काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर खाते हॅक झाले होते. असे अनेक ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट खाती हॅक केली जातात. समाजमाध्यमांवरच्या वाढत्या वावरामुळे संकेतस्थळ, ई-मेल हॅक करणारी मंडळी आता समाजमाध्यमांवरील खाती हॅक करू लागली. समाजमाध्यमांवरील आपल्या विचारांना तेथील वागणुकीला आज केवळ त्या माध्यमांमध्येच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही खूप महत्त्व येऊ लागले आहे. अगदी नोकरी देताना अनेक कंपन्या या माध्यमांमधील तुमच्या वावराचा विचार करतात. यामुळे या खात्यांची अधिक सुरक्षा घेणेही आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ही सुरक्षा घेत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊ या.

आपले कुटुंब, मित्रमंडळ, यांना एका क्लिकवर आणून ठेवणाऱ्या या समाजमाध्यमांनी संवाद क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली आहे. या माध्यमावर आपण कोणतीही शंका न आणता आपल्या परिजनांशी मोकळ्या गप्पा मारत असतो. अगदी प्रेमाच्या, रागाच्या, विचारांच्या सर्व प्रकरच्या चर्चा या माध्यमावर रंगत असतात. यामुळेच या माध्यमांवरील काही वाईट प्रवृत्ती जाग्या झाल्या आणि त्यांनी आपल्या माहितीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. यामुळेच खाती हॅक होणे किंवा छुप्या मार्गाने त्याचा गैरवापर करणे या प्रकरांमध्ये वाढ होऊ लागली. आज जगभरात ऑनलाइन व्यवहार होत असले तरी याबाबतची साक्षरता मात्र खूपच कमी आहे. या सुरक्षेचे काही पर्याय पाहू या.

पासवर्ड व्यवस्थापन

आजमितीस जगातील २१ टक्के इंटरनेट वापरकर्ते दहा वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. तर ४७ टक्के वापरकत्रे पाच वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. २९१४ मध्ये बहुतांश लोकांचा पासवर्ड हे १२३४५६, पासवर्ड असे सोपे होते. यामुळे हॅकिंग प्रकार या काळात जास्त वाढले होते. तर बहुतांश लोक विविध ऑनलाइन लॉगइनसाठी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे अनेकदा एक खाते हॅक झाले की त्या व्यक्तीची इतर खाती हॅक करणेही सोपी जातात. यामुळे प्रत्येक खात्याचा पासवर्ड हा वेगळा असणे केव्हाही उपयुक्त ठरते. याचबरोबर पासवर्ड ठेवताना जुना आधी दिलेल्या पासवर्डचा वापर करूच नये.

तसेच आपल्या नावातील अद्याक्षरे किवा जन्म तारखेचा उल्लेख त्यात नसावा. सध्या हॅकर्स हे लांबलचक पासवर्डही सहजगत्या हॅक करू लागले आहेत. यामुळे याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हल्ल्यांना ते डिक्शनरी अटॅक्स असे म्हणतात. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत केली जाते. याचबरोबर की लाँगर अटॅक केला जातो. ज्यात आपल्या उपकरणामध्ये मालवेअर जातो. असे झाल्यावर वापरकर्त्यांच्या नकळत पासवर्ड हॅकपर्यंत जातो. यासाठी तुम्ही पासवर्ड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून विविध खात्यांसाठी विविध पासवर्डचे व्यवस्थापन करू शकता. सध्या गुगलने क्रोम या ब्राऊझरमध्ये ऑटोफिलचा पार्याय आणला आहे. हा पर्याय अँटीव्हायरसने सुरक्षित उपकरणामध्ये वापरू शकतो. यामुळे मोठे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार पासवर्ड म्हणून मोठय़ा म्हणी किंवा वाक्प्रचारांचा वापर करणे केव्हाही योग्य ठरते.

