03 June 2020

News Flash

अ‍ॅपची शाळा : नासाची सफर

नासासंबंधातील अद्ययावत बातम्या व माहिती तुम्हाला न्यूज आणि फीचर्स या विभागात पाहायला मिळतील.

नासा (नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. गेल्या सहा दशकांमधे या संस्थेने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांची यादी करायलासुद्धा पानेच्या पाने खर्ची पडतील. इंटरनेटवर ही सर्व माहिती विस्तृत स्वरूपात उपलब्ध आहेच. पण आज आपण नासाने स्मार्ट फोनसाठी तयार केलेल्या अ‍ॅपची माहिती घेणार आहोत.
NASA App (https://play.google.com/store/apps/detailsAGid=gov.nasa) हे अ‍ॅप फोनवर इन्स्टॉल करून उघडल्यावर त्यात एकूण ९ भागांचा मेनू येतो. त्यातला पहिला भाग म्हणजे नासाच्या विविध उपग्रह किंवा यानांनी काढलेल्या १५००० पेक्षा अधिक छायाचित्रांचा खजिना. उदाहरणार्थ, शनी ग्रहाची कडी, रात्रीच्या पॅरिस शहराचा अवकाशातून काढलेला फोटो, क्षितिजावर उगवणारा बुध ग्रह, स्पायरल आकारातील आकाशगंगा यासारखी उत्तमोत्तम छायाचित्रे पाहाणे हा एक नेत्रसुखद अनुभव आहे. तीच गोष्ट व्हिडीओ क्लिप्सची. सध्या या अ‍ॅपवर १३००० पेक्षा जास्त क्लिप्सना लिंक्स दिलेल्या आहेत. वादळांच्या तांडवांचे घेतलेले चित्रण, अग्निबाणांची उड्डाणे, जंगलात लागणाऱ्या वणव्यांपासून संरक्षण यासारख्या विविध विषयांचे व्हिडीओ तुम्हाला खूप काही माहिती देऊन जातील.
नासासंबंधातील अद्ययावत बातम्या व माहिती तुम्हाला न्यूज आणि फीचर्स या विभागात पाहायला मिळतील. यात काही तासांपूर्वी झालेल्या घडामोडींपासून काही महिन्यांपर्यंतची माहिती तुम्हाला मिळेल. एखाद्या विशिष्ट विषयावरची माहिती हवी असल्यास ती सर्च करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे नासाने हाती घेतलेल्या मोहिमा. या मोहिमांची यादी तुम्हाला अल्फाबेटिकली करून दिलेली आहे. उदाहरणार्थ, मंगळावरच्या मोहिमा पाहायच्या असतील तर एम अक्षरावर गेल्यावर मार्सच्या संदर्भात काढलेल्या पाच मोहिमा येथे दिसतील. २००३ साली मंगळावर चालवलेल्या वाहनाची माहिती येथे दिसेल.
नासा फीचर्ड या विभागात नासाने काढलेल्या चित्रसंग्रहाचा वापर करून इतरांनी बनवलेल्या साइट्स, विविध विषयावरचे विचार, लेखमाला पाहायला मिळतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला नासा प्रसारित करत असलेले टीव्ही आणि रेडिओ प्रोग्रॅम्स पाहता/ऐकता येतील.
ट्विटरद्वारे एकमेकांशी बातचीत करणाऱ्यांसाठी नासा ट्वीट्स हा विभाग उपलब्ध आहे.
प्रोग्रॅम्स या मेनूखाली नासा इतरांसाठी देत असलेल्या सेवांची माहितीही येथे देण्यात आलेली आहे.
या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे हे अ‍ॅप सर्वसामान्य माणसाच्या मनोरंजनापासून ते अवकाश जिज्ञासूंना अचूक माहिती पुरवण्यापर्यंत सर्व बाबतीत यशस्वी ठरते. असे नक्कीच म्हणता येईल की अवकाश मोहिमांसारखेच अ‍ॅपच्या आघाडीवरही नासाने उत्तम कार्य केले आहे.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2016 12:51 am

Web Title: the nasa app for smartphones
Next Stories
1 अस्सं कस्सं? : ओल्या फोनचं दुखणं!
2 ‘विण्डोज १०’साठी शेवटची मुदत शुक्रवारी
3 टेक-नॉलेज : तंत्रस्वामी
Just Now!
X