डोंबिवली शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईने वेग घेतला असून या कारवाईमध्ये झाडांचीही मोठय़ाप्रमाणात कत्तल केली जात आहे. शहरातील रामचंद्रनगर आणि गांधीनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ३७ झाडांची तोड केली जाणार आहे. या झाडांमध्ये नारळ, फणस, वड, पिंपळ, उंबर अशी वेगवेगळ्या प्रजातीची झाडे असून यामुळे परिसरात सावली निर्माण होत असते. यापैकी पाच झाडे तोडण्यात आली असून पुढील काळात अन्य झाडांचीही कत्तल केली जाणार आहे. या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

डोंबिवली शहरामध्ये रामचंद्रनगर आणि गांधीनगर परिसरात एकाच ठिकाणी सुमारे ३७ झाडे असून त्यामुळे हा परिसर हिरवळी आणि सावलीने भरलेला असतो. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या या कारवाईमुळे हा परिसर उघडा बोडका होणार आहे. या भागातून वाहतुकीची गर्दी लक्षात घेऊन ही झाडे वाचतील अशा पद्धतीने येथील रुंदीकरण करण्यात यावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. दरम्यान,महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाला नागरिकांची बाजू सांगण्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वृक्षप्राधिकरणाचे अधिकारी संजय जाधव यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले होते. मात्र या आश्वासनानंतरही ही वृक्षतोड सुरू झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. याप्रकरणी डॉ. नितीन जोशी यांनी येथील नागरिकांच्या दृष्टीने झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत. या परिसरातील अनेक झाडे येथील स्थानिक रहिवाशांनी लावली आहेत. त्यामुळे महापालिकेने ही झाडे तोडून नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू केला आहे. या रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना या झाडांची सावली मिळते. आता यातील पाच झाडे तोडल्याने रस्त्यावरून जाताना रखरखीत उन्हाचे चटके सहन करावे लागतात.

झाडे तोडण्याशिवाय पर्याय नाही..

डोंबिवली पूर्व येथील रामचंद्रनगर आणि गांधीनगर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम कल्याण- डोंबिवली महापालिकातर्फे करण्यात आले आहे. मात्र येथील रस्त्यावरची ३७ झाडे तोडणार असून त्यावर कोणताही दुसरा मार्ग नसल्याचे पालिका कार्यकारी अभियंता पी.एच. तडवी यांनी सांगितले. तसेच पावसाळ्या आधी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करून दुप्पट झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.