Twitter Logo : एलॉन मस्क हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत असतात. ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क यांनी त्यात अनेक बदल केले. पेड सबस्क्रिप्शन त्यातलाच एक गाजलेला मुद्दा होता. सोमवारी एलॉन मस्क यांनी चक्क ट्विटरचा लोगो बदलून युजर्सना मोठा धक्का दिला आहे. ट्विटरचा ‘X’ हा नवीन लोगो सध्या चांगलाच चर्चेत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

कोणता बदल केला आहे?

ट्विटरचा निळ्या रंगातील चिमणीचा लोगो आता बदलण्यात आला आहे. त्याऐवजी ‘X’ हा इंग्रजी आद्याक्षर असलेला लोगो दिसत आहे. एवढंच काय तर एलॉन मस्क यांनी X.com ला थेट Twitter.com शी जोडले आहे म्हणजेच X.com टाईप केल्यानंतर आता तुम्हाला थेट ट्विटरच्या वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल.

हेही वाचा : Cyber Crime : रॅनसमवेअर ‘अकीरा’ व्हायरसची सगळीकडे दहशत; CERT-In ने दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना; वाचा काय आहे प्रकरण ….

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला?

एलॉन मस्क यांनी जेव्हा ट्विटर खरेदी केले तेव्हापासूनच त्यांची स्ट्रॅटेजी तयार होती. ट्विटरला विकत घेणे हे ‘X’या नव्या पर्वासाठी एक मोठे पाऊल होते. त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांनी ट्विटरमध्ये बरेच बदल केले. ट्विटरवर फक्त १४० शब्दांची मर्यादा होती, पण ‘X’वर तुम्ही काही तासांच्या व्हिडीओसह जवळपास सर्वकाही पोस्ट करू शकणार आहात. याशिवाय ‘X’ असा प्लॅटफॉर्म असणार आहे, जो अनेक सुविधा जसे की ई-कॉमर्स, बँकिंग किंवा पेमेंटसारख्या सेवा पुरवतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सचा प्रतिसाद

या नव्या लोगोवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सना हा नवा बदल आवडला आहे, तर काही युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ट्विटरच्या या नव्या लोगोवरून अनेक मिम्सही व्हायरल होत आहेत.