२एफए

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (२एफए) ही अतिरिक्त सुरक्षा मानली जाते. गेल्या तीन वर्षांपासून ही सुरक्षा प्रणाली कार्यरत आहे मात्र त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. आपण लॉगइन केल्यावर या प्रणालीमध्ये आपल्याला मोबाइलवर एक लघुसंदेश पाठविला जातो किंवा ई-मेलद्वारे एक पिन पाठविला जातो. या पिनचा वापर केल्यावरच आपले खाते सुरू होते. हा पिन चोरी होणे किंवा हॅकर्सना कळणे अवघड असते. ही प्रणाली वापरली असती तर २०१५ मध्ये ट्विटरवर झालेला हल्ला वाचविता आला असता. फक्त मालवेअर असलेल्या उपकरणांमधून हा पिन हॅकर्सपर्यंत पोहचू श़्ाकतो. फेसबुक, गुगल, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन यांसारख्या संकेतस्थळांनी अशी सुविधा सुरू केली आहे. या संकेतस्थळांच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटीमध्ये हा ‘२एफए’चा पर्याय निवडू शकता.

संशयास्पद लॉगइनचे ई-मेल्स

फेसबुक आणि ट्विटर त्यांची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. यामुळे जेव्हा आपल्या खात्यावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा प्रवेश होतो किंवा संशयास्पद हालचाल होते तेव्हा आपल्याला ई-मेलद्वारे सूचित केले जाते. यामुळे अशा मेल्सकडे गांर्भीयाने पाहा. अनेकदा आपण समाजमाध्यमांच्या खात्यावरून येणाऱ्या ई-मेल्सकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. पण त्यात आता असे ई-मेल्स येत असल्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहून त्यावर योग्य ती कार्यवाही करा. अनेकदा असे मेल्स आल्यावर तुम्हाला तातडीने पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार पासवर्ड बदलून तुमचे खाते सुरक्षित करा. यामुळे सायबर हल्ल्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

संशायस्पद लिंक्सबाबत काळजी घ्या

तुमचा तुमच्या समाजमाध्यम खात्यावर खूप जास्त विश्वास असेल. मात्र तेथे असलेल्या वाईट मनोवृत्ती तुमच्या या विश्वासाला तडा देऊ शकतात. यामुळे तुमच्या खात्यावर आलेल्या लिंक्सवर क्लिक करताना योग्य तो विचार करा. तुम्हाला जर एखाद्या पोस्ट विषयी शंका आली तर त्या पोस्टचा आलेला ई-मेल तपासून पाहा. त्यावर तुम्हाला सुरक्षेबाबत माहिती दिलेली असते. हे सर्व करत असताना किंवा तुमचे समाजमाध्यम खाते सुरू केल्यावर तातडीने तुम्ही ती लिंक सुरू केली तरी त्या लिंकचा टॅब तातडीने बंद करा. त्या संकेतस्थळावर कुठेही क्लिक करू नका. असे केल्यामुळे तुम्ही क्लिक जॅकिंग हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करू शकता.

त्रयस्थ अ‍ॅप्लिकेशन्सपासून सावधान

तुमच्या समाजमाध्यमाच्या खात्यावर तुम्हाला विविध अ‍ॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्याबाबतच्या सूचना सातत्याने येत असतात. यातील अ‍ॅप आपल्याला उपयुक्त आहेत की नाही हे तपासून पाहा. तसेच ते अ‍ॅप आजपर्यंत किती जणांनी वापरले आहे त्याची सत्यता पडताळून पाहा आणि मगच ते डाऊनलोड करा. अन्यथा अनेक अ‍ॅप्स केवळ आपली माहिती मिळवण्यासाठी व आपल्या उपकरणारतील सेटिंग्जमध्ये शिरकाव मिळवण्यासाठी या माध्यमाचे अ‍ॅप तयार करतात. माहितीच्या महाजालात या अ‍ॅप्सना रोखणे सध्या तरी शक्य नसले तरी आपण याबाबत सजग राहून विशेष काळजी घेऊ शकतो. समाजमाध्यमांवर देण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये अनेकदा खूप कमी परवानग्या असतात. यामुळे बहुतांश लोक हे अ‍ॅप डाऊनलोड करतात. पण यामध्ये दोन परवानग्यांबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या म्हणजे हे अ‍ॅप समाजमाध्यामावरील आपल्या पोस्ट वाचू शकणार आहेत. याचबरोबर आपल्या खात्यावर पोस्टही करू शकणार आहेत. यामुळे असे अ‍ॅप डाऊनलोड करू नका. जर केले असतील तर त्यातील हक्क काढून घ्या.

– नीरज पंडित  nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com