* मला माझ्या मोबाइलमध्ये सतत एनक्रिप्ट युवर डेटा असा संदेश येतो. हा प्रकार नेमका काय आहे.
– संदेश कणसे, भांडुप
* फोन किंवा लॅपटॉप चोरीला गेला की ती वस्तू गेली याचे वाईट तर वाटतेच. पण त्याहीपेक्षा जास्त त्यातील माहिती चोरीला जाणे आपल्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकते. आपण पैसे खर्च करून ती वस्तू परत घेऊ शकतो. याचबरोबर सिंक केलेली माहितीही परत मिळवू शकतो. मात्र सर्वच माहिती सिंक असते असे नाही. तसेच आपल्या माहितीचा दुरुपयोगही होऊ शकतो. यामुळे आपली सर्व माहिती एनक्रिप्ट करून ठेवणे कधीही योग्य ठरते. तुम्ही तुमचे सर्व ई-खाती किंवा सर्व उपकरण पासवर्डने सुरक्षित केले असले तरी ते खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत असे आपण म्हणून शकत नाही. जर कोणी तुमच्या उपकरणातील माहिती चोरी करायची ठरवली तरी तुमचा पासवर्डचे कवच भेदून ती माहिती चोरीला जाऊ शकते. मोबाइलबरोबरच संगणकालाही हा धोका कायम आहे. अ‍ॅण्ड्रॉइड फोन किंवा टॅबलेट तसेच संगणक बाह्य उपकरणांच्या मदतीने बूट करता येऊ शकतात. ज्याच्या साह्याने सर्व माहितीही मिळवता येऊ शकते. हे झाल्यावर तुम्ही विविध सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून तुमची माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ती अनेकदा मिळणे अवघड असते. यामुळे तुम्ही तुमच्या संगणकातील किंवा फोनमधील माहिती ज्याला लोकल स्टोअरेज म्हणता येईल अशा स्टोअरेजमध्ये असलेली माहिती एनक्रिप्ट केली तर माहिती चोरी करणे खूप अवघड होते. ते अशक्य आहे असे म्हणता येणार नाही. पण अवघड मात्र नक्कीच होते. हे अवघड कामही एखाद्याने केले तरी त्याला ती माहिती वाचता येणे शक्य होणार नाही. कारण ती माहिती एनक्रिप्टेट असेल. यात एक नुकसान असते ते म्हणजे जर आपला एखादा ड्राइव्ह करप्ट झाला आणि आपण रिकव्‍‌र्ही सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून माहिती मिळवली तर ती उपयोगात येणे अनेकदा अवघड असते. पण यापेक्षा जास्त फायदेच आहेत. विविध ऑपरेटिंग प्रणालीमध्ये विविध प्रकारे माहिती एनक्रिप्ट केली जाते.
* माझ्या घरच्या संगणकावर विंडोज एक्स्पी आहे. त्यावर गेला एक आठवडा गुगल क्रोम हळू चालते. यूटय़ूबवरील व्हिडीओ पूर्ण बफर होतो म्हणजे इंटरनेटचा वेग चांगला आहे. पण क्रोम स्क्रोल डाऊन किंवा स्क्रोल अप करीत असताना क्रोम काम करायचेच थांबते.
– शीतल पाटोळे
* क्रोम हळू चालत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचे अँटिव्हायरस आणि फायरवॉल सेटिंग्ज तपासून बघा. अनेकदा आपल्या फायरवॉल सेटिंग्जमुळे वेब ब्राऊजर हळूहळू काम करते. यामुळे तुम्ही ज्या वेळेस संगणकात इंटरनेट वापरत असाल तेव्हा फायरवॉल सेटिंग्ज जरूर पाहा. जर तुम्हाला अमुक एक संकेतस्थळ पाहात असातनाच ही अडचण येत असेल तर तुम्ही क्रोमच्या सेटिंग्जच्या पर्यायात जा. तेथे ‘शो अ‍ॅडव्हान्स सेटिंग्ज’ हा पर्याय निवडा. त्यातील प्रायव्हसी विभागात ‘पड्रिक्ट नेटवर्क अ‍ॅक्शन टू इम्प्रूव्ह पेजेस लोड परफॉर्मन्स’ हा पर्याय डीसिलेक्ट करा. यानंतर क्रोम व्यवस्थित चालणे अपेक्षित आहे. तरीही अडचण येत असेल तर तुम्ही क्रोम अनइन्स्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करा.