06 August 2020

News Flash

फोनची ‘स्मार्ट’ परीक्षा

लावा मोबाइल’ ही तशी तरुण कंपनी. २००९ मध्ये हरी ओम राय यांनी या कंपनीची स्थापना केली.

भारतीय कंपनी ‘लावा मोबाइल’ यांचीही संशोधन आणि विकास शाखा चीनमध्ये आहे.

‘मेड इन चायना’ हा टॅग लागला की ग्राहकाची विश्वासार्हता कमी होते. प्रत्येक नामांकित कंपनीच्या वस्तूची हुबेहूब नक्कल करून ती वस्तू बाजारात आणण्यात चिनी माहीर. मात्र चीनमधील कंपन्यांची उत्पादन क्षमता आणि त्याप्रति त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन अनेक बडय़ा कंपन्यांनी चीनमध्ये उत्पादन सुरू केले. यामध्ये अ‍ॅपलसारखी कंपनीही मागे राहिली नाही. कमी वेळात कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पादन देण्याची चिनी लोकांची क्षमता याचे मुख्य कारण आहे. यामुळे ज्या देशात गुगल आणि त्याच्या उत्पादनांवर बंदी आहे. तोच देश जगभरातील सर्वाधिक अँड्रॉइड फोनची निर्मिती करणारा देश ठरला आहे. भारतीय कंपनी ‘लावा मोबाइल’ यांचीही संशोधन आणि विकास शाखा चीनमध्ये आहे. तसेच उत्पादन केंद्रही आहे. कंपनीच्या ‘शेनजेन’ संशोधन आणि विकास शाखेला भेट दिल्यानंतर स्वस्तात मस्त मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या या कंपन्याही फोनची ‘स्मार्ट’परीक्षा घेतल्याशिवाय उत्पादन बाजारात आणत नाहीत. यामुळेच ते ग्राहकांची मने जिंकू शकतात याची खात्री पटते. त्यांच्या संशोधन आणि विकास विभागातील कामाचा लेखाजोखा मांडत असतानाच फोनच्या निर्मितीची कथा आपल्यासमोर उभी राहू शकेल.

दक्षिण चीनमधील ‘शेनजेन’ हे सर्वात तरुण शहर मानले जाते. अवघ्या तीस वर्षांच्या (गेल्या बारा वर्षांत वेगाने) कालावधीत या शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आणि हे शहर देशाचे आयटी शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे शहर आज देशातील सर्वात महागडे शहर म्हणूनही ओळखले जाऊ लागले. येथील स्थानिकांच्या बरोबरीनेच परदेशी नागरिकही तेथे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास आहेत. यात अर्थात भारतीयांचे प्रमाण जास्तच. याच शहरातील एका गगनचुंबी इमारतीत भारतीय मोबाइल कंपनी ‘लावा मोबाइल’चे संशोधन आणि विकास कार्यालय वसलेले आहे. चीनमधील विवो, ओप्पो या ब्रॅंड्सच्या तुलनेत ही कंपनी फारच छोटी. मात्र तरीही स्वस्त आणि मस्त मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीतही त्याच दर्जाच्या सुविधा आणि संशोधन व विकासाचे काम चालणे ही या कंपनीची खासियत. संशोधनावर विशेष भर दिल्यामुळेच कंपनीने १४ पेटंट्ससाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या संशोधनामुळेच जास्त किमतीच्या स्मार्टफोनमधील सुविधा कमी किमतीच्या फोनमध्ये उपलब्ध होणे शक्य झाले आहे. कंपनीच्या फोनमध्ये अ‍ॅपलच्या फोनमधील कॅमेरामध्ये असलेला बोके मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी कंपनीमध्ये विविधस्तरावर संशोधनाचे काम पार पडले.

