प्रसिद्ध सोशल मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या एक्स (आधीचे ट्विटर) या साईटवर आता नव्या युजर्ससाठी पैसे आकारले जाणार आहेत. एलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर येणाऱ्या नव्या वापरकर्त्यांना यापुढे शुल्क भरावे लागणार आहे. इतरांच्या पोस्ट लाईक करणे, नव्या पोस्ट करणे, रिप्लाय आणि बुकमार्किंग करण्यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. एक्सवर बॉट्स अकाऊंटला नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असल्याचे मस्क यांनी सांगितले.

एक्स डेली न्यूज या हँडलवरून ही बातमी देण्यात आली आहे. एक्स डेली न्यूज हे हँडल एक्सची माहिती देणारे अधिकृत हँडल आहे. एलॉन मस्क यांनी काल केलेल्या ट्विटचा हवाला देत एक्स डेली न्यूजने ही बातमी दिली. डिली न्यूजच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये अशा प्रकारचे धोरण राबविले गेले होते. स्पॅमिंग रोखण्यासाठी आणि इतर युजर्सना एक्स वापराचा चांगला अनुभव मिळण्यासाठी हे धोरण आखले गेले आहे, असे एक्सकडून सांगण्यात येत आहे.

एलॉन मस्क यांनी सांगितले की, बॉट्सचा उच्छाद थांबविण्यासाठी नव्या युजर्सना यापुढे एक छोटेसे शुल्क भरावे लागणार आहे. सध्या एआयकडून तुम्ही बॉट आहात का? हे कॅपचावर आधारित टेस्ट आरामात पार करत आहे. हे शुल्क फक्त नव्या युजर्ससाठी असून तीन महिन्यानंतर ते एक्स मोफत वापरू शकतात, असेही मस्क यांनी सांगितले.

मस्क यांनी शुल्क भरून स्पॅम बॉट्सचा सामना करण्याची भाषा वापरली असली तरी ते कसे होणार? बनावट आणि ऑटोमेटेड बॉट्स कसे रोखणार? याबाबत काहीही उघड केलेले नाही. कारण स्पॅमर्स थोडे शुल्क देऊन अनेख खाती उघडू शकतात. त्यानंतर ते तीन महिन्यांची वाट पाहू शकतात कारण त्यांतर एक्स मोफत वापरता येणार आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य वापरकर्त्यांना मात्र साइनअप करताना सर्व माहिती भरावी लागते. त्याउपर शुल्क भरून जर एक्स वापरायचे असेल तर नवे युजर्स इतर सोशल नेटवर्किंग साईटकडे वळू शकतात?

न्यूझीलंड आणि फिलिपिन्समध्ये सध्या शुल्क आकारले जात आहे. न्यूझीलंडमध्ये १.७५ डॉलर घेतले जातात. इतर ठिकाणी एक डॉलरचे शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.