26 September 2020

News Flash

५-१५ की दौड!

भारतातील मोबाइलधारकांच्या संख्येत वाढ होत असताना स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत अधिक भर पडत आहे.

| March 3, 2015 06:28 am

भारतातील मोबाइलधारकांच्या संख्येत वाढ होत असताना स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत अधिक भर पडत आहे. सुमारे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारातील ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी जगभरातील कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. यातूनच भारतीय ग्राहकाला आवडतील अशा सुविधा असलेले स्मार्टफोन कमीतकमी दरात उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच २०१४मध्ये पाच हजार रुपयांपासून १५ हजार रुपये या किंमतश्रेणीतील स्मार्टफोन सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत.
भारत ही जगातील एक मोठी बाजारपेठ आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात वाढत्या नागरीकरणामुळे अधिकाधिक जनतेच्या हाती पैसा खेळू लागला आहे. साहजिकच त्यामुळे राहणीमानही उंचावत चालले आहे. या सर्वाचा सर्वाधिक प्रभाव मोबाइल वापरातून दिसून येतो. पूर्वी केवळ संभाषणासाठी वापरण्यात येणारा मोबाइल ‘स्मार्ट’ झाल्यापासून भारतीयांतही ‘स्मार्टफोन’धारक बनण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन घेऊन येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, भारतात २०१३मध्ये ९५७ मोबाइल ‘लाँच’ करण्यात आले, तर २०१४मध्ये हाच आकडा ११३७वर येऊन ठेपला. या वर्षी सुमारे दीड हजार मोबाइल भारतीय ग्राहकांसाठी बाजारात येण्याची शक्यता आहे. ही सगळी आकडेवारी पाहिली तर भारतीय बाजारपेठेचे मोल जगभरातील कंपन्यांना उमगल्याचे दिसून येते. जास्तीतजास्त भारतीय आपल्या कंपनीचे ग्राहक असावेत, यासाठी एकीकडे मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना छोटय़ा कंपन्याही यात मागे नाहीत.
भारतीय ग्राहक हा चोखंदळ आहे. कोणतीही वस्तू घ्यायला गेल्यावर तो पहिल्यांदा त्याची किंमत पाहतो. त्यातही तो घासाघीस करण्यास मागेपुढे बघत नाही. भारतीयांची हीच वृत्ती पाहून कमी किमत श्रेणीमधील मोबाइल आणण्याला बहुतांश कंपन्यांनी प्राधान्य दिले आहे. भारतातील मोबाइल बाजारपेठेचे वार्षिक विश्लेषण करणाऱ्या ‘९१ मोबाइल्स’ या संस्थेच्या एका अहवालानुसार, २०१४मध्ये भारतात ९५ ब्रॅण्डचे ११३७ मोबाइल फोन लाँच करण्यात आले. यामध्ये ३१ बॅ्रण्ड आंतरराष्ट्रीय तर तब्बल ६४ भारतीय ब्रॅण्ड आहेत. या ६४ ब्रॅण्डनी मिळून २०१४मध्ये सुमारे ४७६ स्मार्टफोन बाजारात आणले. २०१३मध्ये हाच आकडा ३८४ इतका होता. मायक्रोमॅक्स, कार्बन, इन्टेक्स, लाव्हा, झोलो, स्पाइस, आयबॉल, सॅमसंग, एलजी अशा देशांतर्गत मोबाइलनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या कंपन्यांनी आणलेल्या पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील मोबाइलची संख्या २०१३मध्ये १५० इतकी होती, ती २०१४मध्ये २०२वर पोहोचली. तर दुसरीकडे ५ ते १५ हजार रुपये किंमत श्रेणीतील मोबाइलची संख्या २१९ वरून २६४वर गेली आहे. एकीकडे भारतीय कंपन्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाचा विचार करून मोबाइल आणत असताना, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपला मोर्चा उच्च मध्यमवर्ग आणि त्यापेक्षा वरच्या उत्पन्न श्रेणीतील ग्राहकाकडे वळवला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून लाँच झालेल्या पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मोबाइलची संख्या २०१४मध्ये त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत निम्म्यावर घसरली. भारतीय कंपन्यांना सरकारकडून मिळणाऱ्या करसवलती, कमी निर्मिती खर्च आणि मर्यादित ग्राहकक्षेत्र यांमुळे निम्न किंमत श्रेणीतील स्मार्टफोन आणणे त्यांना शक्य होत आहे. याचाच धसका घेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन निर्मितीतून ‘एग्झिट’ घेतल्याचे चित्र आहे. अशा कंपन्यांनी गेल्या वर्षी १५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे तब्बल ९५ स्मार्टफोन बाजारात आणले. २०१३मध्ये हा आकडा ६७ इतकाच होता. यावरून सर्वसामान्य ग्राहक म्हणजे भारतीय बॅ्रण्ड आणि उच्चभ्रू वर्गातील ग्राहक म्हणजे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड अशी दरी निर्माण झाल्याचे जाणवते. असे असले तरी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एका किंमतश्रेणीतील ग्राहकासाठी अजूनही कट्टर स्पर्धा सुरू आहे. तो ग्राहक म्हणजे मध्यमवर्गीय माणूस. देशातील मध्यमवर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावरच डोळा ठेवून गेल्या वर्षी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पाच ते १५ हजार रुपये श्रेणीत तब्बल ३६८ मोबाइल ब्रॅण्ड लाँच केले. २००३मध्ये हा आकडा २९०च्या घरात होता.
भारतातील ९४ कोटी ४० लाख मोबाइलधारकांपैकी सुमारे ८४ कोटी ग्राहक सक्रिय मोबाइल वापरकर्ते असल्याचा ट्रायचा अहवाल आहे. या ८४ कोटी ग्राहकांमध्ये मोठा वर्ग पाच ते १५ हजार रुपये किंमत श्रेणीतील मोबाइल ग्राहक आहे. या ग्राहकाला जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा, अधिक शक्तिशाली प्रोसेसर आणि अधिक स्टोअरेज क्षमता असलेले स्मार्टफोन हवे आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षांत लाँच झालेल्या ११३७ फोन्सपैकी ६० टक्के स्मार्टफोन क्वाड कोअर प्रोसेसर किंवा त्याहून अधिक क्षमतेचे आहेत. त्याचप्रमाणे एक ते दीड जीबीपर्यंतची रॅम असलेले मोबाइल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्याही सर्वाधिक आहे. तीच गोष्ट कॅमेरा आणि बॅटरी क्षमतेची आहे. भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकाच्या गरजा पूर्ण करतानाच त्याला त्याच्या बजेटमध्ये मोबाइल पुरवण्याकडे कंपन्या आता काटेकोरपणे लक्ष देत आहेत.
भारतात स्मार्टफोनच्या वापराला सुरुवात होऊन जेमतेम पाच वर्षे होत आहेत. या काळात कंपन्यांनी फीचर फोन अथवा साध्या मोबाइलची निर्मिती सुरू ठेवली असली तरी स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कन्व्‍‌र्हजस कॅटलिस्ट या संस्थेच्या एका अहवालानुसार ३१ डिसेंबर २०१४पर्यंत भारतात विक्री झालेल्या स्मार्टफोनचा आकडा १९ कोटींच्या घरात आहे. हाच आकडा २०१७-१८पर्यंत ५० कोटींवर पोहोचलेला पाहायला मिळेल. पण स्मार्टफोनची किंमत हा या वाढीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. गेल्या वर्षी ५ ते १५ हजार रुपये किंमत श्रेणीतील ग्राहकांची संख्या वाढल्याने स्मार्टफोनच्या किमती जवळपास १९ टक्क्यांनी घसरल्याचे ‘९१ मोबाइल्स’चे म्हणणे आहे. हाच ट्रेंड कायम राहिला तर भारतात मोबाइलचे केवळ ‘स्मार्ट’ ग्राहक दिसल्यावाचून राहणार नाही.
– आसिफ बागवान, asif.bagwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:28 am

Web Title: smartphones in 5 to 15 thousand ruppes
Next Stories
1 ‘यूएचडी फोर के’ची धम्माल!
2 घरबसल्या जगाची सफर
3 डेटामय भारतीय
Just Now!
X