News Flash

स्मार्ट रिव्ह्य़ू : नोकिया लुमिआ ९२०

स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या तगडी टक्कर सुरू आहे. एका बाजूस आयफोन विरुद्ध सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री असा सामना रंगला आहे. त्यात आता गॅलेक्सी नोटच्या अद्ययावत मॉडेलची

| April 5, 2013 12:39 pm

स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या तगडी टक्कर सुरू आहे. एका बाजूस आयफोन विरुद्ध सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री असा सामना रंगला आहे. त्यात आता गॅलेक्सी नोटच्या अद्ययावत मॉडेलची भर पडली आहे. दुसरीकडे एचटीसी, नोकिया, मोटरोला आदी कंपन्यांनीही कंबर कसली आहे. या वातावरणात नोकियासाठी मात्र ही लढाई अटीतटीची आहे. कारण नोकियाने बाजारात आणलेल्या लुमिआ आणि आशा या दोन्ही मालिकांवर नोकिया या बाजारपेठेत किती तगणार किंवा नाही, याचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचप्रमाणे लुमिआ मालिकेवर मोबाईलच्या बाजारपेठेतील मायक्रोसॉफ्टचेही भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे नोकिया लुमिआ ९२० हे मॉडेल बाजारपेठेत यशस्वी होण्यावर एका अर्थाने मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया दोघांचेही भवितव्य एकत्रितरित्या अवलंबून आहे. कारण मायक्रोसॉफ्ट विंडोज मोबाईलसाठी लुमिआ ९२० हे सर्वात महत्त्वाचे मॉडेल आहे.
नोकिया लुमिआ ९२० हे मॉडेल पिवळ्या, गुलाबी, निळ्या अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. मात्र लोकसत्ताकडे रिव्ह्य़ूसाठी पाठविलेले मॉडेल हे काळ्या रंगाचेच होते. हा स्मार्टफोन हाती घेतल्यानंतर जाणवणारे त्याचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे वजन. काहीशा जड भासणाऱ्या या स्मार्टफोनचे वजन १८५ ग्रॅम्स आहे. इतरांच्या तुलनेत तो जडच आहे. यापूर्वीही लुमिआ मालिकेतील फोन इतरांच्या तुलनेत जडच होते.
फोन हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण त्यात सिम कार्ड घालण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेस लक्षात येते की, हे लुमिआ ९२० हा युनिबॉडी प्रकारातील स्मार्टफोन आहे. त्यामुळे मागच्या बाजूस असलेले कव्हर काढून त्यातील बॅटरी वेगळी करण्याची सोय यात नाही. मुळात युनिबॉडी प्रकारामध्ये बॅटरी बाहेर काढण्याची कोणताही सोय नसते. फोन पूर्णपणे बंद असतो. सिमकार्डासाठी एका बाजूला स्लॉट देण्यात येतो. लुमिआ ९२०लाही अशाच प्रकारचा सिम कार्ड स्लॉट आहे. त्यात नेहमीचे सिम कार्ड चालत नाही. इथे मायक्रो सिम कार्डाचा वापर करावा लागतो. इतर स्मार्टफोनना मेमरीसाठी एक एसडी कार्डाचा स्लॉट असतो. त्या माध्यमातून एक्सर्नल मेमरी वाढविता येते. असा कोणताही एसडी कार्ड स्लॉट नोकिया लुमिआ ९२०ला नाही. त्या ऐवजी ३२ जीबी एवढी इंटर्नल मेमरी नोकियाने दिली आहे. ३२ जीबी ही पुरेशी मेमरी आहे.
स्मार्टफोनचा दर्शनी भान आपल्या समोर धरल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूस वरती आवाज कमी- अधिक करण्याचे मोठे बटन आणि खालती पॉवर ऑन- ऑफ किंवा स्क्रीन लॉक करण्याचे बटन व सर्वात खालती कॅमेरा सुरू करण्याचे किंवा क्लिक्  करण्यासाठीचे बटन देण्यात आले आहे.
खालच्या बाजूस मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला असून वरच्या बाजूस हेडफोनचे सॉकेट आणि सिम कार्डासाठीचा मायक्रो सिम ट्रे देण्यात आला आहे. समोरच्या बाजूस १.३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा व्हिडिओ चॅटसाठी तर मागच्या बाजूस ८ मेगापिक्सेल क्षमतेचा प्युअरव्ह्य़ू कॅमेरा देण्यात आला आहे. याच्यासाठी कार्ल झेइसची लेन्स वापरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मागच्या बाजूस दोन छोटेखानी एलइडी लाइटस् फ्लॅशसारखा वापर करण्यासाठी देण्यात आले आहेत.
कॅमेऱ्याचे हे बाह्य़रंग पाहिल्यानंतर आपण तो प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी त्याच्या स्क्रीनकडे वळतो, त्यावेळेस लक्षात येते की, दर्शनी बाजूस बहुतांश भाग हा स्क्रीननेच व्यापलेला आहे.  या ४.५ इंचाच्या डिस्प्ले स्क्रीनचे रिझोल्युशन ७६८ गुणिले १२८० पिक्सेल्सचे आहे. शिवाय ते ३३२ पीपीआय क्षमतेचे असल्याने त्याची सुस्पष्टता वाढली आहे.
