नोकरी, व्यवसायाच्या धावपळीत बँकेत जाण्यास नसलेला वेळ, त्यामुळे चाकरमान्यांना रेल्वे स्थानकावरच बँकेत न जाता पैसे काढण्याची मुभा मिळावी या उद्देशाने मध्य रेल्वेने ठाणे ते बदलापूर स्थानकांदरम्यान १३ नवीन एटीएम यंत्रे (अ‍ॅटोमेटिक टेलर मशीन) बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही सर्व एटीएम यंत्रे राष्ट्रीयीकृत बँकांची असणार आहेत.
सध्या प्रत्येक रेल्वे स्थानकांवर, परिसरात विविध खासगी, राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम यंत्रे आहेत. या यंत्रांसमोर मोठय़ा प्रमाणात सकाळ, संध्याकाळ चाकरमान्यांच्या रांगा असतात. अपुऱ्या यंत्रणांमुळे एटीएमसमोर रांगा लागत असल्याने कामाचे गणित जुळविणे अवघड होते. त्यामुळे प्रवाशांच्या या मागणीचा मध्य रेल्वे प्रशासनाने विचार केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात ४, कल्याण ३, डोंबिवली १, बदलापूर ४, उल्हासनगर १, कोपर १ अशी एटीएम यंत्रे बसविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बदलापूरदरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर एकूण ३१ एटीएम यंत्रे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेने ही यंत्रे ठेवण्यासाठी बँकांना भाडय़ाने जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.