‘फेसबुक’प्रमाणे जगभरातील जवळपास एक अब्ज लोकांमध्ये संदेशवहनाचे काम करणाऱ्या लोकप्रिय अशा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या सेवेच्या माध्यमातून पहिल्यांदाच व्यावसायिकदृष्टय़ा आर्थिक गणित जुळविण्याच्या हालचालींना वेग आला असून अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या सेवेबाबतची चाचपणी सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जगभरात मोफत सेवा पुरवली जात असून फेसबुकने या लोकप्रिय सेवेसाठी १९ अब्ज डॉलरची रक्कम मोजली आहे. त्यामुळे आता याच अनुषंगाने या सेवेतून जगभरातील वापरकर्त्यांकडून आर्थिक स्वरूपात फायदा कमाविण्यासाठी ‘वाय कॉम्बिनेटर स्टार्टअप इनक्युबेटर’शी संलग्न असलेल्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

चीनच्या ‘टेनसेन्ट होल्डिंग लि.’ च्या ‘वी चॅट’ या संकल्पनेवर आधारित ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ही सेवा ‘व्हॉट्स अप’ या वाक्याला अनुसरून असून मोबाइल सेवा वापरणाऱ्यांना या माध्यमातून आपल्या मित्र आणि परिवारासोबत मोफत संदेशवहनाची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे या सेवेच्या माध्यमातून आर्थिक फायदा होऊ शकला का? याबाबत कंपनी विचाराधीन आहे. पण त्याबाबतची सावधगिरीदेखील कंपनीकडून बाळगली जात आहे. कारण या दस्तावेजासोबतचे येणाऱ्या स्पॅम संदेशाची समस्यादेखील उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणूनचे मागील महिन्यात कंपनीने सहभागी कंपन्यांनी ‘वाय कॉम्बिनेटर फोरम’वर पाठविलेल्या ईमेल आणि संदेशांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

अधिक सुविधा

व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग भविष्यात व्यावसायिकदृष्टय़ा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असून याच अनुषंगाने या प्रणालीत काही आमूलाग्र बदल केले जात आहेत. तसेच या वर्षअखेरीपर्यंत ही सेवा अधिक स्थिर असावी, असादेखील प्रयत्न आहे. यासाठीच आयफोन प्रणालीप्रमाणेच आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटमध्ये काही बटणांचे स्थानांतर तसेच संदेश आणि दृश्य स्वरूपातील व्हिडीओ कॉलची प्रणाली सुरू करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत ‘कॉल’च्या बटणावर क्लिक केल्यानंतर ‘व्हॉइस’ किंवा ‘व्हिडीओ’ असे पर्याय निवडावे लागत होते. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या इंटरफेसमध्ये या दोन्हींसाठी स्वतंत्र बटणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन प्रणालीत व्हॉट्सअ‍ॅपमधील व्हिडीओ कॉल सेवा कार्यान्वित करण्यासाठी कॉल करण्याच्या शेजारील आणि टेक्स्ट बारच्या खालील दर्शनी भागातदेखील असणार आहे. या बदलामुळे वापरकर्त्यांला क्षणार्धात या सेवा कार्यान्वित करणे सहज शक्य होणार आहे. तसेच आयफोनच्या धारकांनादेखील ही सेवा यापूर्वीच टेक्स्ट बार लगत कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली लवकरच अ‍ॅण्ड्रॉइडमध्येदेखील कार्यान्वित होणार आहे.