नोकिया लुमिआचा हा स्क्रीन खरोखरच प्रेमात पडावा, असा आहे, हे फोन सुरू केल्यानंतर लक्षात येते. उजळ रंगसंवेदना हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नोकियाने त्यासाठी केलेला प्युअर मोशन एचडी प्लस आणि क्लीअर ब्लॅक तंत्रज्ञानाचा वापर. शिवाय दर्शनी काचेसाठी गोरिला ग्लास टूचा वापर करण्यात आला आहे. स्क्रीनची रंग संवेदना उत्तम आहे. आणि गोरिला ग्लासमुळे वापरताना त्याला चरे पडण्याची शक्यताही कमीच आहे.
कोणत्याही फोनसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो त्याचा प्रोसेसर. हे स्मार्टफोनचे हृदय मानले जाते. लुमिआ ९२० साठी विंडोज मोबाईल ८ ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन १.५ गिगाहर्टझ्चा डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यात १ जीबी रॅमचाही समावेश आहे. विंडोज ८ ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम वापरात वेगवान आहे.
विंडोज ८च्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये जसे टाइल्सचे डिझाईन आहे, तसेच डिझाईन विंडोज मोबाईलमध्येही पाहायला मिळते. अलीकडे वापरकर्त्यांचे मल्टिटास्किंग वाढल्यामुळे एकाच वेळेस अनेक गोष्टी हाताशी असाव्यात म्हणून विंडोज ८मध्ये अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. मोबाईलमध्ये ती अधिक सुविधाजनक ठरते कारण डेस्कटॉपपेक्षा मोबाईलमध्ये अपडेशनला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे तुम्हाला समोर दिसणाऱ्या टाइल्समध्ये फेसबुक, ट्विटर किंवा इतर अपडेस् सतत येत राहतात. आणि सारे काही तुम्हाला स्क्रीनवरच पाहाता येते. त्यासाठी प्रत्येक अ‍ॅप्स ओपन करून तिथे जाण्याची गरज भासत नाही. म्हणजेच या टाइल्स एक प्रकारे डेस्कटॉपवरील ‘शॉर्टकट’चे काम करतात.
हा प्रकार ही उत्तम सुविधा असला तरी त्यात एक त्रुटी आहे. ती म्हणजे मेसेज टाइलमध्ये ३० संदेश आले आहेत हे त्यावर जाताच कळत असले तरी नंतर आपण दुसऱ्या टाइलवर गेल्यानंतर आधीचे अपडेटस् आपण वाचले आहेत, असे ऑपरेटिंग सिस्टिम गृहीत धरते आणि ते संदेश वाचलेले नसतानाही केवळ नंतर आलेले अपडेटस्च दाखवते. ही त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. व्हॉटस्अ‍ॅप सारख्या अनेक मेसेंजर अ‍ॅप्समध्ये हीच पद्धती वापरली जाते. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे.
लुमिआ ९२० मध्ये एमपी४, डब्लूएमव्ही आणि एव्हीआय फॉर्मॅटस् प्री- लोडेड स्वरूपात देण्यात आले आहेत. एचडी चित्रणही त्याच्या स्क्रीनच्या उत्तम क्षमतेमुळे चांगल्या प्रकारे अनुभवता येते.
कनेक्टिविटीसाठी लुमिआ ९२०मध्ये एलटीइ सुविधा देण्यात आली आहे. मात्र सध्या तरी भारतात हा फॉरमॅट उपलब्ध नसल्याने आपल्याला थ्रीजी किंवा एज तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागतो. या शिवाय वाय- फाय (डय़ुएल बॅण्ड), एनएफसी, ब्लूटूथ या सुविधा दिमतीला आहेतच. यातील अनेक सुविधा या आपल्याला सिंक्रोनाइज्ड पद्धतीने वापराव्या लागतात. आणि त्यासाठी आपले मायक्रोसॉफ्टचे इ- मेल अकाऊंट प्रमुख माध्यम म्हणून वापरावे लागते. मात्र ते सिंक्रोनाइज्ड होताना बऱ्याचदा ‘एरर मेसेज’ला सामोरे जावे लागते आणि सततचे ‘ट्राय लेटर’ पाहून आपण वैतागून जातो, असा अनुभव रिव्ह्य़ू दरम्यान आला.
इथून सुरू झालेले नेटवर्क एरर किंवा एरर मेजेस मग आपली पाठ सोडतच नाहीत. अनेकदा नोकिया स्टोअर मधील अ‍ॅप्स सिंक्रोनाइज्ड करतानाही अशाच प्रकारच्या एररला सामोरे जावे लागले. लुमिआ ९२०च्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी लागते ती म्हणजे मुळात नोकिया स्टोअर आता बरेचसे अपडेटेड असले तरी त्यामधून किंवा मग मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅप्स स्टोअरच्या माध्यमातून या हॅण्डसेटसाठी निवड करताना विंडोज ८वर चालणाऱ्या अ‍ॅप्सचीच निवड करणे भाग असते. आणि सध्या तरी विंडोज ८ वर चालणाऱ्या अ‍ॅप्सची संख्या तुलनेने कमी आहे. ती वाढविणे अधिक गरजेचे आहे.
नोकिया म्युझिक अ‍ॅपचा वापर लुमिआ ९२०साठी करता येई शकतो. यात ऑनलाइन गाण्यांची सुविधाही आहे. त्यातील बराचशी गाणी ही मोफतही आहेत.
याशिवाय सर्वाधिक सुविधा असणारी आणि बऱ्याचदा लागणारी सॉफ्टवेअर्स म्हणजे वननोट आणि ऑफिस. या दोन्हींची सुविधा यात असल्याने तुम्हाला वर्ड, एक्सेल आणि सादरीकरणासाठी पॉवरपॉइंट इथे वापरता येईल. गेिमगसाठी एक्सबॉक्सची स्वतंत्र टाइल देण्यात आली आहे. अँग्री बर्ड तर प्री लोडेड रूपातच विराजमान आहे.
लुमिआ ९२०चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे वायरलेस चार्जिंग मात्र त्यासाठी वेगळी जोडउपकरणे स्वतंत्रपणे विकत घ्यावी लागतात.