मोबाइलची रचना

‘लावा मोबाइल’ ही तशी तरुण कंपनी. २००९ मध्ये हरी ओम राय यांनी या कंपनीची स्थापना केली. फिचरफोनमध्ये इंटरनेट उपलब्ध करून देणारी ही पहिली कंपनी. या कंपनीने २०११मध्ये स्मार्टफोनच्या क्षेत्रात उडी घेतली. बडय़ा कंपन्यांशी स्पर्धा नव्हतीच. पण कमी किमतीत मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांच्या रांगेत बसत असताना आपला वेगळेपणा कसा सिद्ध करता येईल यासाठी कंपनीने संशोधनावर भर देण्याचे ठरविले. यामध्ये वापरकर्ता फोन हातात कोणकोणत्या प्रकारे धरतो, त्याला तो कोणत्या प्रकारे धरणे सोयीस्कर वाटते इथपासून ते अनेक छोटय़ा बाबींचा विचार करून स्मार्टफोन क्षेत्रात काम सुरू केले. यामध्ये मोबाइलच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जगभरातील सर्व आकाराचे मोबाइल आपल्या कार्यालयात आणले. यातून वापरकर्त्यांला कोणत्या प्रकारचा आकार अधिक सोयीस्कर होईल याचा विचार सुरू झाला. काही अभिकल्पतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. संगणक आणि अभिकल्पतज्ज्ञाने हाताने काढलेल्या रचनांचा अभ्यास करून एक रचना अंतिम केली जाते. कंपनीच्या तर्फे  फोनची एखादी मालिका तयार करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया सुरू होते. फोनची रचना तयार झाल्यावर त्याच विभागात रंगांच्या आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त छटा ठेवलेल्या असतात. या छटांमधील कोणता रंग या मालिकेतील फोनसाठी उपलब्ध करून द्यायचा यावर विचार केला जातो. अभिकल्पतज्ज्ञाचे काम बाजारातील मागणी या सर्वावर विचारमंथन करून एक रचना आणि रंग अंतिम केला जातो.

हार्डवेअर आणि कॅमेरा

कोणताही फोन चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी हार्डवेअर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये कॅमेरापासून ते चिपसेटपर्यंत सर्वाचाच समावेश आहे. आज जगभरातील स्मार्टफोनमध्ये आयबीएम, इंटेल, स्नॅपड्रॅगनसारख्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या आहेत. या स्पर्धेत उडी घेण्याचा ‘लावा’चा विचार आहे. यामुळे यांनी चीनमधील विद्यापीठाशी चिपवर संशोधन करण्यासाठी सहकार्य करार केला आहे. त्यांच्या दहा हजार रुपयांच्या आतील फोनमध्ये उत्तम दर्जाचे हार्डवेअर वापरले जाते. यामुळेच हे फोन अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. या फोनमध्ये वापरण्यात येणारा कॅमेराचा  दर्जाही उत्तम असतो. कॅमेरा कसा असावा याचा अभ्यास करण्यासाठी कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात एक स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओमध्ये कॅमेऱ्याच्या बारकाव्यांचा अभ्यास केला जातो. तसेच कोणत्या रंगाचे छायाचित्र टिपले असता ते कसे दिसते याचा विचारही या स्टुडिओमध्ये केला जातो. इथे कॅमेऱ्याची विविध रूपे पाहायला मिळतात. त्याच्या लेन्सचा विशेष अभ्यास करून कोणत्या प्रकारच्या लेन्स वापरायच्या याचा निर्णय घेतला जातो. जास्त किमतीच्या फोनच्या कॅमेरामधील सुविधा या फोनमध्ये कशी उपलब्ध करून देता येईल, यावर इथे विशेष अभ्यास केला जातो. याच अभ्यासाचे फलित म्हणून अ‍ॅपलच्या फोनमधील ‘बोकेमोड’ या कंपनीच्या आगामी फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे दहा हजारपेक्षा स्वस्त असलेल्या फोनमध्येही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फोनमधील सुविधा उपलब्ध होणार आहे. फोनचा आवाजाचा दर्जा चांगला असावा यासाठी आवाजाचे परीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी एक छोटेखानी खोली तयार करण्यात आली आहे. याचे दार आतल्या बाजूने विशिष्ट  आकाराच्या स्पंजच्या शीटने तयार केलेले असते. या स्पंजच्या शीटमुळे आवाजातील एको आणि त्याची स्पष्टता समजण्यास मदत होते.

