रेल्वे स्थानक शहराच्या जडणघडणीचे प्रमुख साक्षीदार मानले जातात. डोंबिवलीही त्यास अपवाद नाही. इतिसाहाचा विषय निघाला की नेहमी कल्याणचा उल्लेख होतो, मात्र डोंबिवली शहराचा आधुनिक इतिहासही तितकाच जुना आहे. येत्या १ मे रोजी डोंबिवली रेल्वे स्थानकास १२९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी या स्थानकाविषयीच्या आठवणी जागवल्या.

एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली लोकल धावली. त्यानंतर १८५४ ला हा रेल्वेमार्ग वाढवून कल्याणपर्यंत नेण्यात आला. रेल्वेमार्ग टाकण्यासाठी खडीची आवश्यकता होती. रेल्वेमार्गाचे हे काम वालांचन समूहाकडे सोपविण्यात आले होते.  नारायण पाटकर यांनी खडी पुरविण्याचे काम केले. कल्याण शहरातलगत त्या वेळी आगासन, म्हातार्डी, कोपर, भोपर अशी १३ गावे होती. याठिकाणी असलेले खडक फोडून त्याची खडी रेल्वेला पुरविली जात असे. येथे रेल्वेची व्यवस्था नव्हती. पाटकर यांच्याकडे त्या काळी दोन गलबते होती. या गलबताच्या माध्यमातून ही खडी मुंबईला जायची, तेथून ती कल्याणला रेल्वेने आणली जायची. अशा प्रकारे येथे हळूहळू वस्ती वाढू लागल्याने डोंबिवलीला १८८७ मध्ये रेल्वे स्थानक बांधण्यात आले. १९१६-१७ मध्ये हा रेल्वेमार्ग दुहेरी करण्यात आला. फलाट नसल्याने शिडी लावूनच प्रवाशांना गाडीत चढावे व उतरावे लागत असे. नंतर लाकडी फलाट बांधण्यात आला. १९२७ मध्ये सध्याचे तीन व चार असे दोन फलाट बांधण्यात आले. येथे लोकल गाडय़ा थांबू लागल्या. पूर्वेला एक कौलारू तिकीट खिडकी होती. १९५३ मध्ये सध्याचा फलाट क्रमांकपाच बांधण्यात आले.

अस्वस्थ मित्र मंडळ

मुंबईला कामानिमित्त जात असताना लोकलच्या डब्यात बारा ते तेरा जणांचा एक गट तयार झाला. सकाळी ८.५२ ची गाडी आम्ही पकडायचो.  शं.ना.नवरे, वसंत जोशी, ज.बा.कुलकर्णी, माधवराव देशपांडे, ग.णा.प्रधान, प्रभाकर अत्रे, वा.य.गाडगीळ, शेजवलकर, गोऱ्हे, बैरट, इनामदार यांसारख्या सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश होता. कुणी काही नवीन वाचन केले आहे, कुणी कविता लिहिली आहे, नवी सुचलेली चाल यासोबतच एकमेकांच्या अडीअडचणी येथे चर्चिल्या जाऊ लागल्या. नाव पडले ‘अस्वस्थ मित्र मंडळ’.

-वसंत आजगावकर, डोंबिवली

आठ रुपये पास, ४० पैसे तिकीट

पूर्वीचे डोंबिवली रेल्वे स्थानक म्हणजे मोकळा असा फलाट होता. अर्धा-एक तासाने एखादी गाडी यायची. मी शिक्षण खात्यात नोकरीला होतो. सकाळी ९.०१ ची इंजिन गाडी त्या वेळी पकडायचो. दिनेश वाळिंबे यांसह कामातले काही चार-पाच लोक या गाडीने प्रवास करायचे. रामरक्षा, भजन म्हणत असू. पूर्वेला एक तिकीट खिडकी होती. महिन्याचा ७ ते ८ रुपये पास, ४० पैसे तिकीट होते.

-नाना अनगळ (वय ९५)

फलाट म्हणजे फिरायचे ठिकाण

महाविद्यालयीन जीवनात रेल्वेने प्रवास झाला. मुंबईला महाविद्यालयात असल्याने रेल्वेने मुंबई गाठावी लागत असे. यादरम्यान काही मित्रमंडळीही जमली होती. त्या वेळी जास्त गर्दी नसल्याने मित्रमंडळींची संख्याही तशी कमी असायची. कौलारू छताचे फलाट, मोकळी खेळती हवा, तास-दीड तासाने येणारी गाडी हे चित्र काही वेगळेच होते. उल्हासनगर येथे छावणी स्थापन झाल्यानंतर रेल्वेची गर्दी वाढली.

-दाजी दातार (८५)

घंटा घेऊन दवंडी

त्यावेळची माणसे एकमेकांची काळजी घेणारी होती. कर्जत- कसारा येथे जाणाऱ्या गाडय़ा नेहमीच उशिराने धावत असत. ही सूचना देण्यासाठी हातात घंटा घेऊन दवंडी पिटवल्यासारखे घोषणा करत असत. काही तक्रारी केल्यास त्याची दखलही तत्काळ घेतली जात असे. पंखे चालत नाहीत. उद्घोषणा नीट होत नाही, यांसारख्या तक्रारी वारंवार मी रेल्वेकडे करत असायचो. शेवटी एक दिवस स्टेशनमास्तर माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना म्हणाले, तुमचा मुलगा सतत तक्रारी करतो.

-अनंत तिरोडकर (८२)

आणखी काही मजेदार किस्से

डोंबिवलीला पुणे एक्स्प्रेस गाडी थांबत नाही, परंतु पूर्वी त्याला अपवाद होता. जी.आय.पी. रेल्वेचे हिशेब तपासनीस विनायक गोगटे हे डोंबिवलीत राहात होते. त्यांच्यासाठी पूना एक्स्प्रेस ही गाडी डोंबिवली स्टेशनवर थांबायची सोय केली होती. तत्कालीन रामवाडी डेअरीचे मालक दिवंगत गणपतराव सामंत यांचा डोंबिवलीत दुधाचा मोठा व्यापार होता. पश्चिमेकडील भागशाळा मैदानाजवळ एक मद्याचे दुकान होते. मुंबईतील धनिक व प्रतिष्ठित लोक या मद्याचा आस्वाद घेण्यासाठी रविवार व सुट्टीच्या दिवशी येत असत.