देशात कोणतीही नवी समस्या उभी राहिली की त्यावर तोडगा काढण्यासाठी नवउद्यमी सरसावतात. देशात ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय झाला आणि नवउद्यमींनी आपले काम सुरू केले. यामुळेच १ जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन करप्रणालीची माहिती देणारे व व्यापाऱ्यांना भविष्यात करप्रणालीसाठी आवश्यक सेवा पुरविणाऱ्या अ‍ॅप्सची गर्दी अ‍ॅप बाजारात दिसू लागली. पाहू या अ‍ॅप बाजारात कोणते अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

सीबीईसी जीएसटी

वस्तू व सेवा कर लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर सामान्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांना प्रश्न पडत होते की नेमकी ही करप्रणाली कशी आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी केंद्रीय सीमा व उत्पादन शुल्क विभागाने एक अ‍ॅप विकसित केले आहे. ‘सीबीईएस जीएसटी’ या अ‍ॅपच्या माध्यमातून विभागाने करप्रणालीचा संपूर्ण तपशील सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये नवीन करप्रणालीची नोंदणी कशी करावी याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. याबरोबर वस्तू व सेवा कर कायदा व नियमही यामध्ये देण्यात आला आहे. तसेच सामान्यांना व व्यापाऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे सुलभ व्हावे म्हणून प्रश्नावलीही देण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नवीन करप्रणाली समजून घेणे अगदी सोपे झाले आहे. मात्र या अ‍ॅपमध्ये शोधण्याचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला पाहिजे ती माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण तपशील वाचावा लागतो. यामुळे अनेक वापरकर्त्यांनी शोध पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली आहे.

जीएसटी एन्रोलमेंट

वस्तू व सेवा करप्रणालीसाठी तंत्रज्ञान सेवा पुरविण्यासाठी सरकारने ‘जीएसटी नेटवर्क’या उपकंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून खासगी वस्तू व सेवा कर सेवापुरवठादारांची नियुक्ती करण्यात येत आहे. पण सरकारच्या या यंत्रणेने वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणी करण्यासाठी ‘जीएसटी एन्रोलमेंट’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेला अर्ज भरून त्यासोबत असलेले कागदपत्र स्कॅन करून अटी मान्य करून अर्ज सादर केल्यास अवघ्या १५ मिनिटांत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानंतर व्यापाऱ्याला नोंदणीचा लघुसंदेश येतो. या नोंदणी क्रमांकाच्या साह्याने व्यापारी जीएसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्याचा अर्ज संपादित करू शकतो. मात्र हे अ‍ॅप अत्यंत धिम्या गतीने काम करते व ते वारंवार बंद पडते, अशी तक्रार वापरकर्ते करीत आहेत. तसेच अ‍ॅपमधील काही तपशील भरला तरी पुढची प्रक्रिया सुरू होत नसल्याचीही तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे.

टॅली फॉर जीएसटी

लेखापालाचे काम सोपे करणाऱ्या टॅली या कंपनीनेही वस्तू व सेवा करप्रणालीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी वस्तू व सेवा कर सेवा पुरवठादार म्हणून नोंदणी केली आहे. याचबरोबर त्यांनी एक अ‍ॅपही विकसित केले आहे. या अ‍ॅपमध्ये वस्तू व सेवा कराविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर नवीन करप्रणालीचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. यात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा तपशील दिला की नवीन करप्रणालीचा काय परिणाम होईल, तुम्हाला कोणते विवरणपत्र भरावे लागेल याचा तपशील देण्यात आला आहे. याशिवाय तुमच्या शहरात नव्या करप्रणालीबाबत मार्गदर्शन शिबिरे कोणत्या भागात व कोणत्या दिवशी होणार आहेत याचा तपशीलही या अ‍ॅपमध्ये देण्यात आला आहे. तसेच वापरकर्त्यांला करप्रणालीबाबतची प्रश्नोत्तरे व त्याबाबतच्या बातम्यांचा तपशीलही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

क्लीअर टॅक्स जीएसटी

कर विवरणपत्र भरण्याची सेवा पुरविणाऱ्या क्लीअर टॅक्स या कंपनीनेही वस्तू व सेवा करप्रणालीसाठी अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमध्ये नव्या करप्रणालीबाबतच्या बातम्या, मार्गदर्शनपर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर काही व्हिडीओजही देण्यात आले आहेत. ज्याच्या माध्यमातून करप्रणाली कशी काम करते तसेच व्यापाऱ्याला यात नेमकी कोणती भूमिका बजावायची आहे याबाबतचा तपशील देण्यात आला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ते समजण्यास सोपे जाते, यामुळे या अ‍ॅपमध्ये व्हिडीओ देण्यात आले आहेत. याचबरोबर नव्या करप्रणालीत कशा प्रकारे नोंदणी करावी याची माहिती व नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्या व्यापाराला कोणती व किती विवरणपत्रे सादर करावयाची आहेत याचा तपशीलही या अ‍ॅपमध्ये देण्यात आला असून ते सादर करण्याची सुविधाही अ‍ॅपवरील लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या करप्रणालीबाबत तज्ज्ञांचे लेखही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे सोप्या भाषेत ही करप्रणाली समजून घेणे शक्य होते. याचबरोबर तुम्ही विक्री करीत असलेल्या वस्तूवर किती ‘वस्तू व सेवा कर’ लागू होईल याचे गणकही या अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहे. यामुळे इतर अ‍ॅपपेक्षा हे जरा उजवे ठरते.

जीएसटी रिटर्न

नवीन करप्रणालीत व्यापाऱ्याला दरमहा किमान तीन म्हणजे वर्षांला बारा विवरणपत्रे सादर करावी लागणार आहेत. नव्या करप्रणालीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना या प्रक्रियेची चिंता वाटू लागली आहे. ही चिंता दूर करण्यासाठी विवरणपत्रे सादर करीत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची. ती कशी सादर करावयाची. याबाबतचा तपशील या अ‍ॅपमध्ये देण्यात आला आहे. तसेच व्यापाऱ्याने जमा केलेला कर सरकारदरबारी कसा जमा करायची याची प्रक्रियाही या अ‍ॅपमध्ये समजावून सांगण्यात आली आहे.

इतर माहिती अ‍ॅप्स

  • जीएसटी हेल्पलाइन
  • जीएसटी अ‍ॅक्ट
  • जीएसटी रुल्स
  • जीएसटी बिल इंडिया हिंदी
  • जीएसटी रेट्स
  • जीएसटी इंडिया

नीरज पंडित

 nirajcpandit  Niraj.pandit@expressindia.com