सॉफ्टवेअर

हार्डवेअरबरोबरच सॉफ्टवेअरही महत्त्वाची भूमिका बजावत असते. या कंपनीच्या सर्व फोनमध्ये अँड्रॉइड ही मुख्य ऑपरेटिंग प्रणाली वापरली जात असली, तरी भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने फोन वापरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी कंपनीतर्फे स्वतंत्र अशी ‘स्टार ओएस’ विकसित करण्यात आली आहे. या ऑपरेटिंग प्रणालीच्या आधारे फोन वापरणे अधिक सुलभ करण्यात आले आहे. तसेच फोनमध्ये भारतीय भाषांचाही समावेश करण्यात आला आहे. जेणे करून ज्यांना इंग्रजीची अडचण जाणवते, ते या फोनमध्ये त्यांना पाहिजे ती भाषा निवडून पुढील काम करू शकतात. साध्या अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीमध्ये काही पर्याय निवडण्याची प्रक्रिया अवघड असते. ती यामध्ये सुलभ करण्यात आली आहे. जेणे करून वापरकर्त्यांचा गोंधळ उडत नाही. यासाठी या कंपनीत काही शे कर्मचारी काम करत आहेत. त्यांनी विकसित केलेले हे सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे चालेल यासाठी फोनच्या मालिकेतील एखाद्या उपकरणाचे उत्पादन झाल्यावर त्याची ७२ तासांची चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये फोन संगणकाला लावून ठेवला जातो आणि एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याच्या विविध चाचण्या केल्या जातात. त्याची आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता झाल्यावरच त्या फोनमध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरला मान्यता देऊन ते पुढच्या अवृत्तीसाठी वापरले जाते. तसेच ही कंपनी गुगलच्या परीक्षणास पात्र ठरली आहे. म्हणजे या कंपनीने तयार केलेले कोणतेही उत्पादन हे गुगलने परीक्षण केल्याशिवाय बाजारात येऊ शकत नाही. यामुळे मोबाइलमधील ऑपरेटिंग प्रणालीमधील तक्रारींना जागाच राहात नाही. तसेच गुगल सातत्याने देत असलेले बग अपडेट्स या मोबाइलमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात.

इतर महत्त्वाच्या चाचण्या

स्क्रीन किंवा बॅक कव्हर तुटल्याच्या सर्वाधिक तक्रारी या भारतात येतात. यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी भक्कम मोबाइल उपलब्ध करून देणे कंपन्यांसमोर आव्हान होते. हे आव्हान लावा मोबाइलने पेलले. या कंपनीने लावा ए१६ हा न तुटणारा फोन बाजारात आणला होता. हेच तंत्रज्ञान स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आले आहे. याची चाचणी करण्यासाठी कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात एक यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रात फोन दीड मीटरवरून सतत खाली पडत असतो. यात चाचणी करून फोनची स्क्रीन अथवा बॅक कव्हर तुटत नाही ना याचा अभ्यास केला जातो. तसेच स्क्रीनवरील स्क्रॅचेसची परीक्षा घेण्यासाठी एका विशिष्ट यंत्राद्वारे स्क्रीनवर सतत विविध ठिकाणी आघात केले जातात. या आघातानंतर स्क्रीनचा दर्जा ठरविला जातो. आपल्या देशातील विविध भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध वातावरणात फोन काम करावा व तो चार्ज व्हावा याउद्देशाने एका यंत्रात फोन ठेवला जातो. जेथे फोनचा वापर उणे चारपासून ते ७० डिग्री अंश सें.पर्यंतच्या तापमानात केला जातो. या प्रत्येक तापमानात फोन कसा काम करतो. त्यात काय मर्यादा येतात याबाबतची निरीक्षणे नोंदविली जातात. या निरीक्षणांचा अभ्यास करून फोनचा दर्जा सुधरवला जातो. याचबरोबर फोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी. यासाठी येथे विशेष काम केले जाते. ही एकमेव अशी कंपनी आहे की जिच्या फोनच्या तांत्रित तपशिलात बॅटरी कमीत कमी किती चार्ज होईल याची माहिती दिलेली असते. स्वस्त आणि मस्त फोनमध्ये सर्वाधिक तक्रार ही चार्जिग पिन खराब होण्याची येते. यामुळे या कंपनीत एक असे यंत्र बसविण्यात आले आहे की जिथे एका सेकंदाला चार्जिगची पिन लावली जाते व ती काढली जाते. या परीक्षणाद्वारे चार्जिग पिनचा दर्जा तपासला जातो.

महागडय़ा फोनमधील जास्तीत जास्त सुविधा दहा हजारपेक्षा कमी किमतीतील फोनमध्ये उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्या उद्देश आहे. त्या उद्देशाने येथे संशोधनाचे काम केले जाते. भारतासह १३ देशांमध्ये आमच्या फोनची विक्री होत असून यातील ९९ टक्के फोनचे उत्पादन हे भारतातच घेतले जाते. लवकरच भारतात आणखी दोन ठिकाणी नवीन उत्पादन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यावेळेस तेथे संशोधन आणि विकासाच्या कामालाही चालना दिली जाणार आहे.

– दीपक महाजन, संशोधन आणि विकासविभाग, लावा मोबाइल, शेनजेन

 नीरज पंडित– @nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2017 5:27 am

Web Title: lava mobiles smartphone production unit in china
Next Stories
1 टेकन्यूज : व्हॉट्सअ‍ॅपरील नवीन फीचर
2 टेक-नॉलेज : मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची?
3 ‘सेल्फी’ पल्याड सारं जुनंच!
Just Now!
X