरमध्येही मागील आठवड्यात नोकर कपात करण्यात आली. एलॉन मस्क यांनी कंपनीची मालकी मिळवल्यानंतर जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. स्नॅप आयएनसी ही स्नॅपचॅटची कंपनी देखील ऑगस्टमध्ये २० टक्के कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे.