प्रश्न – माझ्याकडे दोन फोन आहेत. त्यातील एक फोन मला बंद करावयाचा आहे. पहिल्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप, हाइकमधील चॅट्स नवीन फोनमध्ये घेता येतील का? किंवा जुन्या फोनमध्ये ते तसेच राहतील का? राहत असतील तर किती दिवस राहतील त्याला काही मर्यादा असते का?
– श्रवण कुलकर्णी, बीड
उत्तर – हो नक्की घेता येईल. तुम्हाला केवळ व्हॉट्सअ‍ॅप किंवा हाइकमधील चॅट्ससाठी दोन फोन बाळगण्याची गरज नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जुन्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप किंवा हाइक चॅट्सचा बॅकअप घ्या. यासाठी तुम्ही संबंधित अ‍ॅपच्या मेन्यूमध्ये जा. तेथे बॅकअपचा पर्याय असतो. तो पर्याय निवडा व बॅकअप घ्या. बॅकअप घेताना तो मेमरी कार्डवर घ्या किंवा अंतर्गत साठवणुकीत घेतला आणि नंतर तो मेमरी कार्डमध्ये सेव्ह केला तरी चालेल. यानंतर तुम्ही तुमचा नवीन फोन सुरू करा. त्यात जुन्या फोनमधील मेमरी कार्ड टाका. मग या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप किंवा हाइक इन्स्टॉल करा. तुमचा नंबर व्हेरिफाइड झाल्यावर अ‍ॅप डेटा रिस्टोअर असा प्रश्न विचारला जाईल. त्या वेळी ‘हो’ हा पर्याय निवडा. मग तुम्हाला तुमच्या सर्व चॅट्सचा बॅकअप मिळू शकेल. तसेच हा डेटा तुमच्या जुन्या फोनमध्ये तुम्ही जोपर्यंत डिलिट करत नाही तोपर्यंत राहू शकतो.

प्रश्न – आम्ही गुगलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये जातो त्यावेळेस अनेकदा आम्हाला थेट अ‍ॅप इन्स्टॉलचा पर्याय समोर येतो. पण काही वेळेस अ‍ॅप पर्चेस असा पर्याय समोर येतो. हे अ‍ॅप पर्चेस काय असते. त्यामुळे काही पैसे कापले जातात का?
– चंद्रशेखर फड
उत्तर – अ‍ॅप स्टोअरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अ‍ॅप सुरू केल्यावर थेट अ‍ॅप इन्स्टॉलचा पर्याय येतो. त्या वेळेस ते अ‍ॅप मोफत उपलब्ध असते. पण ज्यावेळेस तुम्हाला अ‍ॅप पर्चेस असा पर्याय येतो त्यावेळेस ते अ‍ॅप तुम्हाला खरेदी करावे लागते. यासाठी तुम्हाला आधी गुगल पे या पेमेंट गेटवेमधून पैसे भरावे लागतात. त्यानंतरच तुम्ही ते अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू शकतात.
– तंत्रस्वामी