गेल्या वर्षी जे शब्द विशेष गाजले त्यात ‘सेल्फी’ हा एक शब्द होता. सेल्फी याचा अर्थ मोबाइलमधील कॅमेऱ्याने स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढणे. नासाच्या माइक हॉपकिन्स या अवकाशवीराने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातून बाहेर पडून त्याची दुरुस्ती करीत असताना गंमत म्हणून सेल्फी करून स्वत:चे छायाचित्र काढले. बहुधा ते मोबाइल कॅमेऱ्याने काढलेले नाही तर निकॉनच्या कॅमेऱ्याने काढलेले असावे. कारण अवकाशस्थानकात तो कॅमेरा आहे. या छायाचित्रात त्याच्या छबीच्या पाश्र्वभूमीवर निळीशार पृथ्वी दिसते आहे. त्याच्या हेल्मेटमध्ये एका व्यक्तीचे प्रतििबब पडलेले आहे तो आहे त्याचा सहकारी अवकाशवीर रिक मॅस्ट्रोशियो. हॉपकिन्स हा २४ डिसेंबरला स्पेसवॉक करण्यासाठी बाहेर पडला होता, अवकाशस्थानकातील गळका पाण्याचा पंप दुरुस्त करण्याचे काम करीत असताना त्याला अचानक सेल्फीचा मोह झाला व त्याने स्वत:ची छबी टिपलीही. त्यात तो खरा पृथ्वीपुत्र शोभतो आहे. विशेष म्हणजे नासाने इन्स्टाग्राममध्ये हे छायाचित्र समाविष्टही केले आहे. खरं पाहिलं तर सेल्फी करणारा तो काही पहिला अवकाशवीर आहे असे म्हणता येणार नाही, पण सेल्फी शब्दाची क्रेझ सुरू झाल्यानंतर मात्र त्याच्या या छायाचित्राला महत्त्व आले. दुसरे म्हणजे त्याने कलात्मक पद्धतीने पृथ्वी त्याच्या पाश्र्वभूमीला आणण्यात यश मिळवले आहे. अमेरिकेच्याच कॅरेन नायबर्ग या अमेरिकेच्याच एक मुलाची आई असलेल्या अवकाशयात्री महिलेने नोव्हेंबर २०१३ मध्येच सेल्फीचा प्रयोग केला होता. त्यात ती तिच्या सहकारी अंतराळवीरांसमवेत दिसत आहे. तिने तिचे छायाचित्र ट्विटरवरही टाकले होते. पण अवकाशात सेल्फी करणे म्हणजे पोरखेळ नाही. तेही अवकाशस्थानकाच्या बाहेर पडून अंधातरी अवस्थेत असे छायाचित्र इतक्या कलात्मकतेने टिपणाऱ्या हॉपकिन्सच्या वेगळे काहीतरी करून पाहण्याच्या या कृतीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.