‘मायक्रोमॅक्स’ या स्वदेशी मोबाईल निर्मात्या कंपनीने आपल्या ‘कॅनव्हॉस ६’ वर्गवारीतील स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केला असून, कंपनीने आपल्या बोधचिन्हात (लोगो) देखील नाविण्यपूर्ण बदल केला आहे. या नव्या बोधचिन्हाच्या अनावरणावेळी ‘मायक्रोमॅक्स’ने एकूण १९ नवी उत्पादने जाहीर केली. यामध्ये स्मार्टफोन्ससह एलईडी टेलिव्हिजन्स आणि टॅबलेट्सचाही समावेश आहे.
‘कॅनव्हॉस ६’ या स्मार्टफोनला ३ जीबीची रॅम आणि संपूर्ण मेटल बॉडी देण्यात आली आहे, तर ‘कॅनव्हॉस ६ प्रो’मध्ये ४ जीबीची रॅम असणार आहे. ‘कॅनव्हॉस ६’ हा स्मार्टफोन १३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. कॅनव्हॅस ६ मध्ये ३२ जीबी आणि कॅनव्हॅस ६ प्रो मध्ये १६ जीबीची मेमरी देण्यात आली आहे. दोन्ही मोबाईलमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे.
दरम्यान, सर्वाधिक मोबाईल उत्पादन करणाऱया पहिल्या पाच कंपन्यांच्या जागतिक क्रमवारीत स्थान प्राप्त करण्याचा मायक्रोमॅक्स कंपनीचा मानस असून, हे उद्दीष्ट २०२० पर्यंत साध्य करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने त्यांचे स्मार्टफोन खरेदीसाठीचे स्वत:चे इ-कॉमर्स स्टोर देखील सुरू केले आहे. याशिवाय, ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत मोबाईचे संपूर्ण उत्पादन भारतात केले जाईल यादृष्टीनेही कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.