कॅमेरा
मोबाईल फोन खरेदी करताना अलीकडे ज्या बाबींना प्राधान्य दिले जाते, त्यात कॅमेऱ्याचा समावेश असतो. स्मार्टफोनमधील कॅमेरा अधिक क्षमतेचा आणि उत्तम चित्रणाच्या अनेक सुविधा देणारा असावा, अशी अपेक्षा असते. या सर्व अपेक्षा लुमिआ ९२०मध्ये पूर्ण होतात. यासाठी वापरण्यात आलेल्या प्युअर व्ह्य़ू कॅमेऱ्याने त्याच्या सुस्पष्टतेमध्ये चांगलीच वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेर जाताना पॉइंट अ‍ॅण्ड शूट डिजिटल कॅमेरा वेगळा सोबत नेण्याची गरज भासणार नाही.
उन्हामध्ये क्लिक् केलेली छायाचित्रे तर चांगली येतातच पण कमी प्रकाशातील चित्रणही यात उत्तम पद्धतीने करता येते. केवळ मोबाईलमधील कॅमेराच नव्हे तर डिजिटल कॅमेऱ्यांमध्येही कमी प्रकाशात चांगले चित्रण करणारे कॅमेरे हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढे कमी आहेत.
याशिवाय डिजिटल कॉम्पॅक्ट कॅमेऱ्याप्रमाणेच आयएसओ सेटिंग्ज, सीन, एक्सपोजर कंट्रोल, व्हाइट बॅलन्स आदी साटी विविध पर्याय देण्यात आले आहेत. त्याशिवाय खास पॅनोरमा आणि सिनेमाग्राफ मोडस्ही देण्यात आले आहेत. फोटो टिपल्यानंतर लगेचच उजवीकडे टॅप केल्यास ते शेअर करण्यासाठीचा पर्याय समोर येतो आणि पुढच्याच मिनिटाला फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याची सुविधा यात आहे. क्लोज अप मोडवर फोटो टिपताना सुमारे सहा ते सात सेंमी.चे अंतर ठेवावे लागते. असे चित्रण उत्तम उतरते. आयएसओ सेटिंग्जमध्ये १०० ते ८०० पर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑटोफोकसची सुविधाही आहेच.
यात एक छान पर्याय नोकियामध्ये उपलब्ध आहे, तो म्हणजे एखादा क्षण टिपताना दर सेकंदाला एक याप्रमाणे फोटो टिपले जातात आणि मग त्यातील आपल्याला अपेक्षित नेमका क्षण ठेवून बाकीचे फोटो डिलीट करता येतात.
एचडी व्हिडिओ शुटिंगसाठी १०८०पी पूर्ण एचडी क्षमतेची सोय आहे. फ्लोटिंग लेन्स तंत्रामुळे यात हात थोडा अस्थिर असला तरी चित्रणात फारसे जाणवत नाही. समोरच्या बाजूस असलेला कॅमेराही ७२० पी या क्षमतेने व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
 या कॅमेऱ्याचा आवाजही सुस्पष्ट असून त्यामध्ये डॉल्बीचा पर्यायही देण्यात आला आहे. फोनवर येणारा आवाज आणि संगीत दोन्ही सुश्राव्य या वर्गात मोडणारे आहे.
अनेकदा मोबाईल वरून एखादी फाईल इतरत्र सेव्ह करताना किंवा फाइल ट्रान्स्फर करतानाही त्या फोनसाठी असलेले खास सॉफ्टवेअर वापरावे लागते.  ही बाब अनेकदा अडचणीची ठरते म्हणूनच नोकिया लुमिआ ९२०मध्ये कोणत्याही सॉफ्टवेअर डाऊनलोडशिवाय फाइल ट्रान्स्फरची सुविधा देण्यात आली असून ती अतिशय उपयुक्त सोय आहे.

