Shubhanshu Shukla Axiom 4 Mission Latest Updates : भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आज (२५ जून) दुपारी १२.०१ वाजता इतिहास रचला आहे. शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं आहे. नासाचं फॉल्कन-९ हे यान अवकाशात झेपावलं आणि त्याबरोबर शुक्ला यांनी ऐतिहासिक कामगिरी केली.

‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर शुक्ला यांनी आज अवकाशात उड्डाण केलं. फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे त्यांनी अवकाशात उड्डाण केलं आहे. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. ४१ वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर आज अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून ते वायूदलात ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. १ वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.

शुभांशू शुक्ला व त्यांचे सहकारी अंतराळवीर फॉल्कन-९ या रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन या मायक्रो रॉकेटद्वारे अंवकाशात प्रवास करणार आहेत. त्यामुळे शुक्ला यांचं यान अवकाशात स्थिरावल्यानंतर फॉल्कन-९ हे रॉकेट सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं आहे. पुढील २८ तासांत त्यांचं यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडलं जाईल. त्यानंतर आंतराळ केंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला जाईल.

एका दिवसात १६ वेळा सूर्योदय व सूर्यास्त पाहणार

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडण्यासाठी या यानाला २८ तास लागणार आहेत. तत्पूर्वी पुढील २४ तासांत हे यान १६ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. त्यामुळे एका दिवसांत हे अंतराळवीर १६ वेळा सूर्योदय व १६ वेळा सूर्यास्त पाहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतराळ स्थानकात १५ दिवस मुक्काम

शुक्ला हे या मोहिमेचे सारथ्य करत असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ते १५ दिवस राहणार आहे. या काळात ते शून्य गुरुत्वाकर्षणात काही प्रयोग करणार आहेत. नासा (NASA) व इस्रो (ISRO – भारतीय अंतराळ संशोधन संशा) या दोन दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. इस्रो व नासाने केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या करारानंतरच्या पहिल्या मोहिमेअंतर्गत शुभांशू शुक्ला अवकाश प्रवास करत आहेत. त्यांची AXIOM-4 मोहिमेसाठी ‘प्राइम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर) म्हणून निवड करण्यात आली आहे.