विविध प्रकारच्या सुविधा दिल्याचा परिणाम

कल्याण : मालमत्ता कराचे मागील तीन महिन्यांतील वसुलीचे अंदाज प्रशासनाने बुधवारी जाहीर केले. एप्रिल ते जुलै अखेपर्यंत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून १६० कोटी ६४ लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेने विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने त्याचा हा चांगला परिणाम असल्याची माहिती मालमत्ता उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांत वर्षभर आराम करून, मग जानेवारी ते मार्च अशी वसुली मोहीम पालिकेकडून राबविली जात होती. त्यामुळे पालिकेला दरवर्षी मालमत्ता करातून सुमारे ६० ते ७० कोटी रुपये अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी मिळत होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर महिन्याला मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य अधिकारी, कर्मचारी, प्रत्येक प्रभागाला दिले आहे. थकीत रकमा वर्षांअखेर वसूल करण्याऐवजी त्या प्रक्रिया चालू महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागातील कर्मचारी दरमहा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कर वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कराचे अर्थसंकल्पातील उद्दिष्ट ४२५ कोटी रुपयांचे होते. कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन दोन कोटी रुपये वाढीव वसूल करून ४२७ कोटी ५० लाख रुपयांचा लक्ष्यांक पूर्ण केला होता.

पाच टक्के सवलतीमुळे कर भरणा वेळेत

गेल्या वर्षी याच कालावधीत ११० कोटी २२ लाख रुपये वसूल केले होते. चालू वर्षी २० कोटीने ही रक्कम अधिक आहे. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी पालिकेने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट, ऑनलाइन सुविधा, यूपीआय, बीबीपीएस, क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विहित वेळेआधी मालमत्ता कर भरणा केला तर करात पाच टक्केसूट मिळते, त्यामुळे अनेक सोसायटी पदाधिकारी, सदनिका मालक अंतिम तारखेच्या अगोदर कर भरणा करीत आहेत. या माध्यमातून कर भरणा वेळेत होत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.