ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये स्टेम प्राधिकरण कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून पुढील २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून महापालिकेने स्वत:च्या योजनेतील पाण्याचे  शहरामध्ये नियोजन केले आहे. त्यामुळे शहरात २४ तासांऐवजी १२ तास पाणी बंद राहणार आहे. पालिकेच्या पत्रकानुसार बुधवार सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ या वेळेत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, सेंट्रल जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.