बॅटरी क्षमता
लुमिआ ९२०साठी २००० एमएएच बॅटरी वापरण्यात आली आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर पूर्ण दिवस ही बॅटरी वापरता येते. स्मार्टफोनमधील अनेक अ‍ॅप्स एकाच वेळेस सुरू असतात आणि त्यावर सतत येणाऱ्या अपडेस्मुळे बॅटरी लवकर संपते, असा अनुभव आहे. त्यामुळे इ-मेल किंवा आणखी दोन- तीन आवश्यक सुविधाच सुरू ठेवल्यास बॅटरी सहज दिवसभर वापरता येऊ शकते.

निष्कर्ष
विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत इतर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमसह उपलब्ध असलेल्या स्पर्धक कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक आहे. हा स्मार्टफोन वेगात काम करणारा असला तरी विंडोज ८ सुरुवातीस काहीसे गोंधळात टाकणारे आहे. याचा कॅमेरा हा सर्वात चांगला अनुभव देणारा आहे. त्यामुळे वेगळा डिजिकॅम सोबत नेण्याची गरजच उरत नाही. विंडोज ८च्या वेगळ्या अनुभवासाठी हा विकत घेण्यात हरकत नाही, फक्त त्या पूर्वी एकदा खिसा मात्र नक्कीच तपासून पाहा.
चांगल्या बाबी : ३२ जीबीची इंटर्नल मेमरी, उत्तम टचस्क्रीन,
चांगला कॅमेरा, चांगली बॅटरी क्षमता
त्रुटी : विंडोज ८साठी फारच कमी अ‍ॅप्स उपलब्ध,
मायक्रो एसडी स्लॉट नाही
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ३८,१९९/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2013 12:39 pm

Web Title: smart review nokia lumia 920
टॅग : Mobile,Nokia
Next Stories
1 डेल इन्स्पिरेशन २३३०; डेस्कटॉपवर विंडोज आठ
2 सीगेट वायरलेस प्लस; साठवणूक करा वायरलेस
3 आयपॅड
Just